Home | Magazine | Madhurima | Yashashri Rahalkar write about stealing

भुक्कडगिरी

यशश्री रहाळकर | Update - Aug 07, 2018, 07:11 AM IST

माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच या वृत्तीच्या मंडळींची कमतरता नाही. भारतात तर नाहीच नाही. स्वत:चं पोट भरलेलं असूनही दुस

 • Yashashri Rahalkar write about stealing

  माझं ते माझं आणि तुझं तेही माझंच या वृत्तीच्या मंडळींची कमतरता नाही. भारतात तर नाहीच नाही. स्वत:चं पोट भरलेलं असूनही दुसऱ्यांच्या ताटावर नजर ठेवणाऱ्या अशाच काही वल्लींचा आलेला हा अनुभव. हसवणारा आणि विचार करायला लावणाराही...

  नाशिकला आल्यावर "भुक्कड’ या शब्दाची माझ्या शब्दकोशात भर पडली. भुक्कड म्हणजे भुकेलेला नव्हे, तर ज्याचं पोट भरलंय तरीही दुसऱ्याच्या ताटातील पोळीवर ज्याची नजर आहे असा कद्रू मनाचा माणूस. यामागे प्रामुख्याने "मिळतंय तर का सोडा?’ ही वृत्ती असणारे असे भुक्कडगिरीतील बादशहा आपल्याला जागोजागी भेटतात. या बाबतीत अग्रक्रमाने राजकारणी लोकांवर आणि सरकारी कर्मचाऱ्यांवर टीका होत असली तरीदेखील आपल्यातील अनेक लोकांमध्ये ही प्रवृत्ती रुजली, फळली, फुलली एवढेच काय, सवयीचा भाग बनलीये. वानगीदाखल द्यायचे झाल्यास, हॉटेलमधील जेवणानंतर बिलासह पुढे केलेली शोप किंवा मुखवास लोक टिश्यू पेपरमध्ये भरभरून घेताना मी अनेकदा पाहिलंय. मला सांगा हॉटेलचे हजार पंधराशे रुपयांचे बिल भरू शकणाऱ्या व्यक्तीला पाचदहा रुपयांचे मुखवास मारावेसे का वाटावे? यावर आमच्या बिलात ठेवले म्हणजे संपूर्ण आमचेच, अशी साळसूद धारणा करण्याचे कारण नाही! एक सांगा टूथ पिक, टिश्यू पेपर, फुलदाणीतील फुले या काही ढापायच्या गोष्टी आहेत का राव?


  भारतात रेल्वेच्या स्वच्छतागृहांमधील टमरेल साखळीने बांधलेले असते या विषयावर अनेक विनोद येतात. पण वातानुकूलित कोचमधील ब्लँकेटसुद्धा बॅगेत घालून नेणारे लोकही आहेतच की. वातानुकूलित डब्याचे तिकीट परवडणाऱ्याला काय एक ब्लँकेट विकत घेणे कठीण असावे का? पण माझं ते माझं, तुझं तेही माझंच आणि सरकारी ते माझ्या पिताश्रींचं असं आपलं धोरण.


  "नाव मोठ्ठे लक्षण खोट्टे’ असा अनुभव विमान प्रवास सातत्याने करणाऱ्या काही व्यक्ती सिद्ध करतात. घरी आलेल्या प्रत्येक बालकास ते विमान प्रवासात हवाहवाई केलेली अर्थातच मुठी भरभरून उचललेली चॉकलेट्स देतात. ही चॉकलेट कँडी बरेचदा विमानात सेवा म्हणून दिलेली असतात. आम्हाला थोड्या अधिक मिळू देत म्हणून ते डल्लाच मारतात. विमानात मिळालेले खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्या विमानातच भरपूर घेणे, खाणेपिणे शक्य नसल्यास बॅगेत भरून घेणे आणि वर केवढे पैसे घेतात ना उडवायचे? असेही म्हणणे.


  सातत्याने वेगवेगळ्या सहली करणाऱ्या एका मैत्रिणीकडे वेगवेगळ्या हॉटेल्सचे लोगो असणारे टॉवेल, नॅपकिन्स असायचे. मी बावळट प्रश्न केला, "कुठे गं मिळतात हे?’ तिने निलाजरेपणाने सांगितले, "ज्या हॉटेलमध्ये राहते, आणते तिथूनच. सगळे थ्री स्टार हॉटेल्स. काही कुणी तपासत नाही आणि केलंच कधी तर चुकून झालं म्हणायचं. झालं.’ मी चाट. "करतेस काय पण एवढ्या टॉवेल्सचं?’ मी जवळजवळ किंचाळले. ती आश्चर्याने म्हणाली, "चांगले असतील तर वापरते नाही तर पोछाला देते बाईला. केवढे पैसे भरतो आपण या हॉटेल्सचे.’आमच्या विभागातील एक नगरसेविका महिला मंडळ चालवतात. आपल्याकडून महिलांना अधिकाधिक दर्जेदार कार्यक्रम त्या देतात. पण या बौद्धिक मेजवानीपेक्षा बऱ्याच महिलांना अधिक रस असतो तो खाऊ खाण्यात. या कार्यक्रमासाठी अगदी वडापाव असू देत किंवा भजी, चांगल्या घरच्या, अंगावर पाचसहा तोळे सोने अन् भरजरी साड्या मिरवणाऱ्या, बंगल्यात राहणाऱ्या बायका तुटून पडतात, ढकलाढकली करतात.


  या सगळ्या भुक्कडगिरीच्या पदोपदी येणाऱ्या अनुभवातून एक मात्र अत्यंत खेदानं नमूद करतेय की, दिवसेंदिवस सामाजिक बांधिलकी, आपला देश, आपले लोक ही भावनाच आटत चाललीये. जो दुसऱ्यासाठी जगला तो देव. जो स्वतःपुरतेच जगला तो मानव, पण जो दुसऱ्याचे ओरबाडून जगला तो मात्र राक्षस सैतान.


  कुठेतरी थांबा. "माझं नाही ते माझं नाहीच!’ म्हणायला शिका. खूप मोठं सामाजिक कार्य, देणग्या देणे म्हणजेच सामाजिक कार्य नव्हे, तर थोडंसं आत्मभान आणि जरासा जबाबदार नागरिक या नात्याने केलेला विचारही खूप काही देऊन जाईल. निश्चितच.

  - यशश्री रहाळकर, नाशिक
  yash23shri@gmail.com

Trending