आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येरवडा कारागृहात दाेन गटांत तुंबळ हाणामारी; 1 गंभीर, अधिकारीही जखमी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - पूर्ववैमनस्यातून दोन गटांत हाणामारी झाल्याचा प्रकार मंगळवारी येरवडा कारागृहात घडला. यात एका कैद्यासह तुरुंग अधिकारी व पोलिस शिपाईसुद्धा जखमी झाले आहेत. दरम्यान, बुधवारी पुन्हा कैद्यांत हाणमारी होऊन एक जखमी झाला. या प्रकाराबाबत राज्य मुख्य कारागृहाला अधिकृत माहितीच देण्यात आलेली नाही. 


येरवडा कारागृहात मोक्कासह खुनाच्या आरोपाखाली कैद असलेल्या तुषार नामदेव हंबीर (३२) हा हिंदू राष्ट्रसेनेचा कार्यकर्ता आणि शाहरुख खान, अमन अन्सारी तसेच सलीम शेख यांच्यात १५ दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यावरून मंगळवारी  शाहरुखने कारागृहातील शौचालयाच्या बाहेर तुषारच्या डोक्‍यावर व मानेवर खिळ्यांनी वार करून त्याला गंभीर जखमी केले. त्यानंतर अवघ्या ३-४ तासांमध्येच विरोधी गटातील १४ कैद्यांनी तुषारला मारहाण करणाऱ्या शाहरुखला लाथा-बुक्‍क्‍या तसेच विटांनी बेदम मारहाण केली. ही मारहाण सोडवण्यासाठी कारागृहातील तुरुंग अधिकारी संदीप एकशिंगे व शिपाई समीर सय्यद मध्ये आले. मात्र, त्यांनाही मारहाण करण्यात आली. एकशिंगेंच्या नाकाला, तर सय्यद यांच्या हाताला मुका मार लागला आहे. या मंगळवारच्या दोन्ही घटनांनंतर बुधवारी पुन्हा ५ ते ६ जणांनी मोहंमद जबाल नादाफ या कैद्याच्या डोक्‍यात दगड घातला. नादाफची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


दोघेही सराईत गुन्हेगार, बंदोबस्त वाढवला
तुषारवर मोक्कासह ७ गुन्हे दाखल आहेत. तर, शाहरुखवर खुनाचा गुन्हा दाखल असून अमन अन्सारी व सलीम शेख यांच्यावर लोणावळा पोलिस ठाण्यात खून व दरोड्याचा गुन्हा दाखल आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासनाने कारागृहातील बंदोबस्त वाढवला आहे. दोन्ही गटांतील आरोपींना वेगवेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.

बातम्या आणखी आहेत...