आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • \'Writers Woke Up And Ask For Freedom\' Article By Jayant Pawar

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेखकांनो, उठा, स्वातंत्र्याचा जाब विचारा!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लेखन हा वेळ घालवणारा फुकाचा मामला नाही. ही गंभीर आणि नेटाने पूर्णत्वास नेण्याची सृजनप्रक्रिया आहे. या प्रक्रियेच्या केंद्रस्थानी विखंडित समाज आणि या समाजातला माणूस आहे. त्याच्याशी निगडित सत्य बाहेर येण्यासाठी आवश्यक लेखनस्वातंत्र्याची प्रस्थापित व्यवस्थांनी नेहमीच गळचेपी केली आहे. या   व्यवस्थांना थेट सवाल करण्याची अ.भा. मराठी साहित्य संमेलनासारखी दुसरी योग्य जागा आणि वेळ नाही, असा युक्तिवाद करत लेखकांचे, समष्टीचे आत्मभान जागवणारा हा विशेष लेख...

 

तेही दिवस साहित्य संमेलनाचे होते. देशात नवे वारे वाहू लागले होते. नेत्यांनी फुलवलेल्या धार्मिक आकांक्षांना नवे धुमारे फुटू लागले होते. मराठी साहित्य वर्तुळात आणि त्यातही साहित्य संमेलनीय परिघात त्याचे पडसाद उमटू लागले होते. साल होतं, १९९३. साताऱ्यात होणाऱ्या त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, नाटककार विद्याधर गोखले. काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले संमेलनाचे स्वागताध्यक्ष असले, तरी केसरिया लहर संमेलनात स्पष्टपणे दौडत होती. या संमेलनाच्या समारोप सोहळ्याआधीचा एक कार्यक्रम मात्र तिथल्या वातावरणाला अकस्मात नाट्यमय कलाटणी देणारा झाला. ज्येष्ठ श्रेष्ठ कवी विं. दा. करंदीकर यांच्या सत्काराचा तो कार्यक्रम होता. विंदांना मध्य प्रदेश सरकारचा ‘कबीर सन्मान’ प्राप्त झाला होता. त्या सत्काराला उत्तर देताना, कबीराचं नाव घेण्याची आपली लायकी नाही, हे त्यांनी सांगून टाकलं. आपल्या धारदार आवाजात ते कडाडले, ‘स्वातंत्र्योत्तर काळात आपल्या हातून जी पंचमहापातके झाली. त्यातलं गांधी हत्या हे पहिलं महापातक आहे आणि बाबरी मशीद पाडणं, हे पाचवं महापातक आहे.’ त्यानंतर संपूर्ण मंडप सून्न झाला.

 

विं. दा. करंदीकरांचं जन्मशताब्दी वर्ष सुरू आहे. हे वर्ष साजरं होत असताना, नेमकी ही आठवण सोयीस्कररीत्या विसरली गेली आहे, आणि नवं साहित्य संमेलन तोंडावर आलंय. अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या इतिहासात लक्षात राहाव्यात, अशा गोष्टी एकूणातच कमी आहेत. ग. त्र्यं. माडखोलकरांनी केलेला संयुक्त महाराष्ट्रचा ठराव, दुर्गा भागवतांनी संमेलनीय व्यासपीठावर अध्यक्षीय हस्तक्षेप करत जयप्रकाश नारायण यांना वाहिलेली श्रद्धांजली आणि विंदांची ती गर्जना, या त्यात लखलखीतपणे उठून दिसतात. विंदांनी त्यावेळी केलेलं भाकित आज अक्षरश: खरं ठरलं आहे. आपण त्या महाचुकीच्या परिणामस्वरूप अशा एका द्वेषपूर्ण कालखंडात आलो आहोत, जिथे संशयाचं भूत आपल्या कायम मानगुटीवर बसलं आहे. सार्वजनिक जीवनात आणि परस्पर मानवी संबंधांत आपण मोकळेपणा पूर्णपणे गमावून बसलो आहोत. लोकांचे समूह बघता बघता टोळ्यांमध्ये रूपांतरित झाले आहेत. वाद, मतभिन्नता यांना टोकाचे अर्थ प्राप्त झाले आहेत. आणि यात लेखक एकटा पडला आहे. तो झपाट्याने आपलं लिहिण्याचं स्वातंत्र्य गमावत चालला आहे. तसा तो लिहितोच आहे, जसा पूर्वी लिहीत होता. छापणारे छापत आहेत. वाचणारे वाचत आहेत. पण तो पूर्वीच्या मोकळेपणाने लिहीत नाही. लिहिलं तर छापणारे छापतीलच, याची गॅरेंटी नाही आणि छापलंच नाही, तर वाचणारे काय वाचतील?


