आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्त्रीवेदनेचा सामूहिक उद‌्गार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यशोधरा काटकर  

अभिषेक शहा या तरुण दिग्दर्शकाच्या "हेल्लारो'या पहिल्याच चित्रपटाला सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचे सुवर्णकमळ प्राप्त झाले आहे. गुजराती चित्रपटसृष्टी जवळपास मृतप्राय झालेली असताना या अंधारलेल्या काळात अशा कलाकृतीचा जन्म होणे ही एक विशेष घटना आहे. कच्छच्या रणातल्या कुठल्याशा खेड्यात बाप-सासरा-मुखिया-नवऱ्याच्या अधिकारशाहीत जगणाऱ्या महिलांचे घुसमटलेले जिणे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. 




आज गुजराती चित्रपटसृष्टी जवळपास मृतप्राय झालेली असताना, या अंधारलेल्या काळात अभिषेक शाहसारख्या अहमदाबादच्या तरुण रंगकर्मीने चित्रपटनिर्मिती करण्याचे स्वप्न बघणे, एवढेच नव्हे तर दिग्दर्शन, कथा-पटकथालेखन अशा जबाबदाऱ्या घेणे, त्याला प्रतीक गुप्ता आणि सहकाऱ्यांची साथ मिळून,या तरुणाईच्या सळसळणाऱ्या ऊर्जेतून "हेल्लारो' सारख्या कलाकृतीचा जन्म होणे ही एक विशेष घटना आहे. इतकेच नव्हे तर सारथी प्रॉडक्शन्स आणि हरफनमौला फिल्म्स यांची निर्मिती असणाऱ्या "हेल्लारो'चे नाव सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचे सुवर्णकमळ  मिळवणारा पहिला गुजराती चित्रपट म्हणून इतिहासात कोरले गेले आहे. केवळ इतकेच नव्हे तर या चित्रपटातील तब्बल १३ अभिनेत्रींना विशेष ज्युरी पुरस्कारही मिळाला आहे. या वर्षीच्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव "इफ्फी’च्या उद्घाटन सोहळ्याचा मानकरी म्हणून "हेल्लारो'ची निवड करण्यात आली. गेल्या वर्षी  “इफ्फी’च्या उद्घाटन सोहळ्याचा मान जूलियन लॅंडीस या तरुण फ्रेंच दिग्दर्शकाच्या ‘द ऍस्पर्न पेपर्स 'या  पहिल्यावहिल्या  चित्रपटाला तर त्याआधी दिग्गज इराणी  दिग्दर्शक मजिद मजिदी यांच्या  "बियाँड द क्लाउड्स 'ला मिळाला होता. भारतीय चित्रपट महोत्सवाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात अशा मानकऱ्यांमध्ये "हेल्लारो' चा समावेश होणे ही केवळ गुजरातीच नव्हे तर सगळ्या चित्रपटप्रेमींसाठी अभिमानाची गोष्ट आहे. 

कच्छच्या रणातल्या कुठल्याशा खेड्यात बाप-सासरा-मुखिया-नवऱ्याच्या अधिकारशाहीत जगणाऱ्या महिलांचे घुसमटलेले जिणे या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. हा विषय तसा परिचयाचा,अनेक व्यावसायिक तसेच समांतर सिनेमातून, नाटकातून अगदी गुजराती नाटकांतून-लोकनाट्यातूनही अवतरलेला म्हणून त्याअर्थी सर्वपरिचित आहे. पण या चित्रपटातल्या कथेच्या मांडणीतली गुंफण,यातल्या स्त्री-व्यक्तिरेखा आणि या भूमिका निभावणाऱ्या मुलींच्या अभिनयातली  सहजता विलक्षण लक्षवेधक आहे. यातल्या प्रत्येकीचे  कुटुंब वेगळे, कथाही वेगळी पण व्यथेची जातकुळी मात्र एकच आहे, ती या  स्त्रियांना सहकंपाच्या,सहवेदनेच्या सूत्रात बांधून ठेवते. वेदनेचा  सामूहिक उद्गार बनणाऱ्या या चौदा-पंधराजणी या चित्रपटाच्या नायिका आहेत. 

