आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्ही आसन क्र. अ 8, 9, 10 च्या प्रभावाखाली आहात का?

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिषेक भोसले

तुम्ही-मी पाहत असलेल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनाही असा आशय एका स्रोतांकडून पुरविला जात असतो. आपण त्यावरून आपली मतं बनवत असतो. आशय पुरविणाऱ्या लोकांना त्यातून काही अपेक्षित असतं. विशेषत: ते करत असलेल्या कामाला तुमची मूक संमती. त्यातून हे सगळं घडविण्यात येतं. वाचक आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला ते वास्तव वाटायला लागतं. त्या प्रभावाखाली आपण येतो.

‘छपाक विरूद्ध तानाजी' अशी सिनेमाची कुस्ती मागच्या काही आठवड्यांत रंगली. छपाक सिनेमातील अभिनेत्री कलाकार दीपिका पदुकोणने जेएनयूमधील हिंसाचारानंतर जेएनयूमधील विद्यार्थ्यांना समर्थन देण्यासाठी विद्यापीठातील एका कार्यक्रमाला हजेरी लावली. "एंटरटेनमेंट... एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंटसाठी सिनेमा' अशा सिनेमाच्या नव्या राजकारणाची पाळंमुळं आपल्या बाजूला रुजवली गेल्यामुळे दीपिकाचे जाणे अनेकांना आवडले नाही.त्यानंतरच काही दिवसांनी तिचा बहुचर्चित सिनेमा छपाक प्रदर्शित होणार होता. दीपिकाच्या जेएनयूमधील उपस्थितीमुळं दुखावलेल्या समूहानं दीपिका पदुकोणच्या छपाक सिनेमावर बहिष्कार घालावा असा ट्रेंड #BoycottChappak खाली चालविला. हे सगळं अतिशय नियोजनबद्ध केले जात असल्यामुळे अनेकांनी सिनेमा पाहणार नाही अशी भूमिका व्यक्त करायला सुरुवात केली. हे सगळं करत असताना काही उत्साही ट्विटरधारकांनी छपाक सिनेमाचे काढलेले तिकीट रद्द केल्याचे स्क्रीनशॉट ट्विटरवर टाकायला सुरुवात केली. रद्द केलेल्या अशा तिकिटांचे फोटो ट्विटरवर ओसंडून वाहायला लागले. जेव्हा ह्यातल्या बहुतांश तिकिटांचे डिटेल्स नीट पाहिले तर लक्षात आले की, अकोट, बडोदामधील सिनेमार्क नावाच्या चित्रपटगृहाच्या १०  जानेवारीच्या संध्याकाळी ६.५० वाजताच्या शोचं स्क्रीन क्र. १ चं आसन क्र. अ ८, ९ ,१० चं हे तिकीट आहे. म्हणजे अनेक जण आम्ही तिकीट रद्द केले आहे असे सांगत फोटो टाकत होते, पण तो फोटो एकाच तिकिटाचा होता. 

याचा अर्थ काय तर दीपिका पदुकोण किंवा छपाक ह्या सिनेमावर मोठ्या प्रमाणात नागरिक बहिष्कार टाकत आहेत हे पसरविण्यासाठी कोणी तरी म्हणजे हे आसन क्र. ८, ९ आणि १० वरच्या लोकांनी ते तिकीट रद्द केले आणि बहुतांश लोकांना हा फोटो पुरविला गेला आणि त्या लोकांनी तो फोटो त्यांच्या ट्विटरवर टाकून एक ट्रेंड प्रस्थापित केला. म्हणजे काय तर फोटोचा स्रोत हा एकच होता. माहिती कोणातरी एकानेच पुरविली. बाकीच्यांना त्याच्या फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम खात्यांवरून एकाच स्रोताकडून आलेली माहिती पोस्ट केली. त्यातून बहुसंख्याक लोकसंख्या तसाच विचार करत आहे हे भासविण्यात आलं. हे पहिल्यांदा झालं का? तर नक्कीच नाही. विशेषत: वृत्त माध्यमांचा विचार करताना हे गांभीर्याने पाहिले पाहिजे. समजून घेतले पाहिजे. काश्मीरसंदर्भातलं कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीरमधली परिस्थिती नक्की कशी आहे हे बाहेरच्या कोणालाच समजत नव्हतं. काश्मीरमधील इंटरनेट व टेलिफोन बंद करण्यात आले होते. संसदेने काश्मीरसंदर्भातले विधेयक मंजूर केल्यानंतर दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या काश्मीर दौऱ्याच्या बातम्या बहुतांश वृत्तवाहिन्यांवर प्रसारित झाल्या. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसोबत काश्मीरमधील नागरिक अल्पोपाहार करत असल्याचे फोटो व्हायरल करण्यात आले. त्यासोबत काश्मीरबद्दलच्या निर्णयानं काश्मीरमधील नागरिक समाधानी आहे असे मेसेजेस त्यासोबत फिरवले जात होते. 

