Home | Magazine | Rasik | You just like as me Article by Pradnya daya Pawar

तुम बिल्कुल हम जैसे निकले !

प्रज्ञा दया पवार | Update - Dec 09, 2018, 12:09 AM IST

फहमीदा रियाज या उदारमतवादी, स्त्रीवादी कवयित्री. त्यांनी पाकिस्तानमधील लष्करी राजवटीवर सातत्यानं टीका केली.

 • You just like as me Article by Pradnya daya Pawar

  फहमीदा रियाज या उदारमतवादी, स्त्रीवादी कवयित्री. त्यांनी पाकिस्तानमधील लष्करी राजवटीवर सातत्यानं टीका केली. त्यांचं लेखन अश्लील ठरवलं गेलं. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. ‘आवाज' नावाचं नियतकालिक चालवल्याबद्दल त्यांना व त्यांचे पती जफर अली उजान यांना झिया सरकारने देशद्रोही असा आपल्याकडे अलीकडे विलक्षण लोकप्रिय झालेला आरोप ठेवून तुरुंगात डांबलं होतं...

  तुम बिल्कुल हम जैसे निकले,

  अब तक कहाँ छुपे थे भाई
  वो मूर्खता, वो घामड़पन,
  जिसमें हमने सदी गँवाई
  आख़िर पहुँची द्वार तुम्हारे,
  अरे बधाई, बहुत बधाई

  ८०च्या दशकाच्या उत्तरार्धात भारतात हिंदुत्वाचा हैदोस सुरू झाला तेव्हा एका पाकिस्तानी कवयित्रीच्या हातून लिहिल्या गेलेल्या या उपरोक्त ओळी खरं तर हिंदुत्वाच्या तत्कालीन राजकारणाला सणसणीत चपराक लगावणाऱ्या ठरायला हव्या होत्या. ते होणं तर दूरच राहिलं, पण आगामी काळात भारतामध्ये या ओळी अधिकाधिक प्रस्तुत ठरत जाव्यात हा एक दैवदुर्विलासच म्हटला पाहिजे. या ओळी लिहिणाऱ्या ज्येष्ठ कवयित्री व लेखिका फहमीदा रियाज यांचं अलीकडेच लाहोरमधील एका रुग्णालयात प्रदीर्घ आजाराशी झुंजत असताना निधन झालं. त्या पाकिस्तानी असल्याने कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना पण भारतावर तुच्छतेनं हसतात यात नवल ते काय, असं लगेच आपल्या मनात येईलही, पण त्यांच्याविषयी इतक्या घाईने निष्कर्ष काढण्यापूर्वी त्या नेमक्या कोण होत्या आणि काय करत होत्या हे पाहणं इष्ट ठरावं. फहमीदा रियाज या उदारमतवादी, स्त्रीवादी कवयित्री. त्यांनी पाकिस्तानमधील लष्करी राजवटीवर सातत्यानं टीका केली. त्यांचं लेखन अश्लील ठरवलं गेलं. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले. ‘आवाज' नावाचं नियतकालिक चालवल्याबद्दल त्यांना व त्यांचे पती जफर अली उजान यांना झिया सरकारने देशद्रोही असा आपल्याकडे अलीकडे विलक्षण लोकप्रिय झालेला आरोप ठेवून तुरुंगात डांबलं होतं. या संकट प्रसंगी त्यांच्या मदतीला धावून आल्या सुप्रसिद्ध भारतीय लेखिका अमृता प्रीतम! अमृता या फहमीदा यांच्या मैत्रीण. त्यांनी इंदिरा गांधींकडे शब्द टाकला आणि फहमीदा यांना एका मुशायऱ्याचं निमित्त करून भारतात आणलं गेलं आणि इथेच राजकीय निर्वासित म्हणून राहण्याची त्यांना परवानगी मिळाली. पुढची सात वर्षे त्या भारतात राहिल्या. लवकरच त्यांचे पती आणि मुलंही भारतात वास्तव्यास आली. पुढे झियांच्या मृत्यूनंतर बेनझीर भुट्टो यांच्या राजवटीत त्या पाकिस्तानात परतल्या. तसं तर फहमीदा यांचा जन्मही भारतातला. २८ जुलै १९४६ रोजी उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये जन्मलेल्या फहमीदा वयाच्या अवघ्या दुसऱ्या-तिसऱ्या वर्षी आपल्या कुटुंबीयांसमवेत पाकिस्तानला गेल्या.

