आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कथासाधक...अरविंद गोखले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आधी पुण्याच्या शेतकी कॉलेजात प्राध्यापकी. त्यानंतर मुंबई महानगरीतल्या कॉर्पोरेट क्षेत्रात प्रवेश. आयुष्याचा असा सरळरेषी आलेख असताना  क्षितिजापलीकडच्या जगाचा शोध घेण्याची दृष्टी त्यांना माणसाच्या सुप्त-असुप्त मनातल्या वैचित्र्याचा शोध घेणाऱ्या ‘नव' कथेकडे घेऊन गेली. अरविंद गोखले नावाच्या या लेखकाने मराठी नवकथेची नाममुद्रा  भारतीय साहित्यात सुवर्णाक्षरांत कोरण्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. पण, १९ फेब्रुवारी २०१८ रोजी त्यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले, हे किती साहित्य रसिकांच्या गावी आहे? अशा वेळी ही महत्त्वाची घडी आहे त्यांच्या आठवणी जागवण्याची, नवसाहित्याच्या पुनरावलोकनाची...


रविंद गोखले ज्या पुण्या-मुंबईत जगले, त्याच मुंबईत जगणारी तुमची-माझी पिढी आहे. आपल्याच तर कथा लिहिल्या त्यांनी, त्यातच ते रमले. पण फक्त एका पिढीच्या काळात ही शहरे संपूर्णतः बदलून गेली. आजच्या मानाने संथ आणि सुरक्षित आयुष्य जगणाऱ्या गोखल्यांच्या पिढीला जाणवणाऱ्या प्रश्नांची रूपे किती वेगाने बदलत गेली! भविष्यातून येऊ घातलेल्या भयावह लहरींची जी जाणीव त्यांना झाली, ती त्यांच्या कथासाहित्यातून जबरदस्त पावले उमटवत गेली. ‘नजराणा'पासून सुरवात होत त्यांच्या कथा ‘कातरवेळ', ‘कमळण', ‘मीलन', ‘रिक्ता', ‘माहेर’, ‘शुभा', ‘अनामिका' ते ‘दागिना'मधून संग्रहित रूपात येत त्यांनी मराठीतले कथादालन समृद्ध केले. त्यातून स्वतंत्र चेहरा शोधू पाहणारी ‘नव’कथा आपल्या साहित्यात रुजली, तिने  भारतीय साहित्याशी नाते जोडले, पुढच्या वळणांवर असलेल्या कमल देसाई, भाऊ पाध्ये, विजया राजाध्यक्ष, अच्युत बर्वे, ज्ञानेश्वर नाडकर्णी, तारा वनारसे अशा अनेक लेखकांसाठी मार्ग खुले करून दिले. आज अनंत सामंत, जयंत पवार, राही अनिल बर्वे, कृष्णात खोत, प्रणव सखदेव अशा स्वतंत्र नाममुद्रा उमटवणाऱ्या लेखकांच्या कथा-अवकाशातल्या ओळखीच्या खुणा वाचकाला गोखल्यांच्या कथासाहित्याकडे अचूक घेऊन जातात.


नवकथायुगाचा प्रारंभ... कसा आणि कुणापासून? नवकथेचे जन्मस्थान शोधायला खरे तर गाडगीळ-गोखल्यांच्या फार मागे, अगदी दिवाकर कृष्णांपर्यंत जावे लागेल. वामनराव चोरघडे आणि कुसुमावती देशपांडे यांच्या त्या काळातल्या कथा व्यक्तीच्या मनातला अंतर्विरोध सूक्ष्म दृष्टीने टिपत तिथल्या विसंगतीचा ठाव घेत नव्या-जुन्या कथेमधला पूल बनत गेल्या. २०१३ मध्ये ज्यांची जन्मशताब्दी साजरी करायचे मराठी साहित्य पार विसरूनच गेले ते बी.रघुनाथ तसेच उमाकांत ठोमरे, शशिकांत पुनर्वसू, प्रभाकर पाध्ये, रा.भी.जोशी असे अनेक लेखक या

 

