Home | Magazine | Rasik | Yashvant Popale Write About Book

पाश्चात्त्य संगीताची सुरेल सफर

यशवंत पोपळे | Update - Aug 05, 2018, 12:37 AM IST

ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून जाणीवपूर्वक, आनंद घ्यायचा, तर त्या-त्या संगीताची वैशिष्ट्यं, इतिहास-वर्तमानासह ठाऊक असावी लागतात

 • Yashvant Popale Write About Book

  कानांना सुखावतं, गोड लागतं ते संगीत. पाश्चात्त्य असो वा पौर्वात्य. पण त्याचा ज्ञानेंद्रिय उघडी ठेवून जाणीवपूर्वक, आनंद घ्यायचा, तर त्या-त्या संगीताची वैशिष्ट्यं, इतिहास-वर्तमानासह ठाऊक असावी लागतात. ही निकड मनोविकास प्रकाशनाचं अच्युत गोडबोले-दीपा देशमुख लिखित ‘सिंफनी’ हे पुस्तक पुरेपूर भागवतं...


  ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ-लेखक अच्युत गोडबोले यांना आयआयटीत असल्यापासूनच भारतीय संगीताबरोबरच पाश्चात्त्य संगीत ऐकण्याची गोडी लागली. त्यावर वाद-चर्चांच्या फैरी झडू लागल्या. पुढे कामानिमित्त परदेशी वाऱ्या सुरू झाल्यानं तिथल्या वास्तव्यात या प्रकारचं संगीत भरपूर ऐकता आलं. दीपा देशमुख या संगीत विशारद असून अच्युत गोडबोलेंमुळे त्यांना पाश्चात्त्य संगीताची आवड निर्माण झाली. प्रत्येक भेटीत आणि चर्चेत त्यांनी पाश्चात्त्य संगीत ऐकलं आणि त्यातलं मर्म समजून घेण्याचा प्रयत्न केला. यातूनच या लेखकद्वयींनी पाश्चात्त्य संगीतावर आधारित ‘सिंफनी’ हे पुस्तक वाचकांसमोर आणायचं ठरवलं.


  या द्वयीने ‘सिंफनी’मध्ये पाश्चात्त्य संगीताची कवाडं खुली होऊन त्यातला इतिहास सोप्या पद्धतीनं उलगडला आहे. मध्ययुग, प्रबोधन काळ, अभिजात कालखंड, रोमँटिक कालखंड आणि आधुनिक कालखंड असे वैश्विक पातळीवरील संगीत क्षेत्रातील बदलत्या प्रवाहांच्या अनुषंगाने इतिहासाचे कालखंड अभ्यासपूर्वक मांडले आहेत. खरंतर बदलत गेलेल्या पाश्चात्य संगीताचा रोमांचकारी इतिहास ‘सिंफनी’च्या माध्यमातून वाचकांशी बोलत आहे. त्या-त्या कालखंडातले दिग्गज संगीतकार, त्यांची आयुष्यं आणि त्यांनी निर्माण केलेल्या अवीट अशा संगीतरचना, त्यांचा संघर्ष हेही या ग्रंथात अंतर्भूत आहे. या कालखंडातले शिलेदार विवाल्डी, स्कारलाट्टी, टेलमन, हँडेल, हेडन, शूबर्ट, शोपँ, लीट्झ, चेकॉव्हस्की, डेब्युसी, बार्टोक, शॉस्ताकोविच, प्रोकोपिएव्ह, बाख, मोत्झार्ट, बीथोवन, वॅग्नर आणि ब्राह्मस हे सुरुवातीच्या काळातले संगीतकार आणि त्यांच्या रचनांवर या पुस्तकात रसाळ विवेचन आलं आहे. आपल्याकडे संगीत नृत्यादी कला जशा मंदिराच्या साक्षीने बहरल्या त्याप्रमाणे पाश्चिमात्य देशांत सुरुवातीचं संगीत चर्चसाठी रचलं जात असे. त्यानंतर संगीत कसं बदलत गेलं आणि नॉन क्लासिकल म्युझिकमध्ये ब्ल्यूज, जॅझ, कंट्री, रॉक, हिपहॉप, मेटल, पॉप या संगीतप्रकारांनी कसा शिरकाव केला, याबद्दलही ‘सिंफनी’मध्ये तपशीलवार संदर्भ आले आहेत. यात लुई ऑर्मस्ट्राँग, एल्व्हिस प्रिस्ले, बॉब डिलन, बी जीज, अबा, मॅडोना, ट्रेइसंड, मीरियम मकेबा, बीटल्स, मायकेल जॅक्सन यांनी आपल्या संगीतानं संपूर्ण जगाला कसं थिरकवलं याचीही कहाणी उलगडण्यात आली आहे.
  ज्या वयात मुलं चालायला आणि बोबडे बोल बोलायला शिकतात त्या वयात मोत्झार्टसारखा चिमुकला मुलगा उत्कृष्ट संगीतरचना करतो आणि जग प्रसिद्ध होतो, हे सगळंच अविश्वसनीय. याच मोत्झार्टचा शोकांत कळून आपलं मन मात्र सुन्न होतं. बीथोवनच्या आयुष्यातले चढ-उतार आणि त्याची दृष्टी गेल्यानंतरही त्यानं जगासमोर आणलेल्या संगीतरचना आपल्याला स्तिमित करतात. मायकेल जॅक्सन, एल्व्हिस प्रीस्ले आणि बीटल्स यांना जगभरातल्या तरुणाईनं अक्षरशः डोक्यावर घेतलं, पण याच प्रसिद्धीनं त्यांना ड्रग्जसेवनाची वाट कशी दाखवली हेही कटू वास्तव ‘सिंफनी’मध्ये उद्धृत करण्यात आलं आहे. बीटल्सचा बंडखोरपणा, मीरियम मकेबाचा स्त्री गुलामगिरीविरुद्धचा संघर्ष त्यांच्या संगीतातून व्यक्त झाला आहे.


