आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मी तर शहरी बाबू.. जेथे सरकार चुकते तेथे गप्प बसणार नाही : आदित्य ठाकरे 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी / हिंगोली- मला शेतातले काही कळत नाही, पिकातलं काही कळत नाही, मी शहरी बाबू आहे. मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न, दुष्काळ समोर दिसत असताना व सरकार चुकत असताना बोलणार नाही तर काय करणार, असे उद््गार युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी बुधवारी(दि.१६) येथे काढले. 

 

एरंडेश्वर(ता.पूूर्णा) येथे आ.डाॅ.राहुल पाटील यांच्या वतीने आयोजित दुष्काळ निवारण परिषदेत ठाकरे बोलत होते. त्यांच्या हस्ते मराठवाड्यातील महिलांच्या पहिल्या जयभवानी महिला सहकारी सूतगिरणीचे भूमिपूजन करण्यात आले. शेतकऱ्यांना पशुखाद्य, शेळ्यांचे वाटप करण्यात आले. व्यासपीठावर खा.संजय जाधव, आ.डाॅ.राहुल पाटील, आ.डॉ.जयप्रकाश मुंदडा, युवा सेनेच्या कोअर समितीचे वरुण सरदेसाई, नीलेश कदम, डॉ.गणेशराजे भोसले, विपुल पिंगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. 


ठाकरे म्हणाले, दुष्काळ गंभीर आहे, परंतु शिवसेना खंबीर आहे. दरवर्षीचा दुष्काळ मार्च-एप्रिलमध्ये आपण पाहतो. मात्र या वर्षी ऑक्टोबरपासूनच सुरू झाला आहे, असे नमूद करीत आपण कालच शेतीची पाहणी करीत असताना जाळून टाकल्यासारखा सुकून गेलेला कापूस पाहून दुष्काळाची तीव्रता भयंकर असल्याचे चित्र समोर आले. त्यामुळे हा दुष्काळ गंभीर आहे. परंतु शिवसेना या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे ते म्हणाले. 

शिवसेना सरकारमध्ये असताना आपण सरकारच्या विरोधात बोलतो, असे लोक म्हणतात. परंतु आज राजकीय सभा नाही. निवडणुकीच्या काळात मत मागायला येऊ. शिवसेना ही दोन निवडणुकांच्या काळात जनतेसाठी काम करते, असेही ते म्हणाले. शेतीच्या प्रश्नावर आपल्याला काही कळत नसल्याचे बोलले जाते, मात्र राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न पाहून सरकारविरोधात बोलणार नाही तर काय करणार, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

 

याप्रसंगी प्रास्ताविकात आ.डॉ.पाटील यांनी देशातच नव्हे तर जगात सौरऊर्जेवर चालणारी पहिली महिला सूतगिरणी स्थापन करून ३५०० महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे काम हाती घेतले आहे. वीज बिले भरण्यातच सूतगिरण्या बंद पडू लागल्याने सौरऊर्जेचा पुरेपूर वापर करून ही सूतगिरणी नफ्यातच राहणार असल्याचे नमूद करीत ६५ कोटी रुपयांच्या भांडवलातून ही सूतगिरणी उभारली जाईल. २५ हजार स्पिंडलची ही सूतगिरणी असल्याचे नमूद करीत महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी करण्याचे काम व त्यांना पतपुरवठ्यासाठी पतसंस्थेच्या माध्यमातून काम सुरू असल्याचे सांगितले. खा.जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन अभय कुलकर्णी यांनी केले. कार्यक्रमास माजी आ.मीरा रेंगे, सहसंपर्कप्रमुख डॉ.विवेक नावंदर, जिल्हाप्रमुख विशाल कदम, सुरेश ढगे, माजी जिल्हाप्रमुख डॉ.संजय कच्छवे, गंगाप्रसाद आणेराव, नंदकुमार अवचार आदी उपस्थित होते. 

 

परिसरामधील ग्रामस्थांच्या चेहऱ्याकडे पाहून गरिबी कळली 
आदित्य ठाकरे यांनी मंगळवारी हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी तालुक्यातील गावांना भेटी दिल्या. बुधवारी वसमत तालुक्यातील आसेगाव, तेलगाव आणि हट्टा या तीन गावांना भेटी देऊन शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. सकाळी साडेअकरा वाजता आसेगाव येथे आदित्य ठाकरे यांनी एका खासगी शाळेत आयोजित छोटेखानी कार्यक्रमात शेतकऱ्यांशी बोलताना सांगितले, की मी काही शेतकरी नाही आणि मला शेतीमधील जास्त कळतही नाही. परंतु गरिबांचे आणि शेतकऱ्यांचे दुःख मात्र चांगल्या पद्धतीने जाणू शकतो. मी ग्रामीण भागात फिरत असताना गरिबी काय असते हे ग्रामस्थांच्या चेहऱ्याकडे आणि एकूणच त्यांच्या दशेकडे पाहून समजू शकलो. या वेळी वसमतचे आमदार जयप्रकाश मुंदडा, शिवसेनेचे लोकसभा अध्यक्ष बी.डी. चव्हाण, नांदेडचे आमदार हेमंत पाटील यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

बातम्या आणखी आहेत...