  फहमीदा यांचं भारताशी असं अखेरपर्यंत नाळेचं नातं होतं. नाळ जी तुटल्यामुळेच मुळापासून जिवंत राहते! त्यामुळेच त्यांच्या सुरुवातीला दिलेल्या ओळी कुणा परक्याच्या नसून अगदी सच्च्या भारतीय व्यक्तीच्याच ओळी म्हणाव्या लागतील. भारताबाबतचं त्यांचं भविष्य इतकं खरं ठरेल याची त्यांनी कल्पनाही केली नसावी. त्यांच्या दुसऱ्या एका कवितेत त्या म्हणतात -

  चार-सू है बडी वहशत का समाँ
  किसी आसेब का साया है यहाँ
  कोई आवाज सी है मार्सिया-ख्वाँ
  शहर का शहर बना गोरिस्ताँ
  याचा शब्दशः अनुवाद असा : चारही दिशांना प्रचंड भीतीचं वातावरण आहे / कुणा सैतानाची सावली आहे इथं / शोकगीत ऐकू येतंय इथंच कुठं / शहरासारखं शहर स्मशान बनून गेलंय.

  हा कालचा पाकिस्तान होता तर आजचा भारत आहे. चारच दिवसांपूर्वी फहमीदाच्या जन्मगावापासून जेमतेम तास दीड तासाच्या अंतरावर असणाऱ्या बुलंदशहरमध्ये हिंदुत्त्ववादी संघटनांच्या पुढाकारानं जमलेल्या जमावानं कायदा व सुव्यवस्था टिकवू पाहण्याचं आपलं कर्तव्य पार पाडणाऱ्या सुबोध कुमार सिंग या इन्स्पेक्टरना गोळ्या घालून ठार मारलं. देशभरात हिंसेचा उद्रेक चालू आहे. २०१९च्या निवडणुका काहीही करून जिंकण्यासाठी अयोध्येतील राम मंदिर, केरळमधील सबरीमाला मंदिर हे मुद्दे नियोजनबद्ध रीतीनं पेटवले जात आहेत. देशभरातील संमिश्र संस्कृतीचा वारसा सांगणारी शहरांची नावं बदलली जात आहेत. फहमीदाचं दु:स्वप्न आज आपण पुरेपूर जगत आहोत. पण इथल्या उच्चजातीय, उच्चमध्यमवर्गाला मात्र पाकातले गुलाबजाम रिचवून रिचवून ग्लानी आलेली आहे.

  सर्जनशीलतेच्या ढेकरा देण्यात तो मश्गुल आहे. पण आता हे फार काळ टिकणार नाही. त्याची सुरुवातही झालेली आहे. नीरव मोदी पंजाब ऩॅशनल बँकेतून २ अब्ज डॉलर्स लुटून इंग्लंडला पळून गेला. तत्पूर्वी प्रधानसेवकांशी असलेली त्याची सलगी अवघ्या देशाने पाहिलेली आहे. अलीकडेच त्याने ब्रिटनमध्ये राजकीय निर्वासित म्हणून राहता यावं अशी विनंती तेथील सरकारकडे केली. नीरव मोदी हा राजकीय निर्वासित कसा? त्याचं म्हणणं आहे, भारतात त्याच्याविरोधात इतकं वातावरण तापवलं गेलं आहे की, जर तो भारतात परतला तर त्याला जिवंत राहू दिलं जाणार नाही. त्याची झुंडहत्या केली जाईल. पहा, आजवर अल्पसंख्य आणि दलितांसाठी राखीव असणाऱ्या झुंडहत्या जात व वर्गाच्या सीमा ओलांडून आपली दहशत पसरवण्यात यशस्वी झालेल्या आहेत. अडीच-तीन वर्षांपूर्वी आमीर खानने एका जाहीर कार्यक्रमात त्याच्या पत्नीला – किरण रावला भारतात राहण्याची भीती वाटू लागली आहे, असं म्हणताच त्याच्यावर अत्यंत शिवराळ भाषेत हिंदुत्ववादी वर्तुळातून टीका करण्यात आली होती. राणी पद्मावतीची भूमिका अभिनित करून दिपिका पदुकोणने राजपुतांचा अवमान केल्याने तिचं नाक कापण्याची घोषणा केली गेली होती. आणि असा असहिष्णु, हिंसक भारत सोडण्याची भाषा कुणी उद्विग्नतेनं जरी केली तरी त्याला सळो की पळो करून सोडलं गेलेलं आहे. अगदी यू. आर. अनंतमूर्ती आणि गिरीश कर्नाडही या हल्ल्यांमधून सुटू शकले नाहीत.