संदर्भात महत्त्वाचे आहेत. नवकथेची पायवाट बी.रघुनाथांच्या ‘आकाश' या कथेपासून सुरू होते, हे ऋण गंगाधर गाडगीळांनीही मान्य केले आहे.
१९१९ ते १९९२ हा अरविंद गोखले यांचा जीवनकाल बघितला तर ब्रिटिश अधिपत्याखाली पिचलेल्या भारतात गांधीजींनी स्वातंत्र्यलढ्यात नवी चेतना निर्माण केली होती, त्या भारलेल्या काळात गोखल्यांचा जन्म झाला. या कालखंडात जागतिक पटावर वेगळे नाट्य सुरू होते.विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे माणसाची समज आणि सामर्थ्य अनेक पटींनी वाढले. पण, रोजच्या धडपडीतल्या अर्थहीनतेच्या होत गेलेल्या जाणिवेमुळे, त्यातून पुढे येणाऱ्या खुजेपणा व मर्यादेमुळे जगण्या-मरण्याचे संदर्भही बदलले. देवाचे बोट घट्ट पकडलेल्या माणसाचा तो आधार हिरावून घेतला गेल्यामुळे माणूस एकाकी आणि असाहाय्य होत गेला. ‘ग्लोबलायझेशन’, ‘मार्केट इकॉनॉमी’, ‘कंझ्युमरिझम’ हे केवळ पुस्तकातले शब्द राहिले नाहीत. ते आयुष्याचा अविभाज्य भाग बनत गेले. इंटरनेटचे गुलाम बनून एटीएम-क्रेडिट कार्ड - सेलफोनचे नंबर बनून जगात राहणाऱ्या अगणित फालतू, आजारी किड्या-मकोड्यांनी हे शहर बुजबुजत राहिले. याच शहरात अरविंद गोखले नावाचे एक गृहस्थ राहत होते. भविष्यातून येऊ घातलेल्या भयावह लहरींची लाट त्यांच्याबरोबर आणि पाठून अवतरत येऊ घातलेल्या कथाकारांवर येऊन कोसळली. माणसाचे आयुष्य पायदळी तुडवत आलेली परात्मतेची लाट त्यांच्या साहित्यातून पावले उमटवत गेली. जीवनातले अंतर्विरोध, विसंगती, विषमता आणि लैंगिकतेचे जे नवे भान निर्माण होऊ लागले होते ते सांगाती घेऊन परिस्थितीमुळे गुदमरत चाललेला माणूस, त्याच्या मनात खोलवर रुतलेल्या आशा-आकांक्षा, दबलेल्या विकार-विकृतींचे चित्रण नवकथेतून उमटत राहिले.

 

गंगाधर गाडगीळांची पहिली कथा ‘प्रिया आणि मांजर' (वाङ््मयशोभा), तर गोखल्यांची ‘कोकराची कथा’ (सत्यकथा) आणि व्यंकटेश माडगूळकरांची ‘काळ्या तोंडाची'  (अभिरुची) १९४५ मध्ये प्रकटलेल्या दिसतात.  या लेखकांत वयाने ज्येष्ठ होते पु.भा.भावे, पण त्यांची ‘सतरावे वर्ष' ही कथा ‘दीपावली'च्या १९४६च्या दिवाळी अंकात अवतरली. स्वतःची अगदी वेगळी प्रयोगशील वाट विचारपूर्वक निवडून  गोखले, माडगूळकर व गाडगीळ ही त्रयी मोठ्या उत्साहाने पुढे निघाली. पुढे पु.भा.भाव्यांबरोबर दि.बा.मोकाशी, सदानंद रेगेही यात सामील होत काफिला विस्तारत गेला. ‘सत्यकथा'ने जुन्या-नव्या कथेचे विश्लेषण करणारा अंक आणि नवकथेची समीक्षा करणारी लेखमाला १९४७मध्ये सादर केली. १९४७ मध्येच गोखल्यांची ‘कातरवेळ' आणि गाडगीळांची ‘कडू आणि गोड' या नवकथेची पावले रुजवणाऱ्या कथा प्रसिद्ध झाल्या. श्री.पु.भागवतांचे ‘सत्यकथा' आणि ‘मौज' हे नवकथेचे व्यासपीठ बनून गेले. पुढे ना.सी.फडके आणि दि.के.बेडेकर यांनी ‘दुर्बोध', ‘जंतूवादी' म्हणत हल्ले चढवल्यावर गाडगीळांनी पवित्रा घेत नवकथेचे लेखक, समीक्षक आणि समर्थक अशी तिहेरी भूमिका भक्कम बजावली. गोखल्यांचे याच्या अगदी विरुद्ध होते. नवकथेचे जनक व समर्थक अशी भूमिका घेत वादविवादांना निमंत्रणे देणे त्यांच्या स्वभावात बसण्यासारखे नव्हते. ‘जीवन आणि लेखन मला एका वेगळ्या वाटेनं न्यायचं आहे-कथा हाच एक केंद्रबिंदू धरून!’ असे ते ‘अग्निहोत्र’मध्ये  म्हणतात, तिथे त्यांच्या जीवनप्रेरणा स्पष्ट होत जातात.

 

