आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिरैयी-चिरकुट वाली आसान बात!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
झारखंडची तरुण लेखिका, कवयित्री जसिंता केरकेट्टा. - Divya Marathi
झारखंडची तरुण लेखिका, कवयित्री जसिंता केरकेट्टा.

राही श्रु. ग.

शरीरापलीकडचा माणूस पाहणं आमच्यासाठी सोपं आहे, कारण कुठल्याच शरीराची आम्ही तिजोरी किंवा कोठी केलेली नाही. अशी संस्कृती असलेल्या आदिवासी भाषेत ‘बलात्कार’ असा शब्दच नाही! लैंगिकतेबाबतच्या या अशा मुक्त, उदार विचारांवरून लक्षात येतं, की आदिवासी समाज हा या ‘मुख्य धारे’पेक्षा किती प्रगत, परिपक्व आहे! 

“घरी गेले होते तर आई चौकशी करत होती, ‘एवढी इकडे -तिकडे फिरतेस पण तुझा कुणी ‘साथी’ आहे की नाही मागे वाट बघणारा?’ मी म्हटलं, सध्या तरी नाही. तर ती चिडूनच म्हणाली, ‘काय बाई आळशी पोरी तुम्ही! आमच्यावर वेळ आणणार की काय तुझा साथीदार शोधण्याची?” 

आपल्या एका मैत्रिणीबद्दलचा किस्सा मैत्रीण सांगत होती आणि तिच्या आजूबाजूला घोळका करून बसलेले सगळे अवाक् होऊन ऐकत होते. ही मैत्रीण म्हणजे झारखंडची तरुण लेखिका, कवयित्री जसिंता केरकेट्टा. तिच्या महाराष्ट्र भेटीत आपल्या "ओराउं' या आदिवासी समाजाचं जग आणि आजचे ताणेबाणे सहज उलगडत इथल्या सगळ्यांना तिनं एकदम जागं केलं. गाव आणि शहर, परंपरा आणि आधुनिकता या सगळ्याकडेच पाहण्याच्या तिच्या खुल्या उदार नजरेने सगळ्या हवाबंद कप्प्यांची झाकणं सहजपणे उघडली. आदिवासींचं जगणं एक तर प्रदर्शनातली शोभेची वस्तू पाहावी तशा उत्सुकतेने पाहिलं जातं, ते ‘मागास’ आहेत म्हणून हेटाळणीने पाहिलं जातं किंवा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांच्या कहाण्यांमधून ते आपल्यापर्यंत पोचतं. या सगळ्याबद्दल तर जसिंता बोललीच, पण तिच्यासोबत रेंगाळणाऱ्या मित्रमैत्रिणींना तिने चकित केलं ते तिच्या समाजातले स्त्री-पुरुष संबंधांबद्दलचे विचार सांगून. “चिरैयी- चिरकुट का भी कोई साथी होता है, फिर तुम्हारा क्यों न हो?” चिमण्यांना- पाखरांनाही जोडीदार असतात, मग तूच का पंख पसरायचे नाहीस, असं म्हणत आपल्या लेकीला चिडवणाऱ्या ओराउं आईला जेव्हा मुलगी सांगते, की अमुक मुलावर माझं प्रेम आहे, तेव्हा नात्याच्या कुठल्याही लेबलविना सहज ते घर आणि त्यांचा समाज या जोडप्याला स्वीकारतो. आपल्या साथीसोबत ही मुलगी फिरते, काम करते, दोघे मिळून आपल्या कुटुंबासाठी स्वयंपाक करतात, अगदी एकत्र राहतातसुद्धा. कधी एकमेकाच्या घरी, तर कधी स्वतंत्र घरात! नैतिकतेच्या तटबंद्या पार करणाऱ्या या समाजासाठी अशा नातेसंबंधांमधलं मूल्य एकच- प्रत्येकाचा निरलस आनंद. त्यामुळे अशा नात्यांची अडवणूक नाही की त्यामध्ये कसली लपवालपवी नाही. आपल्या जोडीदाराला फसवणं, खोटं बोलून कुणाला दुःख देणं यावर तेवढी कडक बंदी. दोघांनी घरातली-बाहेरची सगळी रोजची कामं करावीत आणि एकमेकांना सारखा मान असावा एवढीच त्या नात्याकडून आईवडलांची अपेक्षा. 

