Home | Editorial | Columns | Yamaji Malkar article on politicians

राजकीय नेत्यांचे गुंतवणूक बदल देशाच्या फायद्याचे

यमाजी मालकर | Update - Apr 16, 2019, 10:19 AM IST

देशातील आर्थिक व्यवहार पारदर्शी होण्यास मदत होईल

  • Yamaji Malkar article on politicians

    निवडणूक लढवणाऱ्या नेत्यांना उमेदवारी अर्ज भरताना आपली संपत्ती जाहीर करणे बंधनकारक आहे, त्यामुळे सर्व नेते आपली संपत्ती जाहीर करत आहेत आणि त्यावर देशात चर्चा होते आहे, ही चांगली गोष्ट आहे. दोन निवडणुकांच्या दरम्यान ही संपत्ती किती वाढली, हे त्यामुळे जनतेला कळू लागले आहे, पण संपत्ती जाहीर करण्याच्या या नियमामुळे आणखी एक बाब समोर येऊ लागली आहे. ती म्हणजे पूर्वी फक्त शेती, जमीन, सोने अशा अचल संपत्तीचा त्यात भरणा असे. आता मात्र त्यात बँकेतील एफडी, म्युच्युअल फंड, कंपन्यांचे शेअर्स याची भर पडली आहे. म्युच्युअल फंड, कंपन्यांचे शेअर्स अशा चल संपत्तीमध्ये गुंतवणूक करावयाची की नाही, हा वैयक्तिक निवडीचा मुद्दा आहे. मात्र, देशातील उद्योग आणि व्यवसायासाठी देशातच भांडवल उभारणी झाली पाहिजे आणि बँकेचे व्याजदरही कमी झाले पाहिजेत, असे जेव्हा आपण म्हणतो, तेव्हा जास्तीत जास्त पैसा बँकेत आला पाहिजे आणि तो फिरता राहिला पाहिजे, हे ओघाने आलेच. त्यामुळे जमीन आणि सोन्याऐवजी भारतीयांनी म्युच्युअल फंड, शेअर बाजार, विमा, निवृतिवेतनाच्या योजनांत गुंतवणूक केली पाहिजे. सर्वसामान्य नागरिक हे राजकीय नेते आणि अभिनेत्यांचे अनुकरण करत असतात, या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांच्या गुंतवणुकीच्या बदलत्या सवयी महत्त्वाच्या असून त्या देशाच्या हिताच्या आहेत.
    भाजपचे अध्यक्ष अमित शहा, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपले उमेदवारी अर्ज दाखल करताना हा बदल समोर आला. अमित शहा यांनी गांधीनगरला उमेदवारी अर्ज भरताना प्रतिज्ञापत्रात नमूद केल्याप्रमाणे १७.५६ कोटी रुपये शेअरमध्ये गुंतवले आहेत, तर वायनाडला उमेदवारी अर्ज भरताना राहुल गांधी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार ५.१९ कोटी रुपये शेअर बाजारात अप्रत्यक्ष गुंतवणूक असणाऱ्या म्युच्युअल फंडांत गुंतवले आहेत. अभिनेते अमिताभ बच्चन हे तर शेअर बाजारात गुंतवणूक करण्याविषयी प्रसिद्धच आहेत. जेवढा पैसा त्यांनी अभिनेते म्हणून कमावला आहे, त्यापेक्षा अधिक पैसा ते शेअर बाजारातून कमावत आहेत. बिटकॉइन आणि ब्लॉकचेन हे नवे मार्गही बच्चन यांनी अनुसरले आहेत. केवळ हे तिघेच नव्हे, तर संपत्ती जाहीर करण्याची जेव्हा जेव्हा वेळ येते, तेव्हा तेव्हा भारतीय नेते शेअर आणि म्युच्युअल फंडासारख्या चल संपत्तीचे धनी आहेत, असे लक्षात येऊ लागले आहे. हा बदल चांगला आहे. कारण ही संपत्ती पारदर्शी आहे. ती एकाच ठिकाणी अडकून राहत नाही. ती सारखी फिरत राहते. त्यातून काही ना काही निर्मिती होत राहते, जी आपल्या देशाची गरज आहे. पैसा पारदर्शी आणि फिरता ठेवणाऱ्या गुंतवणुकीचा स्वीकार करणाऱ्या नागरिकांची संख्या देशात नोटबंदीनंतर वेगाने वाढली आहे. या बदलात अधिकाधिक राजकीय नेतेही सहभागी होतील, तेवढे देशातील आर्थिक व्यवहार पारदर्शी होण्यास मदत होईल.

    यमाजी मालकर ymalkar@gmail.com

Trending