Home | Maharashtra | North Maharashtra | Jalgaon | Yes Modi is dictator, nut Dedicated dictatorship is better than weak leadership

विशेष मुलाखत : हाेय, मोदी हुकूमशहाच, दुर्बलांपेक्षा 'डेडिकेटेड हुकूमशहा'च परवडला - डाॅ. सुभाष भामरे

त्र्यंबक कापडे | Update - Apr 15, 2019, 09:04 AM IST

भाजप नेते व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे

 • Yes Modi is dictator, nut Dedicated dictatorship is better than weak leadership

  जळगाव - नरेंद्र मोदी हुकूमशहा असल्याचा आरोप विराेधक करतात. पण या देशाला दुबळ्या माणसापेक्षा डेडिकेटेड (समर्पित) हुकूमशहा माणूस पंतप्रधान म्हणून कधीही परवडणारा आहे, असे परखड मत संरक्षण राज्यमंत्री आणि धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार डॉ. सुभाष भामरे यांनी व्यक्त केले. डॉ. भामरे हे २०१४ मध्ये पहिल्यांदाच खासदार म्हणून निवडून गेले. उच्चशिक्षित असल्यामुळे त्यांना मोदींनी लगेच मंत्रिमंडळात स्थान दिले. महत्त्वाचे खातेही साेपवले. संघ आणि भाजपत कधीही नसलेले आणि ज्यांचा राजकीय वारसा काँग्रेस राहिला आहे, असे डॉ. भामरे हे मोदींच्या एवढ्या जवळ कसे गेले? त्यांना मोदी कसे वाटले? यासह अनेक विषयांवर 'दिव्य मराठी'ने डाॅ. सुभाष भामरे यांच्याशी साधलेला संवाद...


  प्रश्न : संरक्षणमंत्री म्हणून कोणती वेगळे कामे अापण केली अाहेत?
  डॉ. भामरे : भारत- पाकिस्तान सीमेवर काम करणाऱ्या जवानांचे काम प्रचंड साहसी असते. त्यांच्या जीविताला धोका हाेऊ नये म्हणून त्यांना जे हवं ते पुरवलं गेलंच पाहिजे, यासाठी आधी प्रयत्न केले. देशात अचानक युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर १० दिवस पुरेल एवढाही दारूगोळा नव्हता, अशी स्थिती २०१३ मध्ये हाेती. आता लष्कराचे अधिकार वाढवले. संरक्षण खात्यात आमूलाग्र बदल केले आहेत. जगात शस्त्र निर्मितीत प्रायव्हेट सेक्टर आहेत. आपण मागे पडलो होतो. आता प्रायव्हेट आणि पब्लिक अशा दोन्ही सेक्टरमध्ये पुढे यायला लागलो आहोत. गोपनीयतेमुुळे अजून अनेक कामांची माहिती इथे देता येत नाही.


  प्रश्न: नरेंद्र मोदी हुकूमशहा आहेत, ते मंत्र्यांना काम करू देत नाही, असा विराेधकांकडून आराेप हाेताेय?
  डॉ. भामरे : मोदी हे देशासाठी झपाटलेला माणूस आहे. जो चांगले काम करेल, त्यांच्या पाठीशी असतात आणि त्याला कामाचे स्वातंत्र्य देतात. प्रत्येक ठिकाणी मोदी जाऊ शकत नाहीत. त्यामुळे ते प्रत्येक मंत्र्यावर नजर ठेवणारी यंत्रणा बाळगून आहेत. जो माणूस स्वत: डेडिकेटेड आहे, तो दुसऱ्यांकडून ही तीच अपेक्षा बाळगणार आहे. त्यात चुकले कुठे? चांगलं आहे ना, दुबळ्या माणसापेक्षा डेडिकेटेड हुकूमशहा कधीही देशाला परवडणारा असताे.


  प्रश्न : काश्मीर स्वायत्ततेमुळे तेथील परिस्थिती बिघडली. यावर काय उपाय केले जात आहेत ?
  डॉ. भामरे : धर्म ही अफूची गोळी आहे. धर्मवेड्यांमुळे काश्मिरात अशांतता असते. स्वायत्ततेच्या नावाखाली तिथे नवीन रोजगार उपलब्ध होऊ शकत नाही. भारतात वेगवेगळ्या ठिकाणी काश्मिरी युवकांना बोलावून रोजगार दिला जात आहे. पण काही लोक तेथे लष्करावरच हल्ला करतात आणि धर्मवेडे त्यांना स्वातंत्र्यसैनिक म्हणतात. लष्कराला तिथे पाकिस्तानी घुसखाेर व देशातील अतिरेकी अशा दाेघांवरही लक्ष ठेवावे लागले. परकीय अतिरेक्यांवर हल्ला तरी करता येतो, पण देशातील गद्दारांवर हल्ला करताना 'मानवाधिकार' आडवा येतो. देशातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यातच अापले ४० जवान शहीद झाले; पण मानवाधिकार कार्यकर्त्यांनी त्याचा साधा निषेधही केला नाही. पुन्हा मोदी सरकार आल्यानंतरच ही परिस्थिती बदलू शकते.


  प्रश्न : पण यंदाच्या निवडणुकीत तर मोदी कुठेच दिसत लाट नाही, असे अनेक सर्व्हेतून पुढे आले आहे?
  डॉ. भामरे : आताची मोदी लाट दिसणारी नाही, सुप्त आहे. मोठमोठ्या शहरांमधून दळणवळणासह विकासाचे जे प्रोजेक्ट झाले आहेत. शहरी व ग्रामीण जनतेसाठी प्रत्यक्ष लाभाच्या ज्या योजना आणल्या आहेत, त्यामुळे लोक खुश आहेत. त्यातच पाकिस्तानला धडा शिकवला. त्यामुळे ही लाट आली आहे. भारताच्या बहादूर जवानांनी केलेल्या सर्जिकल स्ट्राइकमुळे बलाढ्य राष्ट्रांसह जग अचंबित झाले होते.

  प्रश्न : निवडणुकीत 'राफेल' आरोपाचा परिणाम होईल?
  डॉ. भामरे : राफेल खरेदी व्यवहाराची कोणतीही सत्य माहिती विरोधकांना नाही. निव्वळ आरोपाला काही अर्थ नाही. एकदा नाही तर १० वेळा संरक्षणमंत्री म्हणून मी स्वत: याबाबत संसदेत माहिती दिली. खरेदीपासून ते नाशिक येथील एचएएल कंपनीसोबतचा विदेशी कंपनीचा करार यासह सर्वच माहिती वेळोवेळी दिली. राफेल खरेदी व्यवहाराबद्दल विरोधक समजले नसले तरी जनता समजून आहे. त्यामुळे मोदी सरकारवर टीका करणाऱ्यांना काहीच लाभ मिळणार नाही. याउलट २०१९ च्या निवडणुकीत भाजपच्या आणखी जागा वाढतीलच.

Trending