आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय प्रवाससेवेतील ‘ऑटो अपग्रेड’

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय नागरिकांना मिळणाऱ्या सेवा विकसित देशांच्या तुलनेत दर्जेदार नाहीत, ही वस्तुस्थितीच आहे. पण त्या वापरणाऱ्यांची प्रचंड संख्या लक्षात घेता त्यात होणाऱ्या सुधारणांचे महत्त्व कमी मानता येणार नाही. देशातील प्रवासी सेवांत अलीकडे होत असलेल्या सकारात्मक बदलांचे हे चित्र.

 

आपल्या देशातील प्रवासाच्या सेवासुविधांविषयी आपण बोलू लागलो की त्या कशा दर्जेदार नाहीत, यावर बहुतेकांचे एकमत होते. विकसित जगाच्या तुलनेत त्या तेवढ्या दर्जेदार नाहीत, हे खरेच आहे. पण आपल्या देशातील प्रवास करणाऱ्यांची संख्या लक्षात घेतली की, आपला प्रवास असा का आहे, याचा उलगडा होण्यास मदत होते. केवळ प्रवासच नाहीतर भारतातील सर्व सेवांचे असेच आहे. कोणत्याही विकसित देशांशी तुलना करता त्या तेवढ्या चांगल्या नाहीत. त्याचे सर्वात मोठे कारण आहे, ती आपल्या देशाच्या लोकसंख्येची घनता. ती आहे तब्बल ४२५! म्हणजे भारतात दर चौरस किलोमीटरला ४२५ लोक राहतात. आपण तुलना करतो अशा सर्व विकसित देशांच्या लोकसंख्येची घनता जाणून घेतली की (उदा. अमेरिका - ३३, चीन – १५०, ब्रिटन - २७२, जर्मनी - २३२, फ्रान्स - १२४, कॅनडा - ४, ऑस्ट्रेलिया - ३) कदाचित आपल्याला आपण या दाटीवाटीत खूपच चांगले राहतो, असे म्हणायला लागू. अर्थात, आपण तसे म्हणण्याची काही गरज नाही.

 

पण त्या मर्यादांची जाणीव असली पाहिजे, एवढे मात्र नक्की. आपल्या देशातील साधनसंपत्तीचे वाटप इतक्या मोठ्या संख्येने राहणाऱ्या नागरिकांत करणे, हे एक मोठेच आव्हान आहे. त्या आव्हानाला भिडले पाहिजे, याविषयी दुमत असूच शकत नाही. मात्र ऊठसूट देशातील नागरिकांना आणि सेवांना बदनाम करण्यातही काही शहाणपणा नाही, एवढे नक्की.  
अगदी प्रवासाचेच उदाहरण घेतले तर भारतातील प्रवासाचा दर्जा कसा बदलतो आहे, ही सेवा प्रवास करणाऱ्यांच्या नव्या गरजांचा कसा विचार करू लागली आहे, हे लक्षात येते. त्याचे आपल्या जवळचे उदाहरण म्हणजे तालुक्याच्या गावांपर्यंत शिवशाहीच्या रूपाने प्रथमच पोचलेल्या वातानुकूलित बसगाड्या. त्या कदाचित खूप चांगल्या चालत नसतील, पण वातानुकूलित बसगाड्यांची गरज यानिमित्ताने मान्य केली गेली, हे फार महत्त्वाचे आहे. पुणे, मुंबई, औरंगाबाद, नाशिक ही शहरे तर शिवनेरीने फार पूर्वीच जोडली गेली अाहेत. त्यांना सध्या अतिशय चांगला प्रतिसाद मिळतो आहे. आज हे महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकसारख्या औद्योगिक विकसित राज्यांपुरते मर्यादित असेल, पण त्याचा विस्तार होतो आहे, हे महत्त्वाचे.

 

रेल्वेसेवेत तर गेले काही वर्षे आमूलाग्र बदल होताना दिसतो आहे. दिल्ली ते आग्रा सुरू झालेली गतिमान एक्स्प्रेस असेल, मुंबई-पणजी दरम्यान सुरू झालेली तेजस एक्स्पेस असेल किंवा शताब्दी गाड्यांची जागा घेणारे देशी बनावटीचे ट्रेन १८ नावाचे हे रेक प्रवाशांना वेगवान आणि सुखद प्रवासाचा अनुभव देणार आहेत. शताब्दी गाड्यांचा वाढलेला वेग आणि वाढलेल्या सोयी असतील आणि इतरही काही सोयी आहेत, ज्या अपग्रेड होत आहेत. भारतीय रेल्वेचे एक वेगळेच रूप पाहायला मिळते आहे. उशीर होण्याबाबत एकेकाळी बदनाम असलेली रेल्वे आता लांब पल्ल्याच्या प्रवासातही काही मिनिटांच्या फरकाने अंतिम स्थानक गाठू लागली आहे. अनेक रेल्वेस्टेशन आणि रेल्वेगाड्यांत स्वच्छता दिसू लागली आहे. जे दोन गावांतील प्रवासाचे तेच महानगरांतील मेट्रो सेवेचे. राजधानी दिल्लीत दररोज २७ लाख प्रवासी मेट्रोने प्रवास करू लागले आहेत आणि मेट्रोचा या शहरातील विस्तार आता ३०० किलोमीटरपर्यंत पोचला आहे. परवा म्हणजे ३१ ऑक्टोबर रोजी त्यात १७.८६ किलोमीटरची भर पडेल. १६ वर्षांपूर्वी दिल्लीत मेट्रो सुरू झाली तेव्हा (२४ डिसेंबर २००२) हे अंतर होते फक्त ८.२ किलोमीटर.