गुजराती स्त्रीच्या रक्तात गरबा भिनलेला आहे, पण इथे तर तो त्यांच्याकडून हिरावून घेतला गेला आहे. इथे माँ अंबेसमोर हातात तलवार घेऊन लयबद्ध रिंगण धरत पुरुष गरबा करतात, गरबा हे त्यांच्या लेखी शौर्याचे ,पुरुषी मर्दुमकीचे  प्रतीक आहे. त्यांनी ते आदिमायेच्या चरणी  अर्पण केले असले  तरी घरच्या स्त्रीला मात्र  घुंघट घेऊन घर आणि पाणी भरण्याच्या तलावाचा काठ एवढ्याच अवकाशात बंदिस्त होण्याची सक्ती केली गेली आहे. स्त्रीसाठी कोणताच मायेचा ओलावा नसणाऱ्या या गावावर आदिमाया कोपली आहे. गेली तीन वर्षे इथे पाऊस पडलेला नाही. जितकी कोरडीठक्क ही भूमी, तितकेच कोरडेठक्क हे सगळे अडाणी  पुरुष आहेत. त्यांची अंबा माँ जितकी अगतिक, तितकेच तिला साकडे घालणारे पुरुषही हतबल आहेत. पण यातल्या प्रत्येकाला धर्मपरंपरेने हक्क गाजवण्यासाठी एक बायको दिली आहे. त्यांच्यात वेळोवेळी उफाळून येणारी हिंसा, ते क्रौर्य लादून त्यांनी या स्त्रियांची आयुष्ये वैराण करून टाकली आहेत. इथे स्त्रीच्या सर्जनशीलतेला थारा नाही, शिक्षण-सुधारणेचा वारा नाही, मग फक्त राबणे आणि दबणे,दबवून घेणे, नशिबी असलेल्या जगण्याची लय गमावून बसलेल्या या बायांनी जायचे तरी कुठे?  स्त्री-मुक्तीचा कोणता मार्ग शोधायचा, इथे तर त्यांना स्वतःच्या अंगीभूत स्त्री-शक्तीची जाणही नाही. 

१९७५ साली इंदिरा गांधींनी देशात आणीबाणी लागू केली, ती  घोषणा गावकरी रेडिओवरून ऐकतात असा एक प्रसंग चित्रपटाच्या सुरुवातीलाच येतो. चंडिकेचा अवतार धारण केलेल्या इंदिराजींनी आणीबाणी पुकारून देशावरची आपली पोलादी पकड अधिक मजबूत केली तर इथे अंबामातेवरची श्रद्धा आणि मुखियाची सत्ता यात अडकून गाव बंदिस्त झाले आहे, एक अघोषित आणीबाणीच आहे ही... स्वातंत्र्य मिळून तीन दशके होत आली, संविधानाने स्त्रीला  समान हक्क दिले, शिक्षणाचे वारे देशातून पावले उमटवत गेले, पण या आणि अशा अगणित भारतीय  खेड्यात कुठे पोचले आहे सरकार,शासनव्यवस्था आणि सुधारणेचे वारे? यातून या चित्रपटाला अगदी ठळक अशी राजकीय-सामाजिक चौकट लाभते. पण या दिग्दर्शकाला  राजकीय-सामाजिक भाष्य करायची "पोझ' घ्यायची नाही. या पोलादी पिंजऱ्यात भरडल्या जाणाऱ्या स्त्रियांच्या जगण्यातले पेच आणि त्यातून उद्भवणारे विरोधाभास त्याला मांडायचे आहेत, म्हणून ही पटकथा माणसांच्या जिण्यावरच केंद्रित होत लहानमोठ्या घटनांतून  स्त्री-पुरुष संबंधातले तिढे दर्शवत या स्त्रियांना जगण्याची लय सापडण्याच्या उत्कर्षबिंदूकडे वाटचाल करत जाते. 

