आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यावल पालिकेत सत्ताधाऱ्यांना हादरा, उपनगराध्यक्षपदी विरोधी गटाचे कोलते 

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावल- पालिकेतील सत्ताधारी गटाला जोरदार हादरा देत उपनगराध्यक्ष पदावर विरोधी गटातील महर्षी व्यास शहर विकास आघाडीचे गटनेते राकेश कोलते विजयी झाले. मंगळवारी ही निवड झाली. त्यात काँग्रेसने उपनगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलेले शेख असलम यांनी सभेला गैरहजर राहून काँग्रेसला तोंडघशी पाडले. परिणामी ऐन वेळी सईदाबी शेख हारून यांची उमेदवारी दाखल करण्यात आली. मात्र, त्यातही सत्ताधाऱ्यांच्या पदरी अपयश येत त्यांचा एका मताने पराभव झाला. 

 

यावल पालिकेत मंगळवारी झालेली उपनगराध्यक्ष निवडणूक अतिशय चुरशीची व लक्षवेधी ठरली. त्यात शिवसेनेच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सुरेखा कोळी यांनी काँग्रेसच्या गटाला उपनगराध्यक्ष पद देऊ, असे सांगीतले होते. मात्र, विरोधकांनी देखील आपल्या गटातूनच उपनगराध्यक्ष होईल, असे जाहीर करत गेल्या पंधरवड्यापासून राजकीय वातावरण तापवले होते. त्यात सुरुवातीला काँग्रेसकडून सईदाबी शेख हारून यांचे नाव उपनगराध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले. यानंतर काँग्रेसच्या गटातून विरोधकांच्या पंक्तीत बसलेल्या शेख असलम शेख नबी यांच्या नावाची अधिकृत घोषणा करण्यात आली. नबी यांनाच मतदान करावे, यासाठी व्हीप देखील काढण्यात आला. मात्र, सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या गटाने सातत्याने डावलल्यामुळे नाराज असलेल्या शेख असलम यांनी ही ऑफर धुडकावली. गेल्या काही दिवसांपासून ते अज्ञात स्थळी रवाना झाले. त्यामुळे मंगळवारी उपनगराध्यक्ष निवडीच्या दिवशी सकाळी १० ते ११ या वेळेत काँग्रेसने पुन्हा उमेदवार बदलवून सईदाबी शेख हारून यांचा १०.४० वाजता अर्ज दाखल केला. तत्पूर्वी विरोधी गटातील महर्षी व्यास शविआकडून राकेश कोलते यांनी उमेदवारी दाखल केली होती. दुपारी १२ वाजता पालिकेत पीठासीन अधिकारी तहसीलदार कुंदन हिरे यांच्या उपस्थितीत कामकाजाला सुरुवात झाली. त्यात राकेश कोलते यांना ९ मते पडली, तर काँग्रेसच्या सईदाबी शेख हारून यांना नगराध्यक्षांच्या मतासह ८ मते पडली. एका मताने कोलते हे उपनगराध्यक्षपदी विजयी झाले. नगराध्यक्षा सुरेखा कोळी, अधीक्षक राजेंद्र देवरे, सेनेचे गटनेते दीपक बेहेडे, शविआचे गटनेते अतुल पाटील, काँग्रेसचे गटनेते सय्यद युनूस उपस्थित होते. 

 

दृष्टीक्षेपात निवडणूक, निवडीनंतर राकेश कोलते समर्थकांचा जल्लोष 
- निवड चुरशीची होणार असल्याने पालिकेसमोर चोख पोलिस बंदोबस्त 
- काँग्रेसने शेख असलम यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, ते सभेला गैरहजर 
- सकाळी १०.३०ला काँग्रेेसने बैठकीत कोण उमेदवार द्यावा? यावर निर्णय घेतला 
- दुपारी १२ वाजता दरवाजावर टकटक झाली. तेव्हा अनेकांची धडधड झाली 
- १२ वर्षांनी लेवा पाटील समाजाला उपनगराध्यक्ष पद. नपा ते महाजन गल्ली मिरवणूक 

 

काँग्रेसचा पुरता हिरमोड 
पालिकेत काँग्रेसचा सर्वात मोठा गट असून ते शिवसेनेसोबत सत्तेत आहेत. मात्र, या गटातील नगरसेवक शेख असलम यांच्याशी संपूर्ण गट सुरुवातीपासूनच अंतर राखून होता. आता उपनगराध्यक्ष निवडीवेळी काँग्रेसने त्यांच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न केला. त्यांना खुश करण्यासाठी थेट उपनगराध्यक्ष पद देवू केले. मात्र, नबी यांनी कोणत्याही प्रयत्नांना दाद न देता बैठकीला अनुपस्थित राहिले. 

 

विरोधक मजबूत 
उपनगराध्यक्षपदाच्या निवडीनंतर पालिकेत सत्ताधारी गटापेक्षा विरोधी गट अधिक बळकट झाल्याचे समोर आले. कारण दोन दिवसांपूर्वीच पालिकेच्या सर्व विषय समित्यांवर विरोधी गटाने कब्जा केला आहे. त्यामुळे पालिकेत सर्वाधिक नगरसेवक असूनही काँग्रेसची अवस्था बाबाही गेले अन् दशम्या देखील गेल्या, अशी झाली आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...