Home | National | Other State | Yogi Promises to renaming Karimnagar, Hyderabad if people elect BJP in Telangana

तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास तेथील जिल्ह्यांचीही नावे बदलणार, करीमनगरचे नाव करीपुरम करेन -योगी

दिव्य मराठी वेब टीम | Update - Dec 06, 2018, 10:46 AM IST

शेवटच्या दिवशी झालेल्या प्रचारसभेत त्यांनी ही आश्वासने दिली.

 • Yogi Promises to renaming Karimnagar, Hyderabad if people elect BJP in Telangana

  हैदराबाद - निवडणुकींमध्ये राजकीय पक्ष आणि नेते मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध प्रकारची आश्वासने देत असतात. दक्षिण भारतात मतदारांना भेटवस्तूंचे आश्वासन देणे काही नवीन गोष्ट नाही. परंतु, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आश्वासने देण्यात सुद्धा आपली वेगळीच शैली निर्माण केली. तेलंगणात भाजपची सत्ता आल्यास येथील जिल्ह्यांची नावे सुद्धा बदलणार असल्याचा दावा योगींनी केला आहे. येथील करीमनगर जिल्ह्याचे नाव बदलून करीपुरम केले जाईल. करीमनगर आणि निझामाबाद येथील प्रचार सभेला शेवटच्या दिवशी संबोधित करताना त्यांनी अशा प्रकारचे आश्वासन दिले आहे.


  हैदराबादचेही नाव बदलणार!
  योगींनी यापूर्वी 2 डिसेंबर रोजी हैदराबादेत भाजपच्या प्रचार सभेला संबोधित केले होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हैदराबादचे नाव बदलणार असल्याचे सांगितले होते. येथील नागरिकांनी सहकार्य केल्यास हैदराबादचे नाव भाग्यनगर करणार असल्याचे ते म्हणाले होते. तेलंगणात भाजपचे नेते टी राजा सिंग लोध सुद्धा यापूर्वी अशा प्रकारची आश्वासने देऊन चर्चेत आले. योगी सरकारने उत्तर प्रदेशातील प्रसिद्ध शहर अलाहाबादचे नाव प्रयागराज, फैजाबादचे नाव अयोध्या आणि मुगलसराय जंक्शनचे नाव बदलून पंडित दीनदयाल उपाध्याय जंक्शन असे केले आहे.

  राजस्थान, तेलंगणात 7 डिसेंबरला मतदान

  छत्तिसगडमध्ये 90 जागांसाठी 12 नोव्हेंबर आणि 20 नोव्हेंबरला मतदान झाले. तर मध्यप्रदेशात 230 जागांसाठी आणि मिझोरमच्या 40 जागांसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. यानंतर राजस्थानात 200 आणि तेलंगणात 119 जागांसाठी 7 डिसेंबर रोजी मतदानाला सुरुवात होत आहे. या निवडणुकीचे निकाल 11 डिसेंबर रोजी समोर येणार आहेत.

Trending