आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Yogi Sarkar Encourages Religious Tourism; Development Of Various Religious Places Of Hindu, Jain, Buddhist

योगी सरकार धार्मिक पर्यटनाला देणार प्रोत्साहन; हिंदू, जैन, बौद्ध धर्मीयांच्या, नाथपंथीयांच्या विविध धार्मिक स्थळांचा करणार विकास

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोरखपूर - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील उत्तर प्रदेश सरकारने पूर्वांचलमधील धार्मिकदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास करून या भागात धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याची महत्त्वाकांक्षी योजना सुरू केली आहे.


अयोध्येत शरयू नदीच्या किनाऱ्यावर भगवान श्रीराम यांची २५१ फूट उंच मूर्ती, कुशीनगर जिल्ह्यात गौतम बुद्धांची २५० फूट उंच मूर्ती उभारून तसेच श्रावस्ती आणि गोरखपूरमध्ये गुरू गोरक्षनाथ यांच्याशी संबंधित धार्मिक स्थळांचा विकास करून पूर्वांचलमध्ये धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देण्याचे पाऊल उचलले आहे. राज्य सरकारने या महापुरुषांशी संबंधित स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी अलीकडेच ३० कोटी रुपये देण्याची घोषणा केली आहे. या भागात गोरखपूर ते नेपाळमधील सोनौलीपर्यंतच्या मार्गाचे चौपदरीकरण, कुशीनगरमध्ये चौपदरीकरण आणि प्रस्तावित पूर्वांचल एक्स्प्रेस वेमुळे लोकांना प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल आणि पर्यटनाला प्रोत्साहन मिळेल.
पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गुरू गोरक्षनाथ मंदिराला आंतरराष्ट्रीय मानचित्रावर आणण्यात आले आहे. तेथे नाथ पंथाशी संबंधित संग्रहालय तयार करण्याची योजना आहे. सध्या तेथे १२ कोटी रुपयांची गुंतवणूक करून ते आकर्षणाचे केंद्र बनवले जात आहे. श्रावस्ती येथील नाथपंथीयांच्या महत्त्वाच्या स्थळांचा विकास करण्यात येणार आहे. त्याशिवाय गौतम बुद्ध यांचे जन्मस्थळ असलेल्या लुंबिनीच्या विकासासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.


गोरखपूर भागातील कुशीनगरमध्ये मैत्रेय योजनेची सुरुवात झाली आहे. तेथे बौद्ध सर्किट तयार होईल. त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर विकास करण्यात येईल. त्यामुळे रोजगाराच्या संधी निर्माण होतील. मैत्रेय योजनेत उच्चस्तरीय शिक्षण संस्था, आरोग्य संस्था आणि मेडिडेशन सेंटर यांचा विकास केला जाईल. पूर्वांचलमध्ये जैन आणि बौद्ध धर्माशी संबंधित धार्मिक स्थळांशिवाय नाथ पंथाशी संबंधित स्थळे उपेक्षितच होती. आता राज्य सरकारने या भागाच्या विकासासाठी रोड मॅप तयार केला आहे. त्यामुळे लोकांना विकासाबाबत विश्वास निर्माण झाला आहे. 
 

 

गोरखपूरच्या विकासासाठी गुंतवणूक परिषद
योगी सरकारने २८ आणि २९ जुलैला लखनऊमध्ये मोठ्या उद्योगपतींची गुंतवणूक परिषद आयोजित केली आहे. तीत या उद्योगपतींना गोरखपूर विकास प्राधिकरणात गुंतवणूक करण्यासाठी आकर्षित केले जात आहे. तेथे सरकारने रस्ते, पाणी, वीज यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासावर काम करणे सुरू केले आहे. गोरखपूरहून देशातील अनेक महानगरांना जोडण्यासाठी विमान सेवा, रस्ते आणि रेल्वे मार्ग तयार केले जात आहेत. त्यामुळे या भागात पर्यटक येतील आणि रोजगाराच्या संधीही निर्माण होतील, अशी राज्य सरकारला अपेक्षा आहे.

बातम्या आणखी आहेत...