आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदी सरकारच्या धोरणांमुळे आर्थिक संकट येणार : माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - 'आयएलअँडएफएस' अपयशी ठरल्यावर अमेरिकेच्या लेहमन ब्रदर्ससारखेच संकट निर्माण झाले आहे. देशातील गैर बँकिंग फायनान्स कंपन्यांची स्थिती अत्यंत वाईट आहे. देशात 'पेमेंट क्रायसिस' तयार होत असून आगामी दिवस आर्थिक संकटाचे आहेत, असा इशारा माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांनी दिला. 


अमरावती व अकोला येथील परिषदांसाठी यशवंत सिन्हा, खासदार शत्रुघ्न सिन्हा व 'आप'चे खासदार संजयसिंह नागपुरात आले होते. या वेळी यशवंत सिन्हा म्हणाले, एलआयसीमधील जनतेचा पैसा सरकार मुक्तपणे उधळत आहे. कच्च्या तेलाचे दर कमी राहिल्याने ४ वर्षे सरकारला फारसे आव्हान नव्हते. मात्र, आता गंभीर आर्थिक संकट निर्माण होत आहे. केंद्र सरकारमध्ये सबकुछ मोदीच आहेत. कॅबिनेटमध्ये कुठल्याही मंत्र्याची त्यांच्यापुढे बोलण्याची ताकद नाही. सरकार, पक्षावर मोदी व शहा यांचेच नियंत्रण आहे. मोदींविरोधात महायुती किंवा पर्यायी नेतृत्व उभे करण्याची गरज वाटत नाही. देशातील जनतेकडेच आम्ही नेतृत्व सोपवले आहे. जनताच भाजपला पराभूत करेल, असेही ते म्हणाले. 


नरेंद्र मोदी महापुरुषांचे हायजॅकर : संजय सिंह 
पंतप्रधान मोदी हे महापुरुषांचे हायजॅकर आहेत. सुरुवातीला त्यांनी सरदार पटेलांना हायजॅक केले, आता ते महात्मा गांधींना हायजॅक करत आहेत, अशी टीका आपचे खासदार संजय सिंह यांनी या वेळी बोलताना केली. 


व्यक्ती नव्हे, मुद्द्यांविरोधात माझी लढाई : शत्रुघ्न सिन्हा 
मी व्यक्तीविरुद्ध नव्हे, तर मुद्द्यांच्या विरोधात आहे, असे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी या वेळी सांगितले. देशात विकास कुठे आहे? सबका साथ..आश्वासनाचे काय झाले? असे प्रश्न उपस्थित करताना रफाल प्रकरणात सरकार पूर्णपणे फसले असल्याचे ते म्हणाले. माझे राजकीय भवितव्य निश्चित करण्यापूर्वी मी भाजपचे भविष्य पाहणार आहे, असेही ते म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...