आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नयनतारा यांच्या समर्थनार्थ अनेक साहित्यिकांचा संमेलनावरच बहिष्कार; राज ठाकरेंनी दिले हे स्पष्टीकरण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • बहिष्काराऐवजी उपस्थित राहून ‘सुनावणार’ : लक्ष्मीकांत देशमुख

मुंबई/पुणे/नाशिक- काही राजकीय संघटनांच्या विरोधामुळे ज्येष्ठ साहित्यिक नयनतारा सहगल यांना यवतमाळ येथील अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे पाठवलेले निमंत्रण रद्द करणाऱ्या आयोजकांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या कृतीच्या निषेधार्थ संमेलनावरच बहिष्कार टाकण्याचा इशारा अनेक साहित्यिकांनी दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आपल्या पक्षाचा विरोध नसल्याची भूमिका जाहीर केली आहे.

 

इंग्रजी लेखिकेला मराठी संमेलनात बोलावल्याच्या मुद्द्यावरून मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी नयनतारा यांच्या संमेलनातील उपस्थितीवर आक्षेप घेऊन विरोध दर्शवला होता. त्यामुळे संमेलनात गोंधळ नको म्हणून आयोजकांनी त्यांना पाठवलेले निमंत्रण परत घेत असल्याचे रविवारी जाहीर केले होते. मात्र 2014 साली देशातील असहिष्णुतेविरोधात साहित्य अकादमीचा पुरस्कार परत करणाऱ्या नयनतारा यांच्या या संमेलनातील भाषणातही सरकारविरोधी टिप्पणी असल्यामुळेच त्यांचे निमंत्रण मागे घेण्यात आल्याची टीका सरकारवर होऊ लागली. दरम्यान, राज्यातील बहुतांश साहित्यिकांनी नयनतारा यांच्या समर्थनार्थ संमेलनावरच बहिष्कार घालण्याचा इशारा दिला आहे. अमोल पालेकर, तुषार गांधी, प्रज्ञा दया पवार, अच्युत गोडबोले, विद्या चव्हाण, विश्वास उटगी, स्मृती कोप्पीकर, किशोर कदम, इब्राहिम अफगाण, रा.रं. बोराडे, ऋषिकेश कांबळे यांच्यासह अनेक मान्यवरांचा त्यात समावेश अाहे.
 
‘नयनतारा न येण्यामुळे आयोजकांची अडचण दूर झाली आहे. मात्र, त्यांचे भाषण ही काही त्यांची अडचण दिसत नाही. प्रतिनिधी शुल्क भरून संमेलनाला येणाऱ्या रसिकांना सहगल यांचे विचार जाणून घेण्याचा पूर्ण हक्क आहे. त्यामुळे सहगल यांचे भाषण संमेलनाच्या उद‌्घाटन मंचावरून वाचले जावे,’ अशी मागणी प्रसिद्ध लेखक जयंत पवार यांच्यासह अन्य लेखकांनी केली आहे. तसेच  नयनतारा यांना अामंत्रण नाकारणे ही  महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी बाब असून त्याचा फ्रेंड्स ऑफ डेमॉक्रसी या संघटनेने तीव्र शब्दांत निषेध केला आहे.   
 
संमेलनात जाऊन भूमिका मांडणार : डॉ. अरुणा ढेरे  
नियोजित साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे यांनी मात्र ‘मी संमेलनाला जाणार आणि तिथेच भूमिका मांडणार’ अशी भूमिका घेतली आहे. तसेच मावळते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनीही ‘संमेलनावर बहिष्कार टाकण्याऐवजी मी उपस्थित राहून आयोजकांना ‘सुनावणार’ असल्याचे दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

 

संमेलनाचा वाद निरर्थक  : मुख्यमंत्री
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात उद‌्घाटक म्हणून कुणाला बोलवायचे आणि कुणाला नाही, याचा सर्वस्वी निर्णय साहित्य संमेलनाचे आयोजकच घेत असतात. त्यात राज्य सरकारची कोणतीही भूमिका नसते. तथापि यवतमाळ येथे आयोजित साहित्य संमेलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा उद‌्घाटक म्हणून निमंत्रण देण्याच्या आणि नंतर ते परत घेण्याच्या नाट्यावरून वाद उभे केले जात आहेत.  यात राज्य सरकारला गोवण्याचा प्रयत्नसुद्धा काही माध्यमे हेतुपुरस्सर करीत आहेत. साहित्य महामंडळ ही स्वायत्त संस्था आहे. त्यांच्या कुठल्याही निर्णयामध्ये मुख्यमंत्री अथवा राज्य सरकारचा हस्तक्षेप नसतो, त्यामुळे त्यात सरकारला गाेवण्याचा प्रयत्न करू नये, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री कार्यालयाच्या वतीने देण्यात आले.