आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंगायत धर्म की जात?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

द्रविड वंशीयांचा लिंगायत धर्म हा प्रामुख्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकारणावर पुरातन काळापासून प्रभाव टाकत आलेला आहे. लिंगायत जात आहे की धर्म याचा तात्विक खलही पुरातन काळापासून चालू आहे. पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ लिखित "लिंगायत स्वतंत्र धर्मच' हे पुस्तक यावर नेमके भाष्य करते. लिंगायत, वीरशैव लिंगायत आणि वीरशैव अशा विविध गवाक्षातून समाजातील महाजन आणि बहुजन वर्गाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ते ठरू शकेल.
 

 

धर्म कोणताही असो, त्याचा उद्देश सत्य आणि मानवकल्याण आहे, असे सांगण्यात येते. धर्माधिष्ठित राजसत्ता अस्तित्वात येण्याची प्रक्रिया जगातील अनेक देशात मानवी समुदायाने पुरातन कालापासून स्वीकारली असल्याचे आपणास दिसून येते. त्याला आपला भारत देश तरी कसा अपवाद ठरणार? एखाद्या धर्माच्या वटवृक्षाखालील विविध जाती, समाज, उपजाती, पोट जाती, पंथ आदी समुदायांचे आपापल्या वर्चस्वासाठी किंवा अस्तित्वासाठीचे लढे वर्षानुवर्षे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे नकळत हस्तांतरित होताना दिसतात. त्या-त्या लोक समुदायातील संस्कृती, कला, साहित्य, इतिहास, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र आणि वर्तनशास्त्र आदींच्या संवर्धनाचा हेतू अशा लढ्यांमागे असतो.


द्रविड वंशीयांचा लिंगायत धर्म हा प्रामुख्याने कर्नाटक आणि महाराष्ट्रातील राजकारणावर पुरातन काळापासून प्रभाव टाकत आलेला आहे. लिंगायत  जात आहे की धर्म याचा तात्विक खलही पुरातन काळापासून चालू आहे. थोतांड धर्माधिकाऱ्यांच्या वर्चस्वाखाली गोरगरीब अज्ञानी समाजाची पिळवणूक होत होती. त्या दरम्यान १२व्या शतकात विद्रोही बसवण्णांचा परिवर्तनवादी काळ सुरू झाला. भारतीय समाजातील जातिभेद, परंपरा, रूढी, कर्मकांड, विषमता, भेदभाव आणि स्त्री दास्यत्व आदी सामाजिक शोषणव्यवस्थेवर संत बसवण्णांनी परिवर्तनवादी तत्त्वज्ञानाने प्रखर हल्ला चढवला. कथित धर्ममार्तंड आणि स्वार्थी राजकीय व्यवस्थेला बसवण्णांनी प्रभावी वचन साहित्याद्वारे त्याकाळी धारेवर धरले. त्या काळचा देवभोळा समाज बसवण्णांच्या देव नाकारणाऱ्या भूमिकेचा सहज स्वीकार करणे शक्य नव्हते. ‘मनापासून केलेले प्रत्येक काम हीच खरी शिव उपासना’, असा सोपा सिद्धांत ‘कायक वे कैलास’च्या माध्यमातून बसवण्णांनी दिला. श्रमप्रतिष्ठा जोपासताना गरजेनुसार संपत्तीची विभागणी ही ‘दासोह’ विचारसरणी त्यानी मांडली. पांढरपेशा वर्गाच्या शोषणात गुरफटलेला श्रमिक कष्टकरी बहुजन समाज हळूहळू बसवण्णांच्या विचाराने प्रभावित झाला. लिंगायत धर्माचे मूळ संस्थापक कोण यावर कितीही वादविवाद झाले तरी संत बसण्णांना अग्रस्थानी ठेवल्याशिवाय तो पूर्ण होत नाही. ही वस्तुस्थिती त्यांच्या प्रभावी वचन साहित्यांमध्ये आपणाला दिसून येईल.


पत्रकार चन्नवीर भद्रेश्वरमठ लिखित "लिंगायत स्वतंत्र धर्मच' हे पुस्तक यावर नेमके भाष्य करते. लिंगायत, वीरशैव लिंगायत आणि वीरशैव अशा विविध गवाक्षातून समाजातील महाजन आणि बहुजन वर्गाचा अभ्यास करू इच्छिणाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ते ठरू शकेल. संत बसवण्णा यांनी समाजाच्या शेवटच्या घटकालाही सामाजिक न्याय मिळावा या हेतूने लिंगायत धर्माची स्थापना केली. लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे हे त्यांच्या वचनामधून पदोपदी आढळते. तो नेमका कसा आहे याचा श्री भद्रेश्वरमठ यांनी आपल्या पुस्तकात बसवण्णांच्या अनेक प्रभावी वचनांचा आधार घेऊन ऊहापोह केला आहे.