हे सगळं जिला आपण ‘मुख्य धारा’ म्हणतो तिच्यासाठी इतकं आश्चर्यकारक, की बिगरआदिवासी माणसाला वाटावं की कुणी आपल्या मनाने रचून हे सारं सांगतं आहे. लैंगिकतेबाबतच्या या अशा मुक्त, उदार विचारांवरून लक्षात येतं, की आदिवासी समाज हा या ‘मुख्य धारे’पेक्षा किती प्रगत, परिपक्व आहे! या समाजामध्ये माणूस म्हणून कुणी कुणावर अधिकार गाजवायला जात नाही. आईवडील आपल्या मुलांचा, पुरुष आपल्या जोडीदाराचा ‘माणूस’ म्हणून जगण्याचा समान आदर ठेवतात आणि एका स्वतंत्र वृत्तीतून कितीतरी सकस परिपक्व नात्यांची सहज जपणूक होते. याउलट बिगरआदिवासींचा मुख्य धारा समाज हा जातीच्या पायऱ्यांना घट्ट धरून आहे. ‘लग्न हे दोन माणसांचं नाही, तर दोन कुटुंबांचं असतं’ हे पुन्हा पुन्हा बोललं जाणारं वाक्य हेच दाखवतं की इथे प्रत्येक माणसाच्या निरलस आनंदापेक्षा घर- भावकी- जातीच्या इज्जतीला कितीतरी अधिक महत्त्व आहे… आणि ही इज्जत त्या त्या घरच्या, त्या त्या जातीच्या बाईच्या शरीरामध्ये कोंडलेली आहे. इथे बाई माणूस नाही, ‘इज्जत’ साठवण्याची तिजोरी आहे. समाज तिला नाही, तिच्या शरीराच्या तिजोरीतल्या इज्जतीला जपू पाहतो. ती कायम कुणाच्या तरी मालकीची असते. कुणाच्या तरी कडक पहाऱ्याखालीच जगायचा प्रयत्न करत राहते. तिला स्वतःचं घर नाही, गाव नाही. तिच्या हिश्श्याला आकाशाचा तुकडाही नाही. बाई ही आजन्म विस्थापित, जाईल तिथे उपरी असते. 

लग्नाचा अंतिम उद्देश जिथे आपली संचित इज्जत टिकून राहण्यासाठी पुढची पिढी जन्माला घालणं आहे, तिथला पुरुष तरी कशाला शिकेल ‘प्रेम’ म्हणजे काय हे? इज्जत टिकवण्यासाठीच्या मर्दानी लढाया शिकत तो मोठा होतो आणि प्रत्येक नातं म्हणजे शक्ती आजमावण्याचा पैलवानी आखाडा होऊन जातो. आपलं पैलवान, ताकदवान असणं हाच त्याचा इथे राहण्याचा लायसन्स होऊन जातो. मग प्रत्येक ‘परकी’ स्त्री म्हणजे परका प्रदेश म्हणून समोर येते. तिच्या तिजोरीतली इज्जत ओरबाडून त्या परक्या प्रदेशावर आपल्या ‘मर्द’पणाचा झेंडा रोवण्याची त्याला असह्य अमानुष भूक लागते. प्रत्यक्ष बलात्कार करण्याच्या कितीतरी पूर्वीच पुरुषाचा राक्षस झालेला असतो. तो त्याच्या समोर आलेल्या शरीराचा चोळामोळा करताना त्या घराच्या, धर्माच्या, जातीच्या, समाजाच्या इज्जतीला चुरगाळून टाकत असतो. बलात्काराच्या गुन्ह्याला शिक्षा म्हणून काही अरब देशांमध्ये भरचौकात ताबडतोब फाशी दिली जाते, पण वर्षानुवर्षं तिथल्या बलात्कारांच्या दरांमध्ये लक्षणीय घट झालेली दिसत नाही. शिक्षेच्या दहशतीने नाही, तर सर्वांच्या समान स्वातंत्र्याचा आदर शिकवूनच काही होऊ शकतं. बलात्कार करणाऱ्याला समोरचा ‘माणूस’ दिसू शकत नाही. त्याच्यातला माणूस तर कधीचा मेलेला असतो.