पिढ्यान‌्पिढ्या घरात कोंडलेल्या  स्त्रीचे पाऊल अखेरीस घराबाहेर पडते तो प्रसंगही अतिशय संयमाने चित्रित केला गेला आहे. ही बाई बंड  पुकारत  नाही, विद्रोहाच्या मार्गाने  हत्यार हाती घेताना दिसत नाही.  तिचे ठाम पाऊल उंबऱ्याबाहेर पडते, ती  उघड्या चौकात येते तेव्हा तिच्या माथ्यावरची ओढणी आपसूकच गळून पडते  आणि  ती एका आंतरिक ऊर्मीत गरब्याचा ठेका धरत त्या आदिमायेलाच आवाहन करते. निसर्गातल्या चराचर सृष्टीत वास करणारी आदिमाया कृपाळू  होते आणि तिची माया पावसाच्या सरी बनून बरसू लागते. झडीत चिंब होणाऱ्या स्त्रियांच्या लयबद्ध  ठेक्यावर गरब्याचे वर्तुळ पूर्ण होते. त्यात  केंद्रस्थानी असतो त्यांच्या गावात चुकूनमाकून आलेला एक निर्वासित,भ्रमिष्ट, दलित  ढोलिया. हातात इतकी विलक्षण जादुई करामत असणाऱ्या या सर्जनशील माणसाचे जीवन धर्म- जातिपरंपरेने, भेदाभेदांच्या भिंतींनी चिरडून टाकले  आहे. या  हतभागी  स्त्रिया आणि हा  ढोलिया रणातल्या शुष्क भूमीत एकत्र येतात तेव्हा एक वेगळेच नाट्य आकार घेऊ लागते. कुणीच नसतात ते एकमेकांचे पण  हा सर्वस्व हरपलेला फाटका माणूस या स्त्रियांच्या मुक्तीच्या मार्गावर पाठीराखा बनून जीव पणाला लावून खडा ठाकतो. अखेरीस ढोलाच्या तालावर या स्त्रियांचा गरबा गतिमान होत रंगत जातो, या स्त्रियांना मोकळा श्वास मिळतो,ढोलियाची घुसमट थांबते, मनगटात नवा जोम येतो, दोहोंसाठी मुक्तीचा मार्ग खुला होतो, आणि त्या आवर्तात अडकलेले पुरुष थक्क होऊन बघत राहतात.  इथे  चित्रपट रूढ अर्थी संपतो पण खरंच तो  संपतो का राजापासून गावकुसाबाहेरची माणसे एका अवकाशात एकमेकांचा ताल आणि तोल सांभाळून, निसर्गाच्या साथीने जगायला शिकतील तेव्हा सर्वांचे जिणे आनंदमय, मंगलमय होईल, त्यातून एक निरामय,समताधिष्ठित समाज निर्माण होईल,अशा अनेक शक्यतांचे सूचन करून तो थबकतो. माणसाचे जिणे पुढे प्रवाहित होत राहणार असते. 

उत्तम कहाणी, लोकेशन, रखरखीत वातावरणाच्या पार्श्वभूमीवर उठून दिसणारे रंगाचे पॅलेट, लोकसंगीत, नृत्य आणि विनोदी जोडगोळीचा वावर असला तरी "हेल्लारो’ हा रूढ अर्थी मनोरंजनात्मक चित्रपट नाही तसाच तो सामाजिक रूढींवर प्रहार करणारा प्रायोगिक चित्रपटही नाही, या दोन्ही प्रवाहांना कवेत घेणारी त्याची आपली वेगळीच वाट आहे. भारतीय भाषिक चित्रपटांच्या मांदियाळीतला एक कलात्मक प्रयोग म्हणून त्याचे  महत्त्व आहेच, शिवाय "इफ्फी'त अवतरण्याआधी तो देशभरात प्रदर्शित करण्यात आला हाही गुजराती व्यावसायिकतेचा एक धाडसी प्रयोग आहे. 

सध्या थिएटर्समध्ये  एकाच वेळी "बाला' ,"हिरकणी', "बायपास रोड', "सांड की आंख', "हाउसफुल ४' आणि "हेल्लारो' प्रदर्शित होत आहेत. पण 'हेल्लारो' ला गुजराती, "हिरकणी'ला मराठी आणि 'बाला'ला आयुष्मान खुराणाचा चाहता प्रेक्षकवर्ग अशी सरळ विभागणी दिसत आहे. आज आपल्या देशात जिथे चित्रपट व्यवसाय वा संस्कृती अस्तित्वात नाही अशा गावा-शहरांकडून ताज्या दमाचे रंगकर्मी पुढे येऊन चित्रपट, लघुपट, माहितीपट,चलचित्रपट अशा विविध क्षेत्रांत नवनवे प्रयोग करू लागले आहेत. त्यातून  नवनव्या कथा, वेगवेगळे 'जॉनर' येऊ लागले आहेत, चित्रपटाच्या अनेक तांत्रिक-अतांत्रिक पैलूंमध्ये  बदल घडत आहेत, त्यामागे या धडपड्या तरुणाईची नवनवोन्मेषशाली ऊर्जा आहे. अशाच तरुणाईतून  अनुराग कश्यप पुढे आला होता नागराज मंजुळेही. त्यांनी निर्माण केलेल्या चित्रपटात सगळेच काही परिपूर्ण नव्हते, चुका-गफलती होत्या, त्यावर टीकाही झाली, पण  त्यांनी आपली दखल घ्यायला भाग पाडले आणि मागून येऊ घातलेल्या अनेकांसाठी मार्ग प्रशस्त करून ठेवले. "हेल्लारो' हे अशा तरुणाईच्या सर्जनशीलतेचे एक महत्त्वाचे उदाहरण आहे  तेव्हा "आपल्या' मातृभाषेतले चित्रपट बघावेतच, पण इतर भारतीय भाषांमधलेही जरूर बघावेत, खूप मोठा खजिना सापडेल. 

अंतरंगात उतरणारा चित्रपट आहे, चुकवू नका!  

लेखिकेचा संपर्क - 9821148810