आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'आपली सत्ता आलीय, त्यामुळे फक्त बदली नि बढतीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका...', मुख्यमंत्र्यांचा शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला 'डोस'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भाजपला टोला : 'ते' बुद्धिबळाच्या पटावर असतील, तर तेथे मी फुटबॉल खेळणार नाही

औरंगाबाद- 'आपली सत्ता आलीय, त्यामुळे फक्त बदली नि बढतीची कामे घेऊन माझ्याकडे येऊ नका...' अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मराठवाड्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांचे कान टाेचले. भाजपला उद्देशून 'ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी देखील बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही', असा टोलाही त्यांनी लगावला. हिंदुत्वाची दिशा दाखवणाऱ्या मित्राचा त्यांनी (भाजपने) घात केला, आपण त्यांना त्यांची दिशा दाखवू, असा इशाराही ठाकरेंनी दिला.दाेन दिवस शासकीय दाैऱ्यावर अाैरंगाबादेत अालेले ठाकरे यांनी शुक्रवारी मुंबईत परतण्यापूर्वी शिवसेनेच्या मराठवाड्यातील जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख तसेच लोकप्रतिनिधींची महत्त्वाची बैठक घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, रोजगार हमी योजना मंत्री संदीपान भुमरे, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, आमदार संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल, प्रा. रमेश बोरनारे, उदयसिंह राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, संपर्कप्रमुख विनोद घोसाळकर, जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे, महापौर नंदकुमार घोडेले आदी यावेळी उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, 'आता तीन पक्ष एकत्र आले आहेत. खरे तर तसे होणार नव्हतेच; परंतु आपल्याच मित्राने घात केल्याने हा निर्णय घ्यावा लागला. काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत का जावे हा मोठा प्रश्न होता. एका बाजूला साखरेला लावलेले विष आणि दुसऱ्या बाजूला नुसतेच विष ठेवलेले असेल तर काय करणार? याचा अर्थ आम्ही हिंदुत्व सोडले असा होत नाही. हिंदुत्व सोडणार नाही, हातातला भगवा सोडणार नाही. ते (भाजप) जर काश्मीरमध्ये महेबूबा मुफ्ती यांच्याबरोबर जाऊ शकतात, तर आम्हालाही आमची मते आहेत. ते बुद्धिबळ खेळत असतील तर मी सुद्धा बुद्धिबळाच्या पटावर फुटबॉल खेळणार नाही. आम्हालाही बुद्धिबळ खेळता येतेच,' असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्र्यांनी सांगूनही स्थायी सभापतींकडून कार्योत्तर मान्यता नाहीच


दीड वर्षापासून रखडलेला हर्सूलचा कचरा प्रक्रिया प्रकल्प तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी मनपाला दिल्या. मात्र त्यानंतरही स्थायी समिती सभापतींनी शुक्रवारी कार्योत्तर मान्यता दिली नाही. त्यामुळे आयुक्त अास्तिककुमार पांडेय यांनी प्रकल्पाच्या कामाची संचिका घनकचरा विभागाकडून मागवून घेतली अाहे.

गुरुवारी महापालिकेच्या विषयांसंदर्भात झालेल्या बैठकीत स्थानिक आमदारांसह माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या कामांच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्‍त केली. मुख्यमंत्र्यांनी रखडलेल्या हर्सूल प्रकल्पाबाबत विचारणा केली तेव्हा स्थायी समितीने यापूर्वीची निविदा प्रक्रिया रद्द केल्याची माहिती देण्यात आली. त्यावर मुख्यमंत्र्यांनी जुनीच निविदा अंतिम करून तातडीने कामाला सुरुवात करा, असे आदेश दिले. तथापि, स्थायी समितीने निविदा रद्द करत नव्याने निविदा काढण्याचे आदेश दिल्यानंतर सिव्हिल व मेकॅनिकल अशा दोन्ही कामांची निविदा एकत्र काढण्याची तयारी प्रशासनाने केली होती. त्यानुसार हा प्रकल्प सुमारे ३६ कोटींवर जाणार होता. त्यातच आता मुख्यमंत्र्यांनी जुनीच निविदा अंतिम करण्याचे आदेश दिल्याने शुक्रवारी आयुक्‍तांनी घनकचरा विभागाकडून या कामाची संचिका मागवून घेतली. संचिका तपासून जुनी निविदा मंजूर करायची की नव्याने निविदा प्रक्रिया राबवायची यासंदर्भातील निर्णय आयुक्त पांडेय घेणार असल्याची माहिती महापौर नंदकुमार घोडेले यांनी दिली.