जसिंता बोलत होती, तेव्हा तिच्या आजूबाजूला बसलेल्या मराठवाडा, विदर्भ- खान्देशापासून ते पुण्या- मुंबईकडच्या, गावातल्या आणि शहरातल्या सगळ्या मुलींच्या डोळ्यांसमोर मात्र हे एकच एकसारखं चित्र तरळत होतं. डोळे मोठे करून त्यातला मानवी प्रेमाचा अथांग अवकाश पाहायचा प्रयत्न करत असताना घाईघाईने मिटून टाकलेल्या पेपरमधल्या- टीव्हीवरच्या कितीतरी बातम्यांच्या हेडलाइन समोर ठाण मांडून बसायच्या. आपल्याच देशातला हा अनोखा स्वप्नलोक पाहताना आपल्या शिकण्यावर, चालण्या-बोलण्यावर, श्वास घेण्यावर गच्च चिकटलेली शेकडो बंधनं एकदम टोचू लागली. एकटीने रस्ता कापताना डोक्यात आपोआप सुरू होणारा धोक्याचा लाल दिवा आठवून स्वतःचीच दया येऊ लागली. 

इकडे जसिंता सांगत होती, की शरीरापलीकडचा माणूस पाहणं आमच्यासाठी सोपं आहे, कारण कुठल्याच शरीराची आम्ही तिजोरी किंवा कोठी केलेली नाही. अशी संस्कृती असलेल्या आदिवासी भाषेत ‘बलात्कार’ असा शब्दच नाही! लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सगळे नदीवर एकत्र आंघोळीला जातात. नदीच्या तटावर कधी कुणासाठी आडोसा धरावा लागत नाही. सगळे एका वाटेने नदीवर जातात आणि आपल्या गतीने न्हाऊन परततात. शरीर आणि मन दोन्ही इतकं स्वच्छ राहतं की कुणाच्या मनात परक्या शरीरासाठी छुप्या कुतूहलातून विकृत लालसा निर्माण होतच नाही. तरुण मुलंमुली एकत्र खेळतात, नाचतात, गातात आणि म्हातारी माणसंही त्यांच्याबरोबर ठेका धरतात. हातात हात धरून नाचणाऱ्या गोल साखळीचा सगळेच सारखा भाग असतात. नदी, जमीन आणि जंगल कुणा एकाच्या ‘मालकी’चं नसतं, तसं कुणाचं शरीर आणि मनही. ‘आमच्या घरात राहायचं तर आमच्या नियमांनी वागावं लागेल’, ‘जातीची इभ्रत राखली नाही तर जितं सोडणार नाही’, ‘आमच्या धर्माला असं बोलण्याची हिंमत केली काय, आता यांच्या पुरुषांच्या हातात बांगड्या भरतो’ असली वाक्यं ऐकल्यावर लक्षात येतं की मुख्य धारेच्या ‘सभ्य’पणाच्या, ‘संस्कृती’च्या बुरख्याखाली किती अमानवी हिंसा आहे. स्वतःला घट्ट गुंडाळून टाकणाऱ्या या समाजाला ‘प्रगत’ होण्यासाठी स्वातंत्र्याच्या पाश्चिमात्य कल्पना आयात करायची गरज नाही. डोळ्यावरची झापडं काढून पाहिलं तर आपल्याच आजूबाजूला, या जमिनीवर ताठपणे उभं राहून दोन्ही हात पसरून उदारपणे माणूसपणाला कवेत घेणारे मित्रमैत्रिणी सहज जागं करतात आणि जगण्यासाठीचं ‘चिरैयी- चिरकुटचं सोपं गाणं’ शिकवून जातात.

आदिवासी जगण्याला ‘असभ्य’ समजून त्यांना अनाठायी दाबणाऱ्या मुख्य धारेसमोर जसिंता शांतपणे आपली कविता ठेवते ः
वे हमारे सभ्य होने के इंतजार में हैं
और हम उनके मनुष्य होने के!

राही श्रु. ग.
rahee.ananya@gmail.com
लेखिकेचा संपर्क : ९०९६५८३८३२

बातम्या आणखी आहेत...