 

केवळ कोलकात्याला थांबलेली ही मेट्रो राजधानीच्या मार्गाने १६ वर्षांत १० शहरांत सुरू झाली. येत्या तीन वर्षांत त्यात पुणे, नागपूरसह चार-पाच शहरांची भर पडेल. कदाचित त्याच दरम्यान मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनची प्रवासी आतुरतेने वाट पाहत असतील. बुलेट ट्रेन आपल्या देशाची खरोखर गरज आहे का, यावर चर्चा होऊ शकते, मात्र विकसित देशातील बुलेट ट्रेनमध्ये बसून तिचे कौतुक करण्यापेक्षा आपल्या देशातही बुलेट ट्रेन सुरू झाल्याचे पाहणे, हे जास्त सुसंगत आहे.  


हा प्रवास आज सर्व नागरिकांच्या वाट्याला येत नसला तरी सार्वजनिक क्षेत्रात हे होत असल्याने क्रयशक्ती आलेला कोणीही भारतीय नागरिक त्याचा लाभ घेऊ शकणार आहे, हे महत्त्वाचे. अशा चांगल्या प्रवासाची साधने सध्या कमी असल्याने पहिल्या टप्प्यात तसे होऊ शकत नाही. त्याचे कारण पुन्हा एकदा आपली संख्या. गेल्या आठवड्यात रेल्वेने सणासुदीसाठी जादा गाड्यांचे वेळापत्रक जाहीर केले. त्यात अतिरिक्त २.२ लाख बर्थ उपलब्ध करावे लागले आणि ते कमीच आहेत! कारण रेल्वेने दररोज प्रवास करणाऱ्या भारतीयांची संख्या आहे २.३ कोटी! म्हणजे सिंगापूरच्या एकूण लोकसंख्येच्या चार पट! रेल्वे प्रवासाचे बुकिंग ज्या आयआरसीटीसी पोर्टलमार्फत केले जाते, त्यासंबंधीची एक आकडेवारी प्रसिद्ध झाली आहे. तीनुसार मार्च २०१८ ला संपलेल्या वर्षात त्या पोर्टलवरून २८ हजार ४७५ कोटी रुपयांची तिकिटे विकली गेली आणि तब्बल तीन कोटी नागरिक हे पोर्टल वापरत आहेत. दरवर्षी त्यात १४ टक्क्यांनी वाढ होते आहे. या पोर्टलवर मिनिटाला १५ हजार तिकिटे निघू शकतात. याचा अर्थ चांगल्या प्रवासाच्या अपेक्षा वाढत चालल्या अाहेत. त्याला संबंधित यंत्रणाही साद देत आहेत.  


आता थोडे विमान प्रवासाविषयी. तेथेही भारतीय नागरिक मागे नाहीत. सप्टेंबरअखेरच्या ९ महिन्यांत विमान प्रवास करणाऱ्यांच्या संख्येने १० कोटीचा पल्ला पार केला अाहे. ही वाढ १९ टक्के इतकी अधिक आहे. भारतीय विमानतळ सोयीसुविधांच्या दृष्टीने जगाशी स्पर्धा करू लागली आहेत. हे विमानतळ वाढत्या प्रवाशांना सुविधा देऊ शकणार नाहीत, असे आपले प्रश्न असल्याने त्यात काही त्रुटी राहतात, त्या आपण किती मोठ्या करायच्या, हे आता आपणच ठरवले पाहिजे. येत्या चार-पाच वर्षांत अमेरिका आणि चीननंतर विमान प्रवास करणाऱ्यांची संख्या भारतात सर्वाधिक असेल, याकडे केवळ संख्या म्हणून न पाहता प्रवासाविषयीच्या वाढत्या अपेक्षा आणि नव्या सुविधा म्हणून पाहिले पाहिजे.  


भारतीय पर्यटक परदेशात जातात, तेव्हा त्यांना आरामदायी क्रुझचे आकर्षण असते. ती सोय आता-आतापर्यंत आपल्या देशात नव्हती. पण ज्यांना परदेशी जाणे शक्य नाही, त्यांच्यासाठी मुंबई ते गोवा अालिशान अांग्रिया क्रुझ २० ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. तिच्यात एकाच वेळी ३५० प्रवासी प्रवास करू शकणार आहेत. ही सोय चेन्नई आणि कोलकाता येथेही उपलब्ध करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.  


सर्वसामान्य माणसांचा प्रवास सुखकर होण्यासाठी काय करता येईल, याचा गंभीरपणे विचार करण्याची वेळ आली आहे. पण त्याचबरोबर आपल्या साधनांच्या मर्यादा लक्षात घेता सतत आणि आता वेगाने त्या सेवा अपग्रेड होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. तालुक्याच्या गावापर्यंत पोचलेल्या शिवशाही बस असोत की जगाशी स्पर्धा करणारे भारतीय विमानतळ असोत, त्यात येत असलेल्या व्यावसायिकेतेचे स्वागत केले पाहिजे. सुरुवातीस म्हटले तसे या सर्व अपग्रेड होण्याला वाढत्या संख्येमुळे मर्यादा आहेत आणि त्यामुळे त्यात अनेक त्रुटी राहत आहेत. म्हणून अशा भारतीय सेवांना ऊठसूट बदनाम करण्यापेक्षा त्यात चांगला बदल कसा होईल, असा विचार भारतीय नागरिक म्हणून केला पाहिजे. तेजस एक्स्प्रेसची झालेली तोडफोड आणि चोऱ्या ही एक घटना आहे, पण त्याच वेळी या महाकाय देशात दररोज कोट्यवधी भारतीय नागरिक एकमेकांना समजून घेऊन आनंदाने करत असलेला प्रवास त्यापेक्षा अधिक महत्त्वाचा आहे. 

 

यमाजी मालकर  

ymalkar@gmail.com 

बातम्या आणखी आहेत...