Home | Maharashtra | Vidarva | Nagpur | yashwant deshmukh article about shvsena bjp Yuti

शिवसेनेची दुर्दशा टळली; युती होऊनही भाजप-सेनेच्या जागा घटणार

रमाकांत दाणी | Update - Mar 11, 2019, 10:58 AM IST

“सत्तेत राहूनही मोदी, भाजपवर सातत्याने टीका करणे शिवसेनेसाठी निवडणुकीत घातक ठरले असते.  

 • yashwant deshmukh article about shvsena bjp Yuti

  नागपूर - “सत्तेत राहूनही मोदी, भाजपवर सातत्याने टीका करणे शिवसेनेसाठी निवडणुकीत घातक ठरले असते. मात्र, आता युती झाल्याने शिवसेनेची संभाव्य दुर्दशा टळली आहे. हा त्यांचा एकमेव शहाणपणाचा निर्णय होता..” असे परखड मत ‘सेंटर फॉर व्होटिंग अोपिनियन अँड ट्रेंड इन इलेक्शन रिसर्च’चे (सीव्होटर) व्यवस्थापकीय संचालक आणि प्रसिद्ध निवडणूक विश्लेषण तज्ज्ञ यशवंत देशमुख यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना मांडले.


  लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशमुख यांनी महाराष्ट्र आणि देशातील राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. ‘पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर सातत्याने टीका केल्याने शिवसेनेच्या लोकप्रियतेचा आलेख खाली गेल्याचे आम्ही जनमताचा कानोसा घेतल्यावर उपलब्ध झालेल्या डेटाच्या आधारे आढळून आले होते. राज्यात मुख्यमंत्री फडणवीस यांची प्रतिमा ‘ऑलटाइम हाय’ राहिलेली आहे. तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे केंद्रात महाराष्ट्राला कधी नव्हे ते महत्त्व आले. त्याचा राज्याला फायदाही झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अभूतपूर्व यशाने भाजपमध्ये स्थानिक नेतृत्व विकसित झाले. शिवसेनेने जनमत लक्षात घेऊन पथ्य पाळणे गरजेचे होते. मात्र भाजपवर टीकेमुळे शिवसेनेच्या लोकप्रियतेचा आलेख मागील काही वर्षांत सातत्याने खालवत हाेता,’ असे ते म्हणाले.


  अँटी इन्कम्बन्सीची युतीला झळ
  “युती आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या लोकप्रियतेत सध्या दहा टक्क्यांचा फरक आहे. हा फरक बराच मोठा आहे. सध्याच्या स्थितीत युती लोकसभेला ३० जागांचा आकडा सहज गाठेल, असे डेटावरून लक्षात येते..” असे देशमुख यांनी सांगितले. “ किमान १५ ते २० मतदारसंघांत युतीला ‘अँटी इन्कम्बन्सी’ ची झळ बसू शकते, असा आमचा अंदाज आहे. शिवसेनेच्या बाबतीत हा घटक थोडा अधिक चिंताजनक आहे..” असा दावा देशमुख यांनी केला.


  काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी
  महाराष्ट्रात भाजप व काँग्रेस या दोन राष्ट्रीय पक्षांचा आलेख वाढता असल्याचे स्पष्ट दिसते आहे. तुलनेने भाजप काँग्रेसपेक्षा आघाडीवर आहे. त्यामुळे काँग्रेसला प्रत्यक्ष कामगिरीच्या दृष्टीने मर्यादा आहेत. राष्ट्रवादीने आपला आलेख मर्यादित का होईना पण ‘कायम’ ठेवल्याचे दिसते. प्रामुख्याने पश्चिम महाराष्ट्रात त्यांचे काही ‘स्ट्राँगहोल्ड’ आहेत. ते प्रामुख्याने बड्या नेत्यांमुळेच आहेत. या पक्षाला ‘पॅन महाराष्ट्र’ लोकप्रियता नाही, याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले.


  वंचित आघाडीला मर्यादा
  अॅड. प्रकाश आंबेडकर- आेवेसी यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या सभांना राज्यात माेठी गर्दी होत असली तरी लोकसभा मतदारसंघनिहाय विचार केल्यास वंचित आघाडीला फार काही साध्य करता येईल, असे दिसत नसल्याचे देशमुख यांनी सांगितले. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत वंचित आघाडी सहभागी झाली तरी प्रत्यक्षात आघाड्यांची कमिटेड मते एकमेकांना ट्रान्सफर होण्याची खात्री देता येत नसल्याचे देशमुख यांचे म्हणणे आहे.


  शेतकऱ्यांच्या मुद्द्याला निवडणुकीत मर्यादा
  राज्यात मागील चार वर्षांत सर्वात गाजलेला मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या. निवडणुकीच्या दृष्टीने हा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असला तरी प्रत्यक्षात ग्रामीण भागात जनमानसाचा कानोसा घेतल्यावर उपलब्ध डेटामध्ये त्याचा फार प्रभाव जाणवत नसल्याचे निरीक्षण देशमुख यांनी नोंदवले.


  फक्त मोदीविरोध ही काँग्रेसची घोडचूकच
  देशपातळीवर काँग्रेसने ही निवडणूक मोदींविरुद्ध राहुल गांधी किंवा काँग्रेस या पातळीवर नेण्याचा प्रयत्न चालवला आहे. काँग्रेसच्या रणनीतिकारांची ही घोडचूक आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय प्रणालीसारखी ही निवडणूक होत आहे. भाजपला नेमके हेच हवेय. काँग्रेसने प्रचाराचा रोख मोदींवर टीका टाळून मुद्द्यांवर ठेवला तर काँग्रेससाठी ते अधिक फायदेशीर ठरेल. मोदींची मध्यंतरी घटलेली लोकप्रियता सर्जिकल स्ट्राइकमुळे वाढलेली दिसते. ती मतांमध्ये किती प्रमाणात परिवर्तित होईल, हे आगामी काळात येणाऱ्या डेटातून लक्षात येईल, असे देशमुख यांनी सांगितले.


  मराठवाड्यात गाेपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वाची पाेकळी न भरल्याने भाजपला फटका बसू शकताे
  विदर्भ, मुंबईत मोदींच्या लोकप्रियतेमुळे भाजप-सेनेचा वरचष्मा राहील. मराठवाड्यात गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भाजपला भरून काढता आलेली नाही. त्यामुळे तेथे युतीच्या व प्रामुख्याने भाजपच्या जागा कमी होऊ शकतात. उत्तर महाराष्ट्रातील चित्र मात्र तेथे राजकीय पक्षांकडून दिल्या जाणाऱ्या उमेदवारांवर प्रामुख्याने अवलंबून असेल. पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादीची कामगिरी तुलनेने समाधानकारक राहील, असे डाटावरुन दिसून येत असल्याचे देशमुख म्हणाले.

Trending