आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधल्या फळीची शिलेदार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे सोज्वळ, घराण्याचे सर्व सणवार आनंदानं करणारी, आल्यागेल्यांना हसमुखानं सामोरं जाणारी सून टीव्ही मालिकांमधून रंगवली जातेय तर दुसरीकडे सोशल मीडियावरून अतिशय खाष्ट, स्वार्थी आणि आत्मकेंद्री वृत्ती असणारी, मोकळ्या -आधुनिक विचारांची स्त्री असं तिचं दुसरंच रूप समोर येतंय. यातली खरी स्त्री नेमकी ओळखायची कशी? की या दोन्ही टोकांमध्येे आजची स्त्री कुठेतरी आहे...

 

गेल्या काही दिवसांत कुटुंबव्यवस्था आणि ज्येष्ठांचे प्रश्न हे मुद्दे ऐरणीवर आलेे आहेत. कुटुंबातील लहान मुलांप्रमाणेच ज्येष्ठ व्यक्तींना काळजी आणि प्रेमाची गरज आहे, याबाबत दुमत नाहीच. पण आज मी जिचे प्रश्न मांडणार आहे ती आहे घरातील कर्ती स्त्री, सून. सोशल मीडियावर जिचा उद्धार जाहीरपणे राक्षसी दुष्ट चेटकीण असा केला जातो. कुटुंबव्यवस्था नष्ट होणार कारण सुनेला वळण नाही. संसार मोडताहेत कारण सुनेच्या आईची ढवळाढवळ. वृद्ध वृद्धाश्रमात जातात कारण सूनबाई. मुलांना वळण नाही कारण हीच दुष्ट बाई. यांच्या श्रावणबाळांना जादूने भुरळ घालून तोडणारी हीच ती चेटकीण. असे काहीसे चित्र मनात तयार व्हावे अशी प्रतिमा हेतूपूर्वक रेखाटली जातेय. आजकाल मुलींपेक्षा सासवाच सुनेच्या आगमनापूर्वी धास्तावलेल्या असतात. जणू आपण घरात एक निखारा आणतोय आणि तो पेटून कधीही घरादाराची राख करेल.

 

दुसरीकडे कथाकादंबरी आणि मालिकांमधून आदर्श सूनबाईची प्रतिमा रंगवली जातेय. तुळशीला पाणी घालणारी, ऊठसूट देवापुढे दिवे लावणारी, कुटुंबाला एकत्र बांधून ठेवण्याशिवाय दुसरी कोणतीही महत्त्वाकांक्षा नसणारी. नवऱ्याचे वाट्टेल तसे वागणे सहन करणारी तथाकथित पतिव्रता. या दोन्ही टोकांच्या मधे कुठेतरी असणारी सून ही माणूस आहे, हे मात्र सारेच विसरून जातात.

 

मुलींच्या आईने तिला अमूकढमूक वळण लावावे, थोडक्यात तिला संसार बिनबोभाट करण्यायोग्य मटेरीयल बनवावे, एवढा एकच मार्ग प्राचीन महानतम अशा आपल्या संस्कृतीच्या संवर्धनासाठी त्यांना माहीत असावा. यात माझी भूमिका काय असावी, असा विचार किती घरातील ज्येष्ठ करतात? तिचे एकटीचेच खांदे पेलणार का सारं? यावर काही महान लोक आम्ही तर तिला अगदी मुलीसारखी वागवतो असा आव आणतात. प्रत्यक्षात हे शक्य नाही, या ड्रामेबाजीपेक्षा तिला माणूस म्हणून वागवता का, हेही तितकेच महत्त्वाचे. ती सुपरवुमन नाही हे तुम्ही मान्य करता का?


आजही कुटुंबात येणाऱ्या सुनेकडून सोळाव्या शतकातील अपेक्षा केल्या जातात. त्या वेळी ८/९ वर्षांची मुलगी असायची आता ती २५ ते ३० या वयोगटातील असते हे आपण का विसरतो? ती काही संस्कारक्षम वगैरे नसते उलट पूर्ण वैचारिक बैठक असणारी, स्वतःची स्वतंत्र मते असणारी असते. याचा अर्थ ती बिघडलेली आहे, असा होत नाही. तिची जगण्याची स्वतःची पद्धत निश्चित असणार आहे. कारण आयुष्याचा मोठ्ठा टप्पा तिने पार केला आहे. लोकांच्या अपेक्षांमध्येही कमालीची विसंगती आढळते. जसे भरपूर पगार असणारी, मोठ्या पदावर नोकरी करणारी सून हवी, पण तिने आमचे सगळे सणवार सोवळेओवळे सुट्ट्या काढून केलेच पाहिजे. आता जबाबदारीच्या पदावर असणाऱ्या सुनेने दर वेळी सुट्टीचं कसं जमवावं, हा विचार व्हायला हवा. अप्रतिम, सुंदर, वाह! अगदी या कॅटेगरीत मोडणारी सून आहे, पण ती बहुतांश वेळ पार्लर आणि जिमला घालवते याची तक्रार करायची. खूपच मेहनती, टापटीप संसार करणारी सून हवी, पण ही कशी गबाळी आहे, काकूबाई आहे म्हणून बोटे मोडायची. एकाच व्यक्तीत दोन विरोधाभासी गोष्टींची मुळात अपेक्षाच चूक नाही का?

