Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Young man commits suicide to wife, daughter; The mystery of death continued

पत्नी, मुलीला विष देत तरुणाची आत्महत्या; मृत्यूचे गूढ कायम:चिठ्ठीच्या आधारे पोलिसांचा तपास सुरू

प्रतिनिधी | Update - Nov 11, 2018, 09:23 AM IST

सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचीच नोंद आहे.

 • Young man commits suicide to wife, daughter; The mystery of death continued

  बीड - पत्नी, मुलीला विष देत पतीनेही गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी बीड शहरातील संत नामदेवनगर भागात समोर आली. दरम्यान, शनिवारी दुसऱ्या दिवशीही या प्रकरणाचे गूढ कायम असून घटनेचे नेमके कारण समोर आलेले नाही. पंचनाम्यात मिळालेल्या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असला तरी अद्याप चिठ्ठीत उल्लेख असलेल्या व्यक्तीवरही गुन्हा नोंद करण्यात आलेला नाही. सध्या या प्रकरणात आकस्मिक मृत्यूचीच नोंद आहे.


  शहरातील संत नामदेवनगर भागात राहणारे योगेश सूर्यभान शिंदे (२६) हे खासगी वाहन चालक म्हणून काम करतात. दिवाळी पाडव्याच्या दिवशी मध्यरात्री त्यांनी पत्नी शीतल (२४) आणि मुलगी श्रावणी (३) यांना विष देत त्यांचा खून केला. त्यानंतर घराच्या अंगणात असलेल्या शेवग्याच्या झाडाला गळफास घेत त्यांनीही आत्महत्या केली. शुक्रवारी गणेश याचे वडील सूर्यभान शिंदे हे सकाळी झोपेतून उठून घराबाहेर आल्यानंतर त्यांना गणेशने गळफास घेतल्याचे लक्षात आले.


  त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर पत्नी कमल व मोठा मुलगा संदीपान हे धावत आले. त्यांनी गणेशच्या खोलीकडे धाव घेत पाहणी केली असता आतमध्ये शीतल आणि श्रावणीही मृतावस्थेत आढळून आले. दरम्यान, एेन दिवाळीच्या धामधुमीत झालेल्या या तिहेरी मृत्यूने शहरात खळबळ उडाली. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली.

  खिशात सापडली चिठ्ठी, त्रासामुळे आत्महत्या
  दरम्यान, गणेश याच्या आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना आढळून आली आहे. यामध्ये एका व्यक्तीकडून होत असलेल्या त्रासातून हे पाऊल आपण उचलल्याचे त्याने लिहिले आहे. सध्या या चिठ्ठीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. मात्र अद्याप चिठ्ठीत नाव असलेल्या व्यक्तीवर गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.

  पती-पत्नीच्या वादाची किनार?
  पोलिसांच्या चौकशीत गणेश व शीतल यांच्यातही नेहमी खटके उडत होते, अशी माहिती समोर आली आहे. पती, पत्नीमध्ये सातत्याने भांडणे होत होती, अशी माहिती मिळाल्याने यातून हा प्रकार झाला का या बाजूचाही पोलिस तपास करत आहेत.

  हस्ताक्षराची करणार तपासणी
  चिठ्ठी जप्त केली असून यातील हस्ताक्षर हे गणेशचेच आहे का हे त्याच्या जुन्या डायरी अथवा एखाद्या कागदपत्राच्या आधारे तपासणी करावे लागणार आहे. पत्नी व मुलीला विष दिले की अन्य काही याचाही उलगडा शवविच्छेदन अहवालातून होणार आहे. यासाठी व्हिसेरा रासायनिक तपासणीसाठी राखून ठेवण्यात आला आहे.
  - शिवलाल पुर्भे, पोलिस निरीक्षक, शिवाजीनगर ठाणे

Trending