आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुरकेंच्या समावेशावरून संमेलन बैठकीत वादंग, महामंडळाचे अध्यक्ष जाेशींवर आयोजकांचा राेष

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर - यवतमाळ येथील आगामी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनही वादातून दूर राहू शकलेले नाही. साहित्य महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांच्या निर्णयप्रक्रियेवर अायाेजक नाराज अाहेत. रविवारच्या बैठकीत आयोजक संस्थेचे कार्याध्यक्ष रमेश काेलते, कार्याध्यक्ष घनश्याम दरणे यांची जाेशींसाेबत खडाजंगी झाल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने नाव न छापण्याच्या अटीवर दिली. निमित्त हाेते एका परिसंवादात माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके व श्रीकांत तिडके यांच्या नावाच्या समावेशाचे... या संदर्भात प्रा. रमाकांत कोलते यांनी 'व्यापक जनहित' लक्षात घेता या विषयावर बोलण्यास नकार दिला. 

 

संमेलनात 'कथा आणि व्यथा : तांड्यांच्या आणि पोडांच्या' या परिसंवादात माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंत पुरके तसेच 'मराठी समीक्षेची समीक्षा' या परिसंवादासाठी प्रा. श्रीकांत तिडके यांचे नाव सहभागी करण्यात यावे, असा आग्रह अायाेजक प्रा. रमाकांत कोलते व घनश्याम दरणे यांनी धरला. मात्र, त्याला जोशी यांनी नकार दिला. वारंवार विनंती करूनही जोशी निर्णयावर ठाम राहिल्याने अायाेजकही संतापले अाणि दाेन्ही बाजूंनी जाेरदार वादावादी झाली. दरम्यान, स्मरणिकेचे व्यवस्थापक असलेल्या एका पदाधिकाऱ्याने जोशींचा एकूण स्वभाव लक्षात घेता सबुरीची भूमिका घेतली. आयोजक संस्थेचे कार्यकर्ते संमेलनास निधी जमवण्यासाठी घरोघरी फिरत आहेत. स्थानिकांच्याही काही भावना आहेत. आयोजक संस्थेच्या कार्यकर्त्यांचे मनोबल कायम राहिले पाहिजे, यासाठी काही स्थानिक नावेही असायला हवीत. पण जोशी काही समजून घ्यायलाच तयार नाही, अशी तक्रार एका पदाधिकाऱ्याने केली. 

 

कोणीही वाद घातला नसल्याचा जाेशींचा दावा 
महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी मात्र बैठकीत वाद झाला नसल्याचे स्पष्ट केले. 'एखाद्या कामकाजाचा भाग म्हणून चाललेल्या चर्चा, व्यक्त होणाऱ्या अपेक्षा आणि त्याचे नियम, घटना, संकेत व परंपरा अनेकांना ठाऊक नसल्याने ते स्पष्ट करत केलेले खुलासे करण्याचे संस्थात्मक काम याला वाद म्हणत नसतात. अशा चर्चा या संबंधित कामकाजाचा भाग असतात. मात्र, तरीही त्याला कोणत्याही विशिष्टच कारणांसाठी जाणीवपूर्वक वादाचे स्वरूप देण्यातच वा त्याचे वादात रूपांतरच करण्यात कोणी रुची बाळगत असेल तर त्याला कोणाचाच इलाज नाही,' अशी अप्रत्यक्ष टीकाही त्यांनी केली. 

 

बातम्या आणखी आहेत...