आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

40 दिवसांत 13 जणांचे प्राण घेणाऱ्या 'अवनी'चा 6 हजार हेक्टर भागात मुक्त संचार; 6 कोटींचा खर्च करूनही सापडली नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यवतमाळ - पाच हत्ती, इटालियन श्वान, पॅरामोटार, शार्पशूटर असा फौजफाटा तसेच ६ कोटी रुपये खर्च करत २०० जणांच्या चमूकडून अविरत शोध घेऊनही यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा भागातील हल्लेखोर वाघिण 'अवनी'ला पकडण्यात अपयशच आले आहे. मात्र, तिच्या दहशतीमुळे १८ गावांतील लोक जीव मुठीत धरून जगत आहेत. हा परिसर पहाडी, उंच-सखल व छोट्यामोठ्या नाल्यांचा असून यात रायमुनीया (लँटेना) नामक गवत मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहे. त्यामुळेच ४ ते ५ फूट उंचीच्या या गवतात अवनीला शोधणे अवघड काम असल्याचे या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या एका वनाधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. 

दीड वर्षांपासून या भागात दहशत माजवणाऱ्या अवनीला पकडण्यासाठी ट्रँक्विलाइज तज्ज्ञ नवाब शाफतअली खान गेल्या महिनाभरापासून तळ ठोकून आहेत. शिवाय, प्रसिद्ध गोल्फपटू ज्योती रंधावाही त्यांच्या इटालियन कुत्र्यांसह या भागात आले. मात्र, त्यांचे सर्व प्रयत्न सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. 

शोधमोहिमेच्या गरजेनुसार ड्रोन कॅमेरे, पॅरामोटार आदी उपकरणे वापरण्यात आली, परंतु त्यांचा उपयोग झाला नाही. यापुढेही गरज भासल्यास अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग करू, असे प्रधान मुख्य वन संरक्षक (वन्यजीव) ए. के. मिश्रा यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना शेतात जाऊन काम करता यावे म्हणून वन विभागातर्फे हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. जंगल परिसरात असलेले शेतकरी व नागरिकांना वेळोवेळी वाघिणीच्या वावर असण्याविषयी माहिती देण्यात येते. अगदी जंगलाच्या सीमेला लागूनच असलेल्या शेतात एखादेवेळी अपवादात्मक प्रसंगी धोका उद््भवू शकतो. आमच्याकडून जनजागृती सुरू आहे, असे मिश्रा यांनी सांगितले. 

 

सारे प्रयत्न ठरले निष्फळ 
वाघिणीला मारण्यासाठी ताडोबातून १ व मध्य प्रदेशातून ४ असे पाच हत्ती आणले. परंतु त्यातील एक हत्ती पिसाळला. त्याने घराचे नुकसान केल्यामुळे पाचही हत्ती परत पाठवण्यात आले. त्यानंतर आंतरराष्ट्रीय गोल्फ खेळाडू ज्योती रंधावा दोन इटालियन श्वानांसह डेरेदाखल झाला. माग काढण्यात पटाईत असलेले हे श्वानही अपयशी ठरल्याने तेही परत गेले. त्यानंतर आणलेले पॅरामोटरही बिघाड झाल्याने बंद आहे, तर ड्रोन कॅमेरेही वाघिणीला टिपू शकले नाहीत. 

केंद्रीय मंत्र्यांच्या आदेशामुळे शार्प शूटर नवाबला हैदराबाद पाठवले अन् मग परत बोलावले 
वादग्रस्त शिकारी नवाब शाफतअली खान याला परत जाण्याचे आदेश केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी दिले होते. त्यामुळे तो परत गेला होता. खानची माफी मागण्यासाठी राज्याचे प्रधान मुख्य वन संरक्षक ए. के. मिश्रा यांनी यवतमाळच्या पांढरकवडा क्षेत्राच्या उप वन संरक्षक के. एल. अभर्णा यांना रात्री शाफतअलीच्या हाॅटेलात पाठवले होते. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मनेका गांधी यांनी राष्ट्रीय महिला आयोगाला याची चौकशी करण्यासाठी सांगितले. याचा अहवाल आल्यानंतर तडकाफडकी शाफतअली खानला परत पाठवण्यात आले होते. मात्र, त्यानंतर वन विभागाला यश न आल्याने शाफतअलीला परत बोलावण्यात आले आहे. 

 

माेहीम सुरूच राहणार : मुनगंटीवार 
वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना सांगितले की, हल्लेखोर वाघीण जेरबंद होईपर्यंत प्रधान मुख्य वन संरक्षकांना पांढरकवडा येथे मुक्काम करण्यास सांगितले आहे. तिला पकडण्यासाठी आवश्यक सर्व उपायांसह सर्व अत्याधुनिक उपकरणांचा वापर केला जाईल. मोहिमेचा एक निश्चित कालावधी सांगता येणार नाही. 

 

वाघिणीच्या डरकाळीचा आवाज घुमतोय ७-८ किलोमीटर परिसरात 
वाघिणीसोबत तिचे बछडे आहेत. शिवाय आजूबाजूला नर वाघही आहे. वाघिणीची डरकाळी सुमारे ७ ते ८ किमी ऐकू जाते. ट्रँक्विलाइज करण्याच्या प्रयत्नात वाघिणीने डरकाळी फोडल्यास तिचे बछडे तसेच आजूबाजूचे नरही हल्ला करू शकतात. वाघिणीचे वजन अडीच ते तीन टनांच्या घरात आहे. त्यामुळे तिला वाहून आणण्यासाठी हत्तीशिवाय पर्यायच नसल्याचे वनाधिकाऱ्याने सांगितले. 

 

बातम्या आणखी आहेत...