  सध्या सर्वांच्या नजरा मध्य भारतात होणाऱ्या निवडणुकांकडे लागलेल्या आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकांची उपांत्य फेरी म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात आहे. या निवडणुका भाजपला अवघड जाण्याची चिन्हे दिसत आहेत. पण ते तर सोडाच, अगदी २०१९मध्ये जरी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा पराभव झाला तरी फहमीदानं चित्रित केलेल्या भारतातून बाहेर पडणं ही सोपी गोष्ट राहिलेली नाही. कारण जातजमातवादाचं जेवढं विष संघ परिवार गेल्या सत्तर वर्षात पसरवण्यात यशस्वी झाला होता, त्याच्या दसपटीनं अधिक विष गेल्या चार-साडेचार वर्षांत देशाच्या नसानसांतून पसरवलं गेलं आहे. यासाठी त्यांनी जुन्या नि नव्या तंत्रांचा मेळ घालून हे यश प्राप्त केलं आहे. राजस्थानमध्ये प्रचार करताना न्यायालयांना कस्पटासमान मानणारे भाजपचे अध्यक्ष एक उदाहरण देते झाले : ते म्हणाले, उत्तर प्रदेश मे एक साल पहले जो चुनाव हुआ, चुनाव के अंदर बीजेपी के सोशल मीडिया वर्कर्स ने दो बडे व्हॉट्सअॅप ग्रुप बनाये. एक १५ लाख का और एक १७ लाख का. कुल ३२ लाख लोग... हमारे यहा एक लडका था. उसने कूछ चालाकी कर दी.... उसने ग्रुप पे मेसेज डाला, 'अखिलेश ने मुलायमजी को चाटा मारा.' अब (असल मे) मारा नही (था)! मुलायमजी और अखिलेश (उस वक्त एक दुसरे से) ६०० किमी दूर थे. मगर उसने डाल दिया. और सोशल मीडिया प्रदेश टीम ने उसको नीचे भी डाल दिया. सारी जगह फैल गया....ऐसा करना नही चाहिये. मगर उसने एक प्रकार का माहोल फैला दिया. काम तो है करने जैसा, मगर करना मत. (लोक हसू लागले) समझ मे आता है?... हम जो चाहे वह संदेश जनता तक पहुचा सकते है, चाहे खट्टा हो या मीठा हो, सच्चा हो या झूटा हो. गेल्या चार वर्षांत अफवा, फेक न्यूज आणि खोटा इतिहास हा सोशल मीडियातून शाळा-महाविद्यालयांतील पाठ्यपुस्तकांमध्ये जाऊन बसलेला आहे. पाठ्यपुस्तकं ज्ञानाचे स्रोत राहिलेले नसून राजकीय प्रचाराच्या उद्देशाने लिहिली जात आहेत. राजस्थानमधील सातवीच्या पुस्तकात अभ्यास म्हणून मोदी सरकारने गेल्या चार वर्षात दिलेल्या वृत्तपत्रीय जाहिरातींचा तक्ता तयार करण्यास सांगितलेला असून त्या जाहिरातीतून मांडलेल्या योजनांची माहिती विद्यार्थ्यांना देण्याचं काम शिक्षकांवर सोपवण्यात आलं आहे.

  दहावीच्या पुस्तकात लोकशाहीबद्दल म्हटलं आहे- लोकशाहीचे अनेक तोटे आहेत. लोकशाही व्यक्तीला स्वार्थी, लबाड आणि भ्रमिष्ट बनवते. लोकशाहीतून आर्थिक प्रगती साधता येत नाही आणि पेचप्रसंगाच्या वेळी लोकशाही शबल असते. अशा वेळी फहमीदा, मैत्रिणी, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू? माझ्या कवितेतले हे भाषेचे तुकडेच तुला अर्पण करते : केवढा मोठा अवास्तव आवाज / उन्मादाने चाल करून येणारा / या संत्रस्त शहरावर...जणू मी एकटीच बचावली आहे / नापाम गर्ल*सारखी / या भुईसपाट शहरात / अधाशासारखी मोडून खातेय / संवेदनानी थरथरणारे / भाषेचे तुकडे / रात्रीच्या भयाण काळोखात...

  (नापाम गर्ल : अमेरिकेने १९७२ मध्ये व्हिएतनामवर केलेल्या भीषण नापाम बॉम्बहल्ल्यात सैरभैर धावलेली एक विवस्त्र पोर. तिची ती पराकोटीची वेदना निक ऊत नावाच्या छायाचित्रकाराने टिपली. हे छायाचित्र अमेरिकेच्या राक्षसी प्रवृत्तीचं प्रतीक होऊन जगभर गाजलं. पुढे या छायाचित्राचा अरुण कोलटकरांच्या "भिजकी वही' या कवितासंग्रहाच्या कण्यावरही (स्पाइन) वापर करण्यात आला.)

Trending