 २०१४ मध्ये नवं सरकार देशात सत्तेवर आलं, तेव्हा ओरिएंट ब्लॅकस्वान, पेंग्विन इंडिया यांसारख्या मोठ्या प्रकाशन संस्थांनी स्वत:हून आपल्या आक्षेपार्ह ठरू शकतील अशा पुस्तकांची यादी करून त्यांच्या प्रती आपल्या दुकानातून नष्ट केल्या होत्या, हे ज्यांना ठाऊक आहे, त्यांना या विधानात जराही अतिशयोक्ती वाटणार नाही. पण आपण हे स्वातंत्र्य गमावत चाललो आहोत, याची लेखकांना खंत वाटते आहे का? आपल्या हरवत चाललेल्या अस्तित्वाची दुखरी बोच त्यांना सलते आहे का? एरवीही विचारता येणारा हा प्रश्न साहित्य संमेलनाच्या तोंडावर आवर्जून विचारलाच पाहिजे. 
 
आम्ही मराठी लेखकांनी आमचं स्वातंत्र्य सदैव गृहीत धरलं आणि ते कधीही नीट वापरलं नाही, ही गोष्ट खरी आहे. हे स्वातंत्र्य आम्हाला ज्यांच्या कृपेने मिळालं होतं त्या चक्रधर- ज्ञानेश्वर-तुकारामापासून फुले-आंबेडकर आणि सर्व समाजसुधारकापर्यंत आम्ही साऱ्यांचे गोडवे गायले, पण त्यांनी झेललेले त्रास आणि उपसलेले कष्ट यांचे मोल जाणलं नाही. वाडवडिलार्जीत कमाई बसून खावी, तसं हे स्वातंत्र्य काही न बोलता, कृती न करता आम्ही स्वस्थ बसून गंजवून संपवलं. आता ही पत संपल्यावर पुन्हा नव्याने पत निर्माण करण्याची पाळी आमच्यावर आली आहे. कारण संतांना, समाजसुधारकांना छळणारी सनातनी प्रवृत्ती जशीच्या तशी समोर आहे. ती संपलेली नाही, उलट ती आकार बदलत मोठी मोठी होत चालली आहे. तिने उभं केलेलं भयाचं बागुल कसं झुगारून द्यावं, हे लेखकांना कळेनासं झालंय.

 

अर्थात, हा प्रश्न ज्यांना डोळ्यांना दिसणारं, जाणवणारं आणि खुपणारं सत्य सांगायचं आहे, अशाच लेखक-कलावंतांबाबत आहे. पण असे लेखक- कलावंत मराठीत कमी नाहीत. नसावेत असं वाटतं. कारण दाभोलकर-पानसरे-कलबुर्गी यांच्या हत्येनंतर उभ्या राहिलेल्या ‘दक्षिणायन’ चळवळीत मराठी लेखक मोठ्या संख्येने सामील झाले होते. आज त्यातले काही लेखक पोलिस संरक्षणात वावरताहेत. केवळ चळवळीतच नव्हे, तर त्या बाहेरच्या लेखक-कवींवर समाजमाध्यमांतून ट्रोलधाडी येवून धडकत आहेत. देशभर लेखकांवर होणारे हल्ले थांबलेले नाहीत. ‘मंटो’ चित्रपटात आपल्यावरच्या अश्लिलतेच्या खटल्याला उत्तर देताना मंटो एक महत्वाचं वाक्य उच्चारतो, ‘जे आहे ते दाखवणं हे माझं काम आहे. पण तुम्हाला जर सत्य बघायचंच नसेल, तर तो तुमचा प्रश्न आहे.’ असं सत्य दाखवायची निकड असलेले लोक आज कमी असले, तरी नष्ट झालेले नाहीत. त्यांच्या स्वातंत्र्याचा हा प्रश्न आहे.

 

आज देशातल्या कुठल्याही नाक्यावर उभा असलेला बेकार तरुण आपल्याला नसलेल्या रोजगाराची चिंता करत नाही, तर ‘राम मंदिर कधी होणार?’ हा एकच प्रश्न विचारत असतो. वृंदावनात सोडलेल्या अनाथ विधवा स्त्रियांप्रमाणे गावोगावी भाकड गायींचे तांडे फिरत असतात. त्यांना जगवण्याची फिकीर तर सोडाच, उलट त्यांच्या कथित मारेकऱ्यांचे लचके तोडण्यासाठी गरम माथ्याच्या युवकांचे जत्थे संशयाने चौखूर धावत असतात. गावातल्या उगवत्या पिढीसाठी ते आदर्श बनतात. त्यांना आणि कुणालाच सत्य बघायचं नाहीये. काही दिवसांपूर्वी चित्रपट अभिनेता नसिरुद्दीन शाह यांनी, ‘एका पोलिस अधिकाऱ्याच्या मृत्यूपेक्षा गायीचा मृत्यू मोठा ठरतो आहे’, असं विधान केल्याने गदारोळ माजला होता. नसिर यांनी दगड अचूक भिरकवल्यामुळे मोहोळ उठलं. पण त्यांनी उच्चारलेलं पुढचं वाक्य महत्वाचं होतं. ते म्हणाले, ‘मला या गोष्टींची भीती वाटत नाही. राग येतो. आणि योग्य विचार करणाऱ्या माणसाला राग यावा, भीती वाटता नये.’ लेखकांनाही त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेणाऱ्या प्रवृत्तींचा राग यायला हवा, भीती वाटता नये. त्यांनी याचा जाब विचारला पाहिजे.

