आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टाइमलाइनवरचं जगणं...टाइमलाइनवरचं मरणं...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

योजना यादव

एकीकडं इथं चार भिंतीतला कम्फर्ट झोनही अनुभवायला मिळतो आणि दुसरीकडं जगभराचा संचारही. त्यामुळे प्राथमिक टप्प्यावर माझ्या कवितांमधली सार्वभौम जाणीव अधोरेखित करण्याचं काम फेसबुकनं केलं. आणि या जाणिवेतूनच पुढचा प्रवास घडत गेला. मार्क झुकेरबर्गला कवितासंग्रह अर्पण करण्यामागची भावना यातूनच उदयाला आली होती.प्रत्येकदा डिअॅक्टिव्हेट व्हावंसं

वाटलंय जगण्यातून

तू पुन्हा लॉग इन करायला भाग पाडलंस... 

मार्क झुकेरबर्ग...ही ‘मरी मरी जाय सरीर’ या माझ्या कवितासंग्रहाची अर्पणपत्रिका. ही अर्पणपत्रिका लिहिली त्याला तीन वर्षं झाली. आणि मार्क झुकेरबर्गबद्दल हे कृतज्ञ भाव जन्मले त्याला बहुधा सहासात किंवा जास्त वर्षं. आज मागे वळून बघताना थोडंसं या भावनांनी कालौघातला पुढचा टप्पा गाठला आहे, असं वाटतं. पण अर्थात मार्क झुकेरबर्गनं दिलेल्या व्यासपीठाचं महत्त्व कमी झालेलं नाही. कवीला स्वतःचा आवाज असतो. त्याला स्वतःच्या निर्मिती प्रक्रियेत गुरफटलेलं राहून स्वतःपुरता अवकाश अनुभवण्याची मुभा असते. पण या सर्जनाच्या प्रक्रियेला नेहमीच प्रतिक्रियात्मक प्रोत्साहनाची उभारीही हवीशी वाटते. प्रत्येक माणूस आपला सहधर्मा शोधत असतो. कवीला तो सहधर्मा त्याच्या कवितेशी नातं सांगणाऱ्या त्याच्यासारख्या माणसांमध्ये मिळतो. आणि फेसबुकसारखं माध्यम असे असंख्य सहधर्मा समोर उभे करतं. सीमेचं अंतर पार करून संवाद घडवतं...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यक्त होण्यातला न्यूनगंड नाहीसं करतं. इथं व्यक्त होताना दडपण येत नाही. एकीकडं इथं चार भिंतीतला कम्फर्ट झोनही अनुभवायला मिळतो आणि दुसरीकडं जगभराचा संचारही. त्यामुळे प्राथमिक टप्प्यावर माझ्या कवितांमधली सार्वभौम जाणीव अधोरेखित करण्याचं काम फेसबुकनं केलं. आणि या जाणिवेतूनच पुढचा प्रवास घडत गेला. मार्क झुकेरबर्गला कवितासंग्रह अर्पण करण्यामागची भावना यातूनच उदयाला आली होती. सुरुवातीच्या टप्प्यात फेसबुक समकालीन जगण्याचा फक्त आरसा होता. तो फक्त प्रतिबिंब पाहण्यापुरता किंवा दाखवण्यापुरता मर्यादित होता. पण नंतरच्या टप्प्यात तो जगण्याचा भाग झाला. या माध्यमानं आयुष्यात ढवळाढवळ सुरू केली. आणि या प्रतिबिंबानं स्वतःचं भक्कम स्थानच निर्माण केलं. तेही सगळ्या भल्याबुऱ्या परिणामांसकट. आणि या प्रतिबिंबाचं प्रतिबिंबही मग कवितेत उतरत गेलं. ‘मरी मरी जाय सरीर’ या संग्रहात ‘व्हर्च्युअल कोलांट्या’ या शीर्षकाची कविता आहे. या कवितेत वास्तव जगण्याचा काठ आणि अदृश्य सीमा यांतली दोलायमान अवस्था, जी त्या वेळच्या ‘मी’ही अनुभवली ती उतरलेली दिसते. त्या कवितेची सुरुवात अशी आहे -   

