आरोग्य / तुम्हाला माहीत आहे, हायपोथायरॉडिझममध्ये का वाढते वजन?

या आजारामध्ये थायरॉइड ग्रंथी कमी काम करते किंवा काम करणे बंद करते

दिव्य मराठी

Feb 09,2020 12:15:00 AM IST

हायपोथायराॅडिझममध्ये वजन का वाढते, हे फार कमी लोकांना माहीत असेल. आहार आणि व्यायामाद्वारे यावर नियंत्रण मिळवणे खूप सोपे ठरू शकते.

  • काय आहे हायपोथायरॉडिझम

या आजारामध्ये थायरॉइड ग्रंथी कमी काम करते किंवा काम करणे बंद करते. याचा परिणाम शरीराच्या सर्वच अवयवांवर होतो. हा आजार महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात दिसून येतो, परंतु लहान मुले व पुरुषांनाही तो होऊ शकतो. याच्या प्रमुख लक्षणांमध्ये शरीरावर सूज येणे, आळस येणे, त्वचा कोरडी पडणे, केस गळणे, महिलांमध्ये अनियमित मासिक पाळीमुळे या काळात जास्त रक्तस्राव होणे, जास्त झोप येणे व घोरणे, वजन वाढणे आणि डोळे सुजणे इत्यादींचा समावेश आहे.

  • का वाढते वजन

साधारणत: महिला आपल्या वाढत्या वजनासाठी थारॉइडला जबाबदार मानतात. हायपोथायरॉडिझममध्ये थोडे वजन वाढते, हे खरे आहे; पण ते प्रामुख्याने शरीरामध्ये सूज आणि पाण्याच्या अधिक प्रमाणामुळे होते. थारॉइडची गोळी सुरू केल्यानंतर सूज कमी व्हायला लागते आणि तुमचा रिपोर्ट नाॅर्मल येतो. यानंतर तुमच्या वजनासाठी तुम्ही थायरॉइडला जबाबदार धरू शकत नाही. वजनासाठी तुम्हाला आहार आणि व्यायामाकडे लक्ष द्यावे लागेल.

  • औषध बंद करू नका

जर तुमचा थायरॉइड पूर्णपणे निष्क्रिय झाला असेल तर आयुष्यभर गोळी घ्यावी लागते. नाॅर्मल रिपोर्ट म्हणजे तुम्ही थायरॉइड हॉर्मोनची गोळी योग्य प्रमाणात घेत आहात. तथापि, थायरॉइडची ग्रंथी पुन्हा काम करायला लागेल, असा याचा अर्थ होत नाही. थायरॉइड हार्मोन ग्रंथीद्वारे आले की गोळीद्वारे, याची ओळख तुमचे शरीर किंवा चाचणी करू शकत नाही. अनेकदा रुग्ण रिपोर्ट नॉर्मल आल्यावर गोळी बंद करतात. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय गोळी बंद करू नये.


डॉ. सुशील जिंदल - डायबेटॉलॉजिस्ट आणि हार्मोन तज्ञ

X