पैस कथासाहित्याचा
गोखल्यांच्या कथांचे विषय, अनुभवाची मांडणी, त्यासाठी निवडलेले मोजके शब्द आणि प्रमाणबद्ध रचना यातून निर्माण होणाऱ्या बांधणीत विसंगतीची फट शोधून सापडत नाही. सुशिक्षित मध्यमवर्गात येणारा कमाईचा ओघ, स्वतंत्र कुटुंबपद्धतीचा उदय, कनिष्ठ मध्यममवर्गाची ‘अपवर्ड मोबिलिटी’ची आस, स्त्रियांचा नोकरी क्षेत्रात  शिरकाव आणि नातेसंबंधांची कोसळीक ही तत्कालीन समाजातल्या संक्रमणाची केंद्रे बनत चालली होती. एकीकडे आर्थिक भरभराटीचा सतत फुगणारा डोलारा आणि दुसरीकडे ज्यांच्या शोषणावर या डोलाऱ्याचा पाया घातला गेला आहे अशा अगणित नगण्य व्यक्तींच्या जीवनातले भकासपण, दारिद्र्य आणि अवहेलनेचे चित्रण ही कथा करत जाते. सामान्यांचे आयुष्य केंद्रस्थानी असलेल्या गोखल्यांच्या कथेला जीवनाचा कोणताच पैलू वर्ज्य नाही. जगण्याच्या व्यापात गुंतलेले स्त्री-पुरुष, विशेषतः  स्त्रिया हा गोखल्यांच्या खास आस्थेचा विषय आहे. घरात गुत्ता सुरु झाल्यापासून भांबावलेली शाळकरी मेरी (गंधवार्ता), संसाराला विटून घराबाहेर पडणारी ‘कमळण’, सून-मुलाच्या संसाराचे स्वप्न उध्वस्थ झालेले बघून भ्रमिष्ट झालेल्या वेणूताई (वेडी बाभूळ), सवतीची मुले सांभाळण्यासाठी तडजोडीला सामोरी जाणारी  शेजारीण(रिक्ता), ‘माहेर’, ‘कातरवेळ’, ‘अविधवा’ अशा स्त्रिया केंद्रस्थानी असलेल्या कथा गोखल्यांच्या लेखणीतून जिव्हाळ्याने उमटतात.


संस्कृती-परंपरेने आखलेल्या कौटुंबिक चौकटीत जीवनाची इतिकर्तव्यता मानणाऱ्या स्त्रीच्या  अनेक रूपांचे आणि भावभावनांचे चित्रण गोखल्यांच्या कथांतून प्रामुख्याने अवतरते. ‘मंजुळा', इरावती (अविधवा), कौसल्या (अनय) सुशिक्षित आहेत, नोकरी-समाजसेवेसाठी घराबाहेर पडल्या आहेत. पण त्या खऱ्या अर्थी मुक्त आहेत का? गोखल्यांच्या कथांमध्ये अशा सक्षम, मुक्त, स्वतःच्या बळावर जगणाऱ्या स्त्रियांची चित्रणे तुलनेने कमी येतात. स्वतःच्या शक्तीची आणि हक्कांची जाणीव अजून जागी व्हायची आहे, मुक्तीची पहाट ज्यांच्यापासून दूर आहे अशा संक्रमणावस्थेतल्या स्त्रियांची वर्णने मात्र गोखल्यांच्या कथांमधून ठळकपणे अवतरतात. ‘नर', ‘कॅक्टस', ‘फुलछबू' अशा पुरुष केंद्रस्थानी असणाऱ्या अगदी वेगळ्या कथाही त्यांनी लिहिल्या. त्यातली ‘नर' ही पितृत्वाची आस लागलेल्या माणसाची अगदी वेगळी कथा  त्यांनी लिहिली,  तेव्हा आज ‘फर्टिलिटी क्लिनिक्स’मधून उपलब्ध प्रगत वैज्ञानिक तंत्रे  अस्तित्वात  नव्हती. आजच्या काळात ही कथा घडती, तर या पुरुषाची अपूर्णता संपवणारे मूल  त्याच्या घरात खेळत असते. कदाचित नसतेही. आयुष्याला अपूर्णत्वाचा शाप आहेच.  कामप्रेरणेचे मूलभूत स्वरूप, सामर्थ्य आणि आडनिड्या स्वभावाचे  चित्रण गोखले यांच्या कथांमधून अतिशय संयमाने येत जाते. इथे ‘मंजुळा'ची आठवण होतेच. या कथेबद्दल अनेक विचारवंतांनी लिहिले आहे, पण मनोव्यापार आणि जीवनव्यवहारांवर वासनेच्या अमलाचे चित्रण करणे एवढा मर्यादित पट इथे मांडला गेला नसून,  स्त्री आणि पुरुषाच्या लैंगिक दृष्टीकोनातला फरक ही कथा अधोरेखित करते. जगातल्या प्रत्येक महानगरात असे नाते संपून गेलेले शरद-मंजू असतील, त्यांची  पर्यावरणे  वेगळी असतील, पण तीव्रता कमीजास्त असली तरी दुःखाची जातकुळी एकच असेल. मंजुळा स्त्री असल्यामुळे तिचे दुःख प्रकर्षाने भिडते, पण शरदच्या वागण्यामागचे ताणेबाणे लक्षात घेता तोही सहानुभूतीला पात्र ठरतो. कालक्रमानुसार जीवन बदलेल, लैंगिकतेचे भान बदलत जाईल, तसतशा या कथेतून नवनव्या शक्यतांच्या  लडी उलगडत जातील, त्या वाचकाने  शोधत जायच्या आहेत. ‘मंजुळा'प्रमाणे ‘आभा सावंत', ‘नर', ‘कॅक्टस' अशा अनेक कथा आजच्या जगाशी, काळाशी अगदी सरळ नाते जोडत आहेत.  (पूर्वार्ध)

 

बातम्या आणखी आहेत...