Home | Maharashtra | Western Maharashtra | Ahmednagar | Wrong order about 'EVM' in the name of Election Commission

निवडणूक आयोगाच्या नावाने 'इव्हीएम'बाबत बनावट आदेश; अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फिर्याद

प्रतिनिधी | Update - Aug 15, 2018, 11:38 AM IST

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नावाने जिल्हा प्रशासनाला बनावट आदेश दिल्याचा

 • Wrong order about 'EVM' in the name of Election Commission

  नगर- इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र (इव्हीएम) घोटाळ्याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या नावाने जिल्हा प्रशासनाला बनावट आदेश दिल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी समोर आला. याप्रकरणी नायब तहसीलदार संजय परदेशी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला. इव्हीएमच्या गैरवापरामुळे आपले राष्ट्र व लोकशाही धोक्यात आली आहे. या घोटाळ्याबाबतचा परिणामकारक अहवाल ३० दिवसांत सादर करा, असे या बनावट आदेशात म्हटले आहे.


  हा बनावट आदेश नवी दिल्ली येथील मुख्य निवडणूक आयोगाकडून जिल्हा प्रशासनाला ३ मे रोजी मिळाला. त्यात म्हटले आहे, या आदेशान्वये कळवण्यात येत की, इव्हीएमच्या गैरवापरामुळे राष्ट्र व लोकशाही धोक्यात आली आहे. नागरिकांमध्ये इव्हीएम घोटाळ्याबाबत चर्चा सुरू आहे. इव्हीएममध्ये दोष असेल तेथे गोपनीय पोलिस चौकशी नेमून या घोटाळ्याबाबतची चौकशी करावी. जर इव्हीएममध्ये घोटाळा होण्याची शक्यता असेल, तर आगामी २०१९ ची लोकसभा निवडणूक व इव्हीएमच्या घोटाळ्याबाबत परिणामकारक अहवाल ३० दिवसांच्या आत सादर करावा. जेणेकरून बॅलेट पेपरनुसार मतदान घेणे शक्य होईल. मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेणे विश्वासार्ह होईल िकंवा नाही, याबाबत आपला स्पष्ट अभिप्राय कळवावा, असे त्यात म्हटले होते. हा आदेश बनावट असल्याचा खुलासा निवडणूक आयोगाने १२ मे रोजी पत्राद्वारे केला. ज्या ठिकाणी असे बनावट आदेश आले असतील, तेथे संबंधितांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून अहवाल सादर करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. जिल्हा प्रशासनाने बनावट आदेश पाठवणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या बनावट आदेशामुळे जिल्हा प्रशासन व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची धांदल उडाली होती. या प्रकरणाचा पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक चव्हाण करत आहेत.


  प्रशासनाला उशिरा जाग
  जिल्हा प्रशासनाला प्राप्त झालेला हा बनावट आदेश पोस्टाने आला आहे. हा आदेश पाठवणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश खुद्द निवडणूक आयोगानेच जिल्हा प्रशासन व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याला दिले. मात्र, अडीच महिन्यांनंतर प्रशासनाने पोलिसांकडे फिर्याद दिली. फिर्याद देण्यासाठी निवडणूक शाखेतील जबाबदार अधिकाऱ्यांऐवजी नायब तहसीलदार परदेशी यांना प्राधिकृत करण्यात आले.


  पोलिसांचाही उडाला गोंधळ
  नायब तहसीलदार परदेशी हे बनावट आदेशाबाबत फिर्याद देण्यासाठी कोतवाली पोलिस ठाण्यात आले. यावेळी तक्रार अर्ज पाहून पोलिसांचाही गोंधळ उडाला. निरीक्षक नितिनकुमार गोकावे यांनी वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन मंगळवारी दुपारी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात फसवणूक व बनावट कागदपत्र तयार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपासाचे मात्र मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Trending