 

पण जाब कोणाला विचारावा?
जाब कोणाला विचारावा हा कळीचा प्रश्न आहे. कारण लेखकाचं स्वातंत्र्य हिरावून घेण्याची क्षमता आज समाजातला प्रत्येक घटक राखून आहे. तामिळनाडूतल्या तिरूचेनागोडू गावातल्या धार्मिक हिंदूंनी पेरूमल मुरूगनच्या कादंबरीवर आक्षेप घेतला, पुलियूर मुरूगेसनच्या कादंबरीतल्या आक्षेपार्ह भागावर चिडून स्थानिक कोंगुवेल्लालर या समाजाने त्याचे हात-पाय तोडले, नाटककार हबिब तन्वीर यांच्या ‘चरणदास चोर’ या नाटकावर छत्तीसगडमधल्या सतनामी पंथाच्या लोकांनी हल्ला केला, केरळच्या एस. हरीश या लेखकाला ‘हिंदू ऐक्य वेदिके’ या संघटनेच्या लोकांनी धमकावलं, आनंद यादवांच्या कादंबरीवर बंदी आणण्यासाठी वारकरी पंथाने आंदोलन केलं, तर दिनकर मनवरच्या कवितेच्या विरोधात सर्व विद्यार्थी संघटना आणि आदिवासी संघटनांनी उठाव केला. कोणीही उठावं आणि आपल्या दुखावलेल्या भावनांचं अवडंबर करून लेखक-कलावंतांना वेठीला धरावं, परिस्थितीअसताना जाब कोणाला विचारावा हा मोठाच सवाल आहे. पण याचं उत्तर आहे, जाब दोघांना विचारावा. एक, स्वत:लाच जाब विचारावा किंवा दोन, राज्यकर्त्यांना जाब विचारावा. आपल्या अनवस्थेला आपणच जबाबदार असतो म्हणून आपल्यालाच आपण प्रश्न केले पाहिजेत. पुण्यात ‘दक्षिणायन’ने आयोजित केलेल्या पेन इंटरनॅशनल या लेखकांच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या साहित्य महोत्सवात मनवर याच्या कवितेवर आणलेल्या बंदीचा आणि त्याच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा विषय मागणी करूनही आयोजकांनी चर्चासत्रातून का डावलला, गणेश देवी आणि आदिवासी यांच्या संबंधांत बाधा येवू नये म्हणून का, हा प्रश्न लेखकांनी आपापसात न कुजबुजता थेट दक्षिणायनला विचारला पाहिजे आणि ‘दक्षिणायन’नेही त्याचं उत्तर दिलं पाहिजे. अशी चर्चा टाळल्याने ‘दक्षिणायन’ने स्वत:च्याच भूमिकेला छेद दिला आहे.

 

लेखक आपल्या अभिव्यक्तितून जे दर्शन घडवतो, त्यातून दमनकारी शक्तींचं राजकारण उघड करीत असतो. या शक्ती राजसत्ता, धर्मसत्ता आणि अर्थसत्ता या तीन व्यवस्थामध्ये वास करत असतात. त्यांना असा लेखक सलत असतो. पण लोकशाही व्यवस्थेमध्ये राजसत्ता हीच सर्वात मोठी असते आणि धर्मसत्ता व अर्थसत्ता तिच्याशी साटलोट ठेवून असतात. राजसत्ता कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष लेखकांच्या अभिव्यक्तीवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे लेखाकावर हल्ले होताना सत्ताधाऱ्यांनी साळसूदपणे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उदो उदो केला, तरी छुपेपणे ते हल्लेखोरांना पाठीशी घालत असतात.

