आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैशीकरणाच्या मैदानातील भारत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कागदी नोटा किंवा पैशीकरणाचे अर्थकारण जगाने भारतावर लादले आहे. त्याचा स्वीकार करून काही भारतीयांनी श्रीमंती आणि समृद्धी मिळवली. पण संपत्तीचे व्यापक आणि 
न्याय्य वितरण होत नाही, तोपर्यंत भारत या मैदानात जगाशी मुकाबला करण्यास सक्षम होऊ शकत नाही. संपत्तीच्या वितरणाचे जे मार्ग सध्या अवलंबले जात आहेत, त्यांना त्यासाठी गती देण्याची गरज आहे.   

 

दारिद्र्याचे चित्रण किती चांगले केले जाऊ शकते, यासाठी परवा झळकलेल्या नाळ सिनेमापासून अनेक सिनेमे, नाटके, कथा, कादंबऱ्या आपल्याला उपलब्ध आहेत. खरोखरच खेड्यापाड्यात अशी परिस्थिती आहे का, खरोखरच प्रवासासाठी इतकी यातायात करावी लागते का, जातीयवादाचे भूत अशा स्वरूपात जिवंत आहे का, असे शहरी श्रीमंत नागरिकाला अशा कलाकृती पाहून, वाचून वाटते. स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर आपल्या देशात अशी स्थिती आहे, याची जाणीव होण्यासाठी खरे म्हणजे आजूबाजूला डोळे उघडे ठेवून पाहिले तरी पुरेसे आहे. पण त्याचे गांभीर्य अशा काही कलाकृतीमधून जास्त लक्षात येते, ही वस्तुस्थिती आहे. पण या कलाकृती दारिद्र्याचे नुसतेच चित्रण करतात आणि एखाद्या सूडकथेची फोडणी देऊन तो विषय तेथेच सोडून देतात.त्यात अंतिमत: मनोरंजन असते, त्यामुळे त्याची चर्चाही खूप होते. पण मूळ मुद्दा तसाच राहतो, जो जागचा हलत नाही. तो मुद्दा म्हणजे ही स्थिती काय केले तर बदलेल? तो बदल नेमका काय आहे, याविषयी मात्र पुरेशी चर्चा क्वचितच होते.  

 

जे गरीब आहेत, त्यांच्याकडे काय नाही आणि जे श्रीमंत आहेत, त्यांच्याकडे काय आहे, याचे अगदी सरळसाधे उत्तर आहे ते म्हणजे पैसा. कोण काय करतो, यापेक्षा कोण किती पैसा कमावतो, या निकषाला सर्वोच्च महत्त्व आले आहे. त्यामुळेच नाती तयार करणारा विवाह असो की समाजातील प्रतिष्ठा असो, ती या ना त्या मार्गाने पैसा आणि संपत्तीला जोडली जाते आहे. खरे म्हणजे ज्याच्याकडे शहाणपण आहे, त्याला समाजात प्रतिष्ठा मिळायला हवी, पण तसे होतेच असे नाही. याचे कारण जगापाठोपाठ भारतीय समाजाचेही आता पैशीकरण झाले आहे.

 

धनधान्य, जमीन, झाडे, गुरेढोरे, पाणी हीच जेव्हा संपत्ती होती, तेव्हा असे पैशीकरण झालेले नव्हते. वस्तूंचीच देवघेव होत असल्याने (बार्टर) त्यात रिअल व्हॅल्यूच्या बदल्यात रिअल व्हॅल्यू मिळत असे. पण शेतसारा रुपयात घेतला जाऊ लागला आणि पैशीकरणाची सुरुवात झाली. आता या बदलालाही सुमारे पावणे दोनशे वर्षे झाली. अंतिमत: कागदी नोटांचे महत्त्व वाढत जाणार आहे, हे ज्यांनी ओळखले, त्यांनी आपल्या जीवन जगण्याचे मार्गच बदलून घेतले. ज्यातून थेट पैसे मिळतात, ते आता केले पाहिजे, हे त्यांना कळले होते. त्यामुळेच उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी हा सुविचार आता पूर्ण उलटा झाला आहे. मुद्दा असा आहे की, हे केवळ भारतात झाले आहे की जगातही हा बदल असाच झाला आहे? या प्रश्नाचे उत्तर आहे, ज्या विकसित जगाकडे आज आपण आशाळभूतपणे पाहतो, त्या जगात हा बदल आधी झाला आणि ब्रिटिशांच्या राजवटीमुळे तो बदल वेगाने भारतात आला.

 

शेतीप्रधान देश असूनही आपला देश हा बदल रोखू शकलेला नाही. त्यामुळे सारे काही असूनही केवळ कागदी डॉलर नाही, म्हणून आपल्याला १९९१ ला जागतिकीकरण स्वीकारावे लागले. खरे म्हणजे आपल्यावर ते लादले गेले. थेट संपत्तीची निर्मिती करणाऱ्या एवढ्या मोठ्या देशात जगाला सहजपणे प्रवेश मिळाला. केवळ आकडेमोड करून पैसे कमावले जाऊ लागले. हे येथे जे इंग्रजांनी १५० वर्षांपूर्वी केले होते, त्यालाच जागतिकीकरणाने आणखी गती दिली.  