नात्याचेही असतात उंबरठे

सीमेवर उभं राहून

ठरवायचं

ओलांडायचे की नाही  


अर्थात या नात्यातल्या उंबरठ्यांमध्ये प्रत्यक्ष नात्यातले उंबरठे आहेत, तसेच व्हर्च्युअल नात्यातल्या सीमाही आहेत. पण व्हर्च्युअल सीमांची जेव्हा वास्तवासोबत सरमिसळ होते, तेव्हा कविता शेवटाकडे म्हणते-निर्णय एक पाऊल मागे असतो

मन दहा मैल पुढे

पण व्हर्च्युअल कोलांट्यांनी

जगणं सैल होत नाहीमी मांडलेल्या तत्कालीन व्हर्च्युअल कोलांट्या व्यक्तिसापेक्ष होत्या. पण फेसबुकनं सामाजिक माध्यम म्हणूनही स्वतःची परिणामकारकता दाखवून दिली आहे. आज देशभर होणाऱ्या चळवळींचं फेसबुकवर एक स्वतंत्र स्वरूप पाहायला मिळतं. समर्थक गटांमधली टोळीयुद्धं फेसबुकवर अधिक गडद होताना आणि काही वेळा भयावह होताना दिसतात. प्रत्येकाचा व्यक्त होण्याचा अधिकार अधोरेखित होताना प्रत्येकाचा जणू आकांत करण्याचा अधिकारही इथं अधोरेखित होत आहे. त्यामुळे काही वेळा या माध्यमाची भीतीही वाटते. आजच्या कवितेला फेसबुकनं अनेक अर्थानं नवा आयाम दिला आहे. इथं स्वतःच्या कवितांवर मिळणाऱ्या प्रतिक्रियांसोबतच समकालीन लेखनाची व्याप्तीही पडताळता येऊ शकते. त्यातून वेळीच आत्मनिरीक्षणाची गरजही लक्षात येते. आणि कुठे थांबायला हवं किंवा काय करू नये, याचं आत्मभानही येतं. अर्थात स्वतःशी प्रामाणिक राहून त्याचा स्वीकार करायचा की काळ ढकलण्यापुरतं वाहत्या गंगेत वाहत राहायचं, हे आपलं आपल्यालाच ठरवायला हवं. फेसबुक एक चॉइस आहे आणि फेसबुकमध्ये अनेक चॉइस आहेत. या पर्यायांमुळे येणारी गोंधळाची स्थिती अपरिहार्य आहे. त्या स्थितीचं काय करायचं हे मलाही उमगलेलं नाही. पण समृद्ध करणाऱ्या गोष्टी जवळ करत राहिलं आणि कक्षा विस्तारणाऱ्या फेसबुकी जगात स्वतःच्या कक्षा थोड्या बाय चॉइस रुंदावून घेतल्या तर काहीतरी गवसू शकतं, हा विश्वास माझ्यात आजही कायम आहे. स्वतःत चांगल्या गोष्टी झिरपवत नेणं हीच एक खरी सर्जनाची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया बाधित होणार नाही, याची काळजी घेत आज फेसबुकसह सगळीकडेच वावरावं लागतं. पण फेसबुकवर अकाउंट डिलीटचा पर्यायही आहे.  हीच ऐच्छिकता महत्त्वाची आहे. फेसबुकला लॉग इन करून दहाएक वर्षं झाली. एकदोनदा तात्पुरतं डिअॅक्टिव्हेटही करून झालं. पण त्या माध्यमातल्या अस्तित्वाला ऐच्छिकता पर्याय तिथून बाहेर पडू देत नाही. पाय मोकळे ठेवले की वासरांना वाटेला लागावं वाटत नाही, मार्क झुकेरबर्गला हे कळलं आहे. त्यामुळं हा लेख उरकून मला माझ्या टाइमलाइनकडे वळायचं आहे. कदाचित हा लेखही टाइमलाइनला यायला उत्सुक आहे. 
संपर्क-  ९५७९७६०१२३

बातम्या आणखी आहेत...