धावत्या एसटी बसचे फाटक उघडून रस्त्यावर पडला प्रवासी, उपचारादरम्यान मृत्यू, गर्दी असल्याने थांबला होता दारात

प्रतिनिधी

Apr 08,2019 11:45:00 AM IST

यावल - यावलहून भुसावळला जाणाऱ्या एका एसटी बसमधून पडून प्रवाशाचा मृत्यू झाला आहे. यावल आगारातून रविवारी निघालेल्या या बसमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. अशात भुसावळ येथील रहिवासी बंटी गुलाबचंद डोलतानी दाराजवळच थांबला होता. याचवेळी अचानक बसचे फाटक उघडले आणि बंटी धावत्या बसमधून पडला. त्याला उपचारासाठी रुग्णायलायतही नेण्यात आले. परंतु, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


यावल आगारातून बस क्रमांक एम.एच. 20 बी.एल. 1641 ही बस रविवारी रात्री पावणे नऊ वाजेच्या सुमारास भुसावळच्या दिशेने निघाली होती. बसमध्ये गर्दी असल्याने बंटी दाराजवळ उभा होता. बीएसएनएल कार्यालयासमोरून निघत असताना धावत्या बसचे फाटक अचानक उघडले आणि बंटी रस्त्यावर कोसळला. प्रवाशांनी आरडाओरड केल्यानंतर चालकाच्या लक्षात ही गोष्ट आली आणि वेळीच बस थांबवली. प्रवाशांनी खाली उतरून बंटीचा शोध घेतला तेव्हा तो रक्तरंजित अवस्थेत बेशुद्ध पडला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती.


नागरीकांनी त्यास तत्काळ यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. येथे डॉ. वसीम शेख, निलीमा पाटील, गुलाम अहमद यांनी प्रथमोपचार केले. परंतु, बंटी गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी डॉ कुंदन फेगडे, भुषण फेगडे, रितेश बारी, स्नेहल फिरके, अरूण कोळंबे आदींनाही तातडीने रुग्णालयात बोलावण्यात आले. यानंतर त्याला जळगाव सरकारी रुग्णालयात हलवण्यास सांगितले. जळगावला नेले जात असतानाच बंटीचा मृत्यू झाला. बंटी हा कुटुंबातील कमाई करणारा एकमेव माणूस होता. त्याच्या पश्चात आई, पत्नी, दोन लहान मुली असा कुटुंब आहे. याबाबत यावल पोलिसांत अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

X
COMMENT