आज दीडशे दिवसांनंतर आपणा सर्वांना हे माहिती आहेच की, ३७० हटविण्याच्या निर्णयावर काश्मिरी जनतेचे मत काय आहे. पण जेव्हा हा निर्णय झाला त्याच्या दुसऱ्या दिवशीच थेट काश्मीरमधून स्थानिक नागरिक समाधानी असल्याच्या बातम्या कशा काय आल्या असतील?  त्या काळात झालेले सर्व वार्तांकन जर पाहिले तर लक्षात येते की, त्या सर्व बातम्या एकाच सूत्राकडून आल्या असाव्यात. बहुतांश वृत्तवाहिन्यांमध्ये पत्रकारांशी बोलणारी माणसे तीच होती. विविध वृत्तवाहिन्यांचे पत्रकार जर वार्तांकन करण्यासाठी काश्मीरमध्ये गेले तर वार्तांकनामध्ये विविधता दिसून येण्याची शक्यता असू शकते. पण सर्व वृत्तवाहिन्यांकडे  जेव्हा एकसारखीच बातमी आणि दृश्य असतील तर प्रेक्षक म्हणून आपण हे लक्षात घ्यायला हवे की स्क्रीन त्या वृत्तवाहिनीची आहे, पण त्या वेगवेगळ्या स्क्रीनवाल्या वृत्तवाहिन्यांना आशय पुरविणारा कोणीतरी एकच आहे. ह्याचा अर्थ असा होतो, की तुम्हाला काही ठरावीक उद्देशाने  काही तरी हेतू ठरवलेले भासविण्यासाठी तसा आशय निर्माण करण्यात येतो. तो वेगवेगळ्या वाहिन्या, वर्तमानपत्र आणि संकेतस्थळांवरून प्रकाशित आणि प्रसारित केला जातो. त्यामुळे वाचकांना आणि प्रेक्षकांना असे वाटू शकते की हे सत्यच आहे.  अनेक जण रचित सत्य तुमच्यासमोर मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या मंचावरून सांगायला लागले तर आपोआप तुमचा त्यावर विश्वास बसायला सुरुवात होते. पण हे सत्य कोणीतरी त्याच्या राजकीय वा आर्थिक फायद्यासाठी रचलेलं असतं हे विसरता कामा नये.  

मागच्या वर्षी सिनेसृष्टीतील अनेक अभिनेते आणि अभिनेत्रींनी #BetiBachoBetiPadao खाली एकाच दिवशी एकसारखेच एका ओळीचे ट्विट करत सदर योजनेचे आणि पंतप्रधानांचे कौतुक केले. चांगल्या कामासाठी कोणाचेही कौतुक व्हायलाच हवं. पण ते कौतुक रचलेले असेल तर? ह्या कलाकारांनी केलेल्या ट्विटबद्दलही ही शंका व्यक्त करण्यात आली. कलाकारांनी खरंच ते कौतुक करायचं असतं तर त्यांनी त्यांच्या भाषेत भावना व्यक्त केल्या असत्या. पण संपूर्ण ट्विट पाहिले तर लक्षात येतं, की त्या ट्विटमधली मेसेज हा कोणीतरी तयार करून दिलेला आहे आणि तुम्ही फक्त तुमच्या ट्विटरवरून तो प्रसारित करायचा आहे. कलाकार काय म्हणतात याचा सामान्य नागरिकांवर प्रभाव पडत असतो. त्यांचे आचरण करण्याचा प्रयत्न सर्वसामान्य नागरिक करत असतो. जर तो कलाकार कोणाचे कौतुक करत असेल, सामान्य माणसाला ती व्यक्ती योग्य काम करत आहेत असा विश्वास निर्माण होऊ शकतो. पण बहुतांश वेळा कलाकार त्यांच्या वैयक्तिक हितसंबंधातून असे मेसेज करू शकतात. पण कलाकारांचे फॉलोअर्स ते सत्य मानून त्या धोरणांना पाठिंबा देऊ शकतात. कारण त्यांच्या आवडत्या अभिनेता किंवा अभिनेत्रीनं तिच्या ट्विटरवरून ते सांगितलेले असते.  कलाकार असे का करतात हे समजून घ्यायचे असेल तर फेब्रुवारी २०१९ मध्ये कोब्रा पोस्ट या संकेतस्थळाने केलेले स्टिंग ऑपरेशन मदत करू शकते. ऑपरेशन कराओके नावाने  करण्यात आलेल्या या स्टिंग ऑपरेशनमध्ये सिनेसृष्टीतील काही कलाकारांना क्रोबा पोस्टने संपर्क केला. विशिष्ट राजकीय विचारधारेचा प्रचार त्यांच्या सोशल मीडिया खात्यांवरून करण्यासाठी त्यांना पैसे देऊ केले.  

बहुतांश सिनेकलाकारांनी त्यासाठी सहमती दर्शविली होती. कलाकारांनी फक्त त्या विचारधारा, व्यक्ती, त्यांची धोरणं, त्यांचे निर्णय यांचं कौतुक त्यांच्या पोस्टमधून करायचं होतं. त्या पोस्ट त्यांना पुरविल्या जाणार होत्या.  त्यामुळं फक्त कलाकार नाही तर तुम्ही-मी पाहत असलेल्या वृत्तवाहिन्या आणि वर्तमानपत्रांनाही असा आशय एका स्रोताकडून पुरविला जात असतो. आपण त्यावरून आपली मतं बनवत असतो. आशय पुरविणाऱ्या लोकांना त्यातून काही अपेक्षित असतं. विशेषत: ते करत असलेल्या कामाला तुमची मूकसंमती. त्यातून हे सगळं घडविण्यात येतं. वाचक आणि प्रेक्षक म्हणून आपल्याला तो वास्तव वाटायला लागतं. त्या प्रभावाखाली आपण येतो. माध्यमातलं वैविध्य जपणं गरजेचं आहे. कारण ते तुमच्या मतांचे, सहमतीचे, विरोधाचे प्रतिनिधित्व करत असतात. असाच एककेंद्री आशय मतांच्या विविधतेला आणि सत्याला मारक असतो. सत्य मारण्याचे काम, रचित सत्य निर्माण करण्याचं काम आसन क्र. ८, ९, १० वर बसलेले लोक करत असतात. सध्या तरी आपण ह्या लोकांच्या प्रभावाखाली आहोत का, याचा विचार करायला हवा.

लेखकाचा संपर्क - ८६६८५६१७४९

बातम्या आणखी आहेत...