लिंगायत धर्माचे स्वरूप आणि वैशिष्ट्ये :
लिंगायत हा एक द्रविडियन वंश आहे. तो जैन, बौद्ध आणि शीख यांच्याप्रमाणेच संपूर्णतः अवैदिक आहे. लिंगायत हे एक लींगांग सामरस्यत्वाचे षटस्थल तत्त्वज्ञान आहे. अष्टावरणाला भक्तिमार्ग, पंच आचाराला कर्ममार्ग आणि षटस्थलास ज्ञानमार्ग मानणारे लिंगायत हे एक आचारशास्त्र तथा वर्तनशास्त्र आहे. इष्टलिंगधारी शरीरालाच मंदिर बनवणारी लिंगायत ही एक धर्म प्रक्रिया आहे. संत बसवण्णा यांच्या सर्वोत्तम संकल्पनेतील काय कवे कैलास म्हणजेच कर्म हेच श्रेष्ठ, हा स्वयंपूर्णतेचा संदेश देणारे लिंगायत धर्म हे एक अर्थशास्त्र आहे. दासोह स्वरूपातील एक सामाजिक सहकारनीती लिंगायत संकल्पनेत आहे. दयेला धर्म मानणारी मानवतावादी शिकवण लिंगायत धर्मात आहे. समता, स्वातंत्र्य, बंधुता, सामाजिक न्याय आणि सामाजिक गौरव जोपासणारे लिंगायत हे एक न्यायशास्त्र आहे. या धर्मात स्त्री गौरव आणि स्त्री जगताच्या उद्धाराचे महत्त्वाचे सूत्र आहे. व्यक्तीपेक्षा समाज श्रेष्ठत्व मानणारे मूलभूत जंगम तत्त्व म्हणजे लिंगायत धर्म होय. वेदांपेक्षा अनुभवाला प्रमाण मानणारा लिंगायत हा एक सिद्धांत आहे. तसाच तो एक वास्तववादी आणि विवेकवादी जीवनविषयक दृष्टिकोन देणारा धर्म आहे. संपूर्ण शाकाहारी, सात्विक आणि समृद्ध जीवन पद्धतीचे महत्व लिंगायत धर्माने सांगितले आहे. देवळातील स्थावर लिंग उपासनेपेक्षा गळ्यातील इष्टलिंग उपासनेला लिंगायत धर्माने महत्त्वाचे स्थान दिले आहे. लिंगायत धर्मात हस्तरेषांपेक्षा मनगटातील ताकदीला महत्त्व देण्यात आले आहे. लिंगायत धर्मास सुतक प्रथा मान्य नाही. संपूर्णतः विज्ञाननिष्ठ संकल्पनेचा पुरस्कार लिंगायत धर्म करतो. मृत्यूला एक मोठा सण मानणारा तो एक मानव कल्याणकारी विज्ञान-निष्ठ धर्म आहे. संत बसवण्णा यांनी 'अनुभव मंडप'च्या माध्यमातून मानवी कल्याणाच्या विकासासाठी आणि समाजातील सर्व घटकांना आपले विचार मांडण्यासाठी मुक्त व्यासपीठ निर्माण करून दिले. म्हणूनच संत बसवण्णा यांच्या 'अनुभव मंटप' संकल्पनेला लोकशाही पद्धतीचे जगातील पहिले सांसद आदर्श प्रारूप अशी जगन्मान्यता मिळाली.


प्रामुख्याने लिंगायत आणि हिंदू यांच्यातील भेद स्पष्ट करताना लेखक चन्नवीर भद्रेश्वरमठ म्हणतात, "आम्ही लिंगायत आणि आमचा धर्म लिंगायत' ही घोषणा एक वेळ ठीक होती, परंतु "आम्ही हिंदू नाही. आम्ही अ-हिंदू असल्याने तुमचे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही.'  ही लिंगायतांची भूमीचा वैदिक व्यवस्थेला छेद देणारी आहे. लिंगायत आणि हिंदू धर्माच्या उचित आणि अनुचित संबंधांचा उलगडा करण्यासाठी विविध संकल्पनांची मांडणी करून ते पटवून देण्याचा प्रयत्न लेखक आपल्या पुस्तकात करतात. ज्यामुळे प्रामुख्याने लिंगायत/ वीरशैव जाती धर्माच्या अभ्यासकांना किंवा संशोधकांना एक नवी दिशा मिळू शकते. 


या आहेत संकल्पना :
वंशविचार, धर्मसंस्थापक, ईश्वरवाद, ईश्वराची संकल्पना, ईश्वराची उपासना, धर्मग्रंथ, इष्टलिंग, संस्कार व्यवस्था, पुनर्जन्म संकल्पना, पौरोहित्य व्यवस्था, सुतक प्रथा, स्त्रियांचा सामाजिक दर्जा, हिंदू/लिंगायतांचा विश्व निर्मिती आणि विश्वाकडे पाहण्याचा दृष्टिकोन, संस्कृति, अर्पण भावना, वर्ण आणि जाती व्यवस्था, गंध/विभूती, होमहवन - अग्निपूजा आणि उपवास, मंत्र, आहार, अहिंसा  विचार, स्वर्ग आणि नरक संकल्पना, पूजा/दांपत्य पूजा, तुळस/बेलपत्र, गाय/नंदी, दैववाद आणि प्रयत्नवाद, स्वतंत्र पारिभाषिक शब्दांचा उपयोग करणारा लिंगायत धर्म. पुस्तकाच्या शेवटी संदर्भग्रंथ सूचीत नमूद केलेल्या साधनांच्या आधारे श्री भद्रेश्वरमठ वरील विविध पुरक संकल्पनांची उकल करण्याचा पोटतिडकीने प्रयत्न केला आहे. 

> ग्रंथाचे नाव : लिंगायत स्वतंत्र धर्मच 
> लेखक : चन्नवीर भद्रेश्वरमठ 
> प्रकाशक : प्रगती प्रकाशन, सोलापूर 
> पृष्ठे : 144, देणगीमूल्य : 200 रुपये


लेखकाचा संपर्क - ९८८११९६६८८
 

बातम्या आणखी आहेत...