 

‘दक्षिणायन’च्या काही लेखकांवर गेले काही महिने पोलिस संरक्षणातून फिरण्याची पाळी आली आहे. त्याचं  मूळ, गौरी लंकेश यांच्या वरील खूनी हल्ल्यातल्या ज्या संशयिताला बंगळूरमध्ये पकडलं त्याच्याकडे सापडलेल्या ३५ लेखकांच्या यादीत आहे. हा संशयित सनातन संस्थेचा कार्यकर्ता असल्याचं उघड झालं आहे. हे ३५ लेखक त्या संशयित मारेकऱ्याच्या हिटलिस्टवर होते. ही लिस्ट गोव्यात झालेल्या ‘दक्षिणायन’च्या मेळाव्यानंतर तयार झाली असणार, कारण त्यात गोव्यातील अनेक लेखकांची नावं आहेत. त्यातलं एक नाव प्रसिद्ध कादंबरीकार दामोदर मावजो यांचं आहे. मावजो म्हणाले, मला पोलिस संरक्षण नको. त्यावर गोवा विधानसभेत मोठी चर्चा झाली आणि पोलिस संरक्षण घेण्यासाठी मावजो यांना भाग पडण्यात आलं. तीच गोष्ट महाराष्ट्रात झाली. म्हणजे इथे विधी मंडळात चर्चा झाली नाही, पण तुम्ही पोलिस संरक्षण नाकारू नका, अशी पोलिसांतर्फेच लेखकांना गळ घालण्यात आली. म्हणजे, लेखकांना धोका आहे हे स्वत: पोलिस म्हणजेच सरकार मान्य करतंय. हा धोका सनातन संस्थेच्या माणसाकडे सापडलेल्या यादीतल्या नावांना आहे, याचा अर्थ काय होतो? सनातन ही धर्मप्रसार करणारी संस्था आहे आणि सत्ताधारी तिला पाठीशी घालतात. तिच्यावर बंदी आणण्याचा विषय टोलवला जातो. या सगळ्यातच विसंगती नाही का? मग या विसंगतीचा जाब लेखक सत्ताधाऱ्यांना का विचारत नाहीत? तुम्ही आम्हाला लिहिण्या-बोलण्यासाठी भयमुक्त वातावरण देणार आहात की नाही, ते सांगा. त्यासाठी तुमचं कल्याणकारी राज्य काय पावलं उचलणार आहे ते सांगा. आम्हाला तुमचे पुरस्कार नकोत (तेही जनतेच्याच पैशातून दिले जातात.), आम्हाला तुमची पोलिस संरक्षणाची नजरकैद नको, आम्हाला राज्यघटनेने दिलेला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हक्क हवा आहे, तो आम्हाला बाजवता आलाच पाहिजे, त्या विरोधात आडवे येणारे लोक, संघटना, समाजगट आणि खुद्द सरकारी यंत्रणा यांचे अडथळे तुम्ही कसे रोखणार आहात ते सांगा. लेखक एकटा असतो, त्यामुळे त्याला कधीही कसंही चिरडता येतं, हा दृढ झालेला सार्वत्रिक समज खोटा ठरवण्यासाठी तुम्ही काय करणार आहात ते सांगा. 

     
येत्या आठवड्यात यवतमाळ येथे भरणारं ९२वं साहित्य संमेलन हे हे प्रश्न विचारण्याची योग्य जागा आहे. अर्थात संमेलन हे एक निमित्त आहे, एरवी, हे प्रश्न कायमच कोणत्याही वेळी आणि कोणत्याही स्थितीत धसास लावले पाहिजेत. पण संमेलनात मान घ्यायला का होईना, पण मुख्यमंत्री येतात, संस्कृतिक कार्य मंत्री येतात. कोणीतरी मंत्री सरकारकडून येतोच येतो कारण सरकार संमेलनाला अनुदान देतं. त्यामुळे सरकारचं दातृत्व ठसवण्यासाठी, साहित्यिकांची महती गाण्यासाठी आणि त्यांना उपदेश करण्यासाठीही सरकारी प्रतिनिधी संमेलनाला येतात. बोलतात, पण भयमुक्त वातावरणाबद्दल चकार शब्द काढत नाहीत. अशावेळी लेखकांनी त्यांना प्रश्न विचारून उत्तरदायी बनवलं पाहिजे. आदिवासी कार्यकर्ते आणि कवी वाहरू सोनवणे यांची एक कविता आहे. त्यात रात्री उपाशीपोटी झोपण्याचा प्रयत्न करत तळमळत पाडलेल्या पोरांना उद्देशून कवी म्हणतो, पोरांनो झोपू नका. उठा. तुम्ही उपाशी का, तुम्हाला भाकर का मिळाली नाही, याचा तुमच्या आईबापाला जाब विचारा. त्यांना झोपू देवू नका.


आजच्या लेखकांना हेच सांगायला पाहिजे, झोपू नका. उठा, तुमच्या स्वातंत्र्याच्या हक्काचा सत्तेला जाब विचारा. त्यांना झोपू देवू नका!

 

(साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त कथाकार, आघाडीचे नाटककार आणि समीक्षक असलेले जयंत पवार या पुरवणीत मासिक स्वरूपाचे लेखन करणार आहेत.)