  पाश्चात्त्य संगीताचा प्रभाव जगभर पडला. अगदी भारतातसुद्धा! आपल्याकडल्या एस.डी बर्मन, ओपी नय्यर, सी. रामचंद्र, सलील चौधरी, शंकर जयकिशन, आर.डी. बर्मनपासून, ए. आर. रेहमानपर्यंत जवळपास सर्वच संगीतकारांवर पाश्चात्त्य संगीताचा कसा प्रभाव पडला आणि त्यांनी आपल्या संगीतरचनेत त्याचा वापर कसा केला, याविषयीदेखील ‘सिंफनी’मध्ये विवेचन- विश्लेषण आले. उदाहरण सांगायचं झाल्यास अलीकडे दाखवल्या जाणाऱ्या ‘टायटन’ या घड्याळाच्या जाहिरातीसाठीदेखील मोत्झार्टच्या संगीतरचनेचा उपयोग करण्यात आला असून, त्याच्याच जगप्रसिद्ध असलेल्या ४० नंबरच्या सिंफनीचा वापर सलील चौधरींनी ‘इतना तू मुझसे ना प्यार बढा' या ‘छाया’ चित्रपटातल्या गाण्यात खुबीने केला होता याकडेही लेखकद्वयीने लक्ष वेधले आहे.


  ‘सिंफनी’ पुस्तकात व्याकरणातल्या अनेक ‘तांत्रिक’ शब्दांविषयीही सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ सिंफनी म्हणजे काय, ऑपेरा म्हणजे काय, काँचर्टो म्हणजे काय, सोनाटा म्हणजे काय, ओव्हर्चर म्हणजे काय, प्रिल्युड म्हणजे काय, एट्यूड म्हणजे काय, वॉल्ट्झ म्हणजे काय, मोटिव्हज म्हणजे काय, अशा अनेक रंजक गोष्टी. मुख्य म्हणजे, त्यांची फक्त १-२ ओळीत रुक्ष भाषेत व्याख्या दिलेली नाहीये, तर त्या समजावून सांगितलेल्या आहेत. बहुतेक ठिकाणी त्यांची उदाहरणंही दिलेली आहेत आणि कित्येक ठिकाणी या संकल्पनांसाठीच नव्हे तर इतरही ठिकाणी क्यू.आर. कोड्ज दिलेली आहेत. म्हणजे वाचता वाचता वाचकांनी स्मार्टफोनद्वारे त्या क्यू.आर.कोडवर क्लिक केलं की, ते संगीत किंवा तो तुकडा आपल्या मोबाइलवर सहजपणे ऐकता येणार आहे. मराठीत पुस्तकविश्वात हा प्रयोग अनोखा ठरावा, असा आहे. संगीताचं रूप वैश्विक असून जगभरातल्या सीमारेषा पार करून ते आसमंतात पसरतं. त्यामुळेच पाश्चात्त्य संगीत कसं ऐकावं, त्यातली वाद्यं असोत वा त्यातल्या महत्त्वाच्या संज्ञा याविषयीदेखील ‘सिंफनी’मध्ये सोप्या सुलभ भाषेत माहिती दिली आहे. जवळपास ६०० पानी असलेले हे पुस्तक पाश्चात्त्य संगीताचं मर्म उलगडण्यास सर्वथा यशस्वी ठरले आहे.

  - यशवंत पोपळे

Trending