 

कित्येक स्त्रियांना आपण घरात सून नसून कामाचा घरगडी आणतोय, असे वाटते. तोही हसतमुख. वंशवृद्धी करणारा, शक्यतो मुलाला जन्म देणारा. आपली सेवा आनंदाने करणारा. शिवाय नोकरी करून पगार हसत हसत घरच्यांकडे सोपवणारा अक्कलशून्य घरगडी. मान्य सगळे मान्य. पण तुमचं काय? सुनेची भूमिका तीच, ज्येष्ठांची मात्र आधुनिक, असं कसं? आजकाल सगळ्या ज्येष्ठ नागरिकांना मस्त जगायचंय, उत्तम आहे. जरूर जगा, पण घरातील नातवंडं तुमचीही आहेत ना!

 

सून ज्येष्ठांना वृद्धाश्रमाचा रस्ता दाखवते, असा सर्रास आरोप केला जातो. आपण २५/३० वर्षे संस्कार केलेले आपल्या पाचसात पिढ्या उद्धारणारे पुत्ररत्न काय भूमिका बजावते हा प्रश्न कुणालाच पडत नाही. कोणत्याही घरात नवीन येणारी मुलगी आपल्या पतीचे सर्वप्रथम पाणी जोखते. तोच आपला जोडीदार आहे, त्याला आपलंसं केलंच पाहिजे, हीच भावना तिची असते. त्याच्या आवडीनिवडी आत्मसात करते. त्याला आपल्या आई-वडिलांविषयी प्रेम व आदर आहे, हे लक्षात आल्यावर ती त्यांचा अपमान करण्यास धजावत नाही. मात्र स्वार्थी मुलांचा विचारच होत नाही. त्यांना मुळातच आई-वडिलांचं प्रेम नसेल तर सून काय जादू करणार? मुळात घरातील काडीही बदलायचं स्वातंत्र्य जिला नाही ती काय सासूसासऱ्यांना कुठे पाठवणार? या बाबतीत तुमचे संस्कार आणि मुलाची भूमिका हीच गोष्ट सर्वाधिक महत्त्वाची आहे. वेळ आली तर बायको सोडू, पण आई-वडिलांना वृद्धाश्रमात पाठवणार नाही, ही ठाम भूमिका ते घेत नाहीत. असं का,हे कोणीच विचारत नाही.

 

उलट ज्यांना मी मधल्या फळीची शिलेदार म्हणतेय त्या सामान्य असल्या तरी असामान्य कर्तृत्व करणाऱ्या आहेत. आपली घरं, संसार, सासू-सासरे सारे व्यवस्थित सांभाळत असतानाच त्या आपल्या आई-वडिलांचा आधार बनल्या आहेत. कुठे केवळ एक अपत्य म्हणून तर कुठे केवळ बहिणीच आहेत म्हणून. त्याही पलीकडे जाऊन नाकर्त्या भावांनी जबाबदारी झटकली म्हणून. स्वतःच्या मनाला प्रामाणिकपणे विचारा एकदा, सून पाठवू शकते का वृद्धाश्रमात? तिला देतोय का तेवढे अधिकार? स्वतःच्या नाकर्त्या, जबाबदारीपासून पळ काढणाऱ्या मुलांना झाकणं बंद करा. काही दिवसांपूर्वी चीनमधील कुटुंबसंस्था या विषयावरील लेख वाचनात आला. लोकसंख्या नियंत्रणासाठी तिकडे एकच अपत्य सक्तीचा कायदा गेली काही दशके होता. आता या एकुलत्या एक अपत्याचे लग्न झाले की, दोघांचेही आई-वडील आणि त्यांचे पिल्लू असे सात जणांचे कुटुंब गुण्यागोविंदाने एकत्र राहतं. काय हरकत आहे, असा विचार आपल्याकडेही करायला? 
 

बातम्या आणखी आहेत...