जागतिकीकरणानंतरच्या २६ वर्षांत आणि पर्यायाने नव्या शतकात भारतातील असंघटित वर्ग या नव्या बदलात भरडून निघाला आणि त्या वर्गातून संघटित वर्गात आलेल्या कोट्यवधी भारतीयांनी एका वेगळ्या अर्थाने जागतिक नागरिकत्व स्वीकारून टाकले. त्यांनी पैशीकरण १०० टक्के मान्य केले. त्यांनी भांडवली बाजाराची व्यवस्था स्वीकारली. देशाच्या तिजोरीत रुपये असण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व डॉलर असण्याला आहे, हे त्याने समजून घेतले. त्या डॉलरशिवाय कोट्यवधींनी खपत असलेल्या गाड्या चालवण्यासाठी लागणारे इंधन, आपण प्रेमात असलेले सोने आणि ज्या तंत्रज्ञानावर जग स्वार होते आहे, ते तंत्रज्ञानही भारत आयात करू शकणार नाही, हे भारतीयांच्या लक्षात येऊ लागले. विकसित जगाच्या संपत्तीचे वाटेकरी व्हायचे असेल तर देश सोडावा लागेल आणि बाहेर जाऊन डॉलर कमवावे लागतील, हे त्यांनी केवळ स्वीकारलेच नाही तर जगात सर्वाधिक रिमिटन्स आणणारा समूह म्हणून तो पुढे आला.

 

अर्थव्यवस्था संघटित व्हावी आणि तिचे शुद्धीकरण व्हावे, यासाठीची जगातील सर्वात मोठी नोटबंदीही त्याने पचवली. संपत्तीच्या वितरणासाठी करपद्धतीतील बदल जगाने अपरिहार्य मानले आहेत, त्यात तो आज जीएसटीपर्यंत पोचला आहे. क्रयशक्तीच नाही म्हणून जगाने दीर्घकाळ दुर्लक्ष केलेल्या या देशात, या सगळ्या बदलांमुळे व्यवसाय करण्यासाठी स्पर्धा लागली आहे.  


निकष कोणताही घ्या, विकास दरवाढीचा घ्या, हवाई वाहतुकीचा घ्या, मेट्रोच्या उभारणीचा घ्या, रस्तेबांधणीचा घ्या, सौरऊर्जेचा घ्या किंवा अगदी पुतळ्याच्या उंचीचा घ्या, भारतीय समूह आज दमदार वाटचाल करतो आहे. मध्यंतरी इंधनाची दरवाढ आणि रुपयाच्या घसरणीमुळे भांडवली बाजाराचीही पीछेहाट होऊ लागली होती. पण १३५ कोटी ग्राहक, काम करणारे किमान ४५ कोटी नागरिक आणि सर्वात तरुण असलेल्या या देशात आता अशी पीछेहाट तात्कालिक असणार आहे, हे नक्की. या पीछेहाटीची चिंता जणू जगालाही असावी. नाही तर इंधन दरवाढीचा फटका बसत असताना इराणकडून तेल घेण्याची भारताला अमेरिकेकडून सूट का मिळावी? तेल उत्पादन वाढीबाबत रशिया, अमेरिका आणि सौदी अरेबियात एकमत का व्हावे? पैसा गुंतवण्याची संधी शोधत जपानच्या सॉफ्ट बँकेने भारतात शोध का घ्यावा? विकासदरात पुढील दोन वर्षे तरी भारतच चीनसह सर्व जगाच्या पुढे असेल, असे अंदाज आर्थिक संस्थांनी जाहीर का करावेत? तसा तो अधिकृत आकडा ३० नोव्हेंबरला प्रसिद्ध होईलच.  


एवढे सर्व चांगले चालले असताना आम्ही अडले कोठे आहोत? अडण्याचे एकच कारण आहे. ते म्हणजे आपण जगाच्या कागदी नोटा तर स्वीकारल्या, पण त्याचे तत्त्व स्वीकारले नाही. त्याला चलनाचे तत्त्व म्हणतात. चलन हे विनिमयाचे माध्यम आहे. ती वस्तू नाही. चलन नेहमी चालतच राहिले पाहिजे. हाच मुद्दा वेगळ्या पद्धतीने मांडायचा तर जो खेळ आपण खेळतो, तो खेळण्याचे नियम तो खेळ खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना सारखेच लागू असतात. जगाने पैशीकरणाचा खेळ मांडला आहे तर त्याचेही तसेच नियम आहेत. तो खेळला पाहिजे, याला आता पर्याय राहिलेला नाही. बँकिंग करणे, डिजिटल व्यवहार करणे, गुंतवणुकीचे नवे मार्ग स्वीकारणे, पतसंवर्धन करून देशातील सर्वांची क्रयशक्ती वाढवणे आणि आजच्या जगाची निर्मिती ज्या भांडवलावर अवलंबून आहे, ते भांडवल विकसित जगात आहे, तसे स्वस्त करणे, असे काही या खेळाचे नियम आहेत. जे हे नियम पाळतात, ते पैसे कमावतात, असे दिसते आहे. ज्यांनी हे नियमच समजून घेतले नाही, त्यांना किमान त्याची जाणीव करून देण्याची गरज आहे.

 

या महाकाय देशासमोरील आव्हाने फार मोठी आहेत आणि त्यांचा मुकाबला जगाने लादलेल्या अर्थव्यवस्थेच्या मैदानावर नियमांनी खेळ करूनच केला जाऊ शकतो. त्यामुळे त्या मैदानावर जेवढे जास्त भारतीय त्याचा स्वीकार करून उतरतील तेवढा देश मजबूत होण्यास मदत होईल.

 

यमाजी मालकर
ज्येष्ठ पत्रकार
ymalkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...