आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रोबोट २.० मध्ये चमकले नगरचे योगेश सोहोनी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अभिनेते रजनीकांत, अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका आणि शंकर यांचे दिग्दर्शन 

प्रसिद्ध अभिनेते रजनीकांत, अक्षय कुमार यांची प्रमुख भूमिका आणि शंकर यांचे दिग्दर्शन असलेला रोबोर्ट २.० चित्रपट आठ देशांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात नगरचे कलावंत योगेश सोहोनी यांचीही भूमिका आहे. चित्रपट पाहिल्यावर अनेकांनी त्यांचे अभिनंदन केले. 


या चित्रपटाविषयी सांगताना योगेश म्हणाले, १ नोव्हेंबर २०१६ रोजी मी मुंबईहून चेन्नईला प्रयाण केले, तेव्हा सूतमात्र कल्पना नव्हती की, आपण ज्या चित्रीकरणासाठी निघालो आहोत तो रोबोर्ट २.० आहे म्हणून. मुंबईहून बोलवलेल्या २५ जणांमध्ये मी होतो. ज्यांना हिंदी संवाद म्हणता येतात त्यांचा वेगळा ग्रुप आणि जे मागे उभे राहतात त्यांचा वेगळा ग्रुप होता. नऊ मराठी मालिका आणि दोन हिंदी मालिकांमध्ये भूमिका केल्यामुळे आत्मविश्वास होता. २०० मधून १००, १०० मधून ५०, ५० मधून २५, २५ मधून १२ असे करता करता आम्हा ६ जणांना निवडण्यात आले. 


प्रथम मला मिलिटरी मँनचा पोशाख दिला होता, पण त्यांनाच तो पटला नाही. मग मला कोट देण्यात आला. शेवटी मला विवेकानंदन आयएएस होम सेक्रेटरी ही व्यक्तिरेखा देण्यात आली. मोठ्या ऑडिटोरियममध्ये घेऊन गेल्यावर आम्हा सहा जणांना स्टेजवर बोलवण्यात आले. आमचा स्वत:वर विश्वास बसत नव्हता. कारण आम्ही चक्क रजनीकांत यांच्या १२ सुरक्षारक्षकांमध्ये होतो. 


सेटवर एकदा निवांत वेळ असताना रजनीसरांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता ते माझ्याशी चक्क मराठीत बोलले. मी म्हणालो, सर, एक फोटो घेऊ का ? तेव्हा ते म्हणाले, ''अरे माझ्याबरोबर तू एकाच दिवशी आठ देशांमध्ये दिसणार आहेस. फोटो नको घेत बसू..!'' छान स्मित करत ते पुस्तक वाचण्यात तल्लीन झाले. 

 

या चित्रपटात माझ्या वाट्याला आठ संवाद आले. ते मी खूप चांगले बोललो. रजनी सरांची बेस्ट ही प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. चित्रीकरण करताना आदिल हुसेन, अँमी जँक्सन, सुधांशु आणि साऊथमधील मोठ्या स्टार मंडळींशी चांगली ओळख झाली. या सगळ्या प्रकारात चरणदास चोर हा चित्रपट हातातून गेला. 

 

त्याचं थोडं दु:ख होतं, पण जो चित्रपट चेन्नईमध्ये करत होतो, त्याने मला खूप मोठा अनुभव मिळवून दिला. शेवटपर्यंत स्वत:वरील विश्वास कमी होऊ द्यायचा नाही हे शिकवले. सदाशिव अमरापूरकर यांच्यानंतर नगरमधून रजनिकांत यांच्याबरोबर काम करण्याचा मान मला मिळाला, याचा आनंद मोठा होता, असे सोहनी यांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...