सत्तेचा वापर सामान्यांसाठी


आपली सत्ता आली आहे याचा अर्थ बदल्या आणि बढत्याची प्रकरणे घेऊन आमच्याकडे येऊ नका. सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करा, पक्षासाठी सत्तेचा वापर करा, असे ठाकरेंनी स्पष्ट केले. १९९५ ला जेव्हा युतीची सत्ता आली होती तेव्हा शिवसेना व भाजपच्या कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्या, तसेच बढतीचीच कामे केली होती आणि त्यामुळे युती बदनाम झाली होती, याचे स्मरण ठाकरे यांनी यानिमित्ताने करून दिले.

'मिळेल ती खुर्ची घ्या, वाद नको'


या बैठकीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार काहीसे विलंबाने पोहोचले. ठाकरे यांचे भाषण सुरू हाेते तेव्हा ते अाले. कार्यकर्त्यांनी त्यांना खुर्ची मिळवून देण्यासाठी धावपळ केली, याकडे ठाकरेंचे लक्ष गेले. शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडे बघत व सत्तारांना उद्देशून ठाकरे म्हणाले, 'मिळेल ती खुर्ची घ्या आणि बसा. खुर्चीवरून उगीच वाद घालू नका, शिवसेनेत असे चालत नाही..' यामुळे एकच हशा पिकला.

'मी पुन्हा येईन' असा संदेश देत मुख्यमंत्र्यांच्या दाैऱ्याचा समाराेप


मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा दीड दिवसाचा औरंगाबाद दौरा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता संपला. या दौऱ्यात ते मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील कामांचा आढावा घेणार होते. प्रत्यक्षात फक्त चारच जिल्ह्यांचा आढावा घेतला. उर्वरित चार जिल्ह्यांचा आढावा घेण्यासाठी मी लवकरच येईन, असे संकेत देत ते मुंबईला रवाना झाले.

गुरुवारी ठाकरे यांनी अर्थातच औरंगाबाद जिल्ह्याला प्राधान्य दिले. परभणी, उस्मानाबाद या जिल्ह्यांची बैठक घेण्याबरोबरच त्यांनी औरंगाबाद जिल्ह्याची बैठक घेतली. त्याचबरोबर औरंगाबाद महापालिकेच्या मुद्द्यांवरील बैठकीलाही जास्तीचा वेळ दिला. औरंगाबाद जिल्हा आणि महापालिका असा विचार केला तर जिल्ह्यापेक्षा त्यांनी महापालिकेला जास्तीचा वेळ दिल्याचे दिसून येते. 'सर्वांचे ऐकून घेण्यासाठी मी आलोय,' असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानुसार त्यांनी सर्वांचे ऐकून घेतले खरे, पण विविध कामांबाबत माहितीही जाणून घेतली. जागेवरच प्रश्न सोडवण्याचा 'ठाकरी दणका' दाखवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. शुक्रवारी त्यांनी फक्त लातूर जिल्ह्यातील अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींची बैठक घेतली. आता बीड, हिंगोली, जालना आणि नांदेड या चार जिल्ह्यांच्या आढावा बैठकीसाठी ते पुन्हा येणार असल्याचे संकेत देण्यात आले. थोडक्यात 'मी पुन्हा येईन' असा हा संदेश आहे.

नहरींना धोका नाही : हर्सूल सावंगी तलावाला लागूनच हा प्रकल्प असल्याने या भागातून येणाऱ्या नहरी, तलावाचे पाणी दूषित होण्याचा धोका व्यक्त केला जात होता. त्यामुळे या प्रकल्पावर आक्षेप घेण्यात आले होते. तथापि, तपासणीतून नहरींना व तलावाचे पाणी दूषित होण्याचा कोणताही धोका नाही. तसे प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवण्यात आले आहे. न्यायालयातही शपथपत्र देण्यात आले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाचीही मान्यता या प्रकल्पाला मिळणार असल्याचे महापौर घोडेले यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...