आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरा-बायकाेचे भांडण साेडवण्यासाठी गेलेल्या तरुणाचा तीक्ष्ण हत्याराने खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव - नवरा-बायकाेचे किरकाेळ कारणावरून सुरू असलेले भांडण साेडवण्यासाठी गेलेल्या तरुणाच्या छातीच्या मध्यभागी तीक्ष्ण हत्याराने वार केले. या हल्ल्यानंतर तरुण घराकडे धावत येत असताना त्याचा संत ज्ञानेश्वर विद्यालयासमाेर काेसळून मृत्यू झाला. हा खूून केल्यानंतर मारेकरी पत्नी, मुलासह फरार झाला आहे. ही घटना गुरुवारी रात्री १० वाजता सप्तशृंगी काॅलनीमध्ये घडली. 

 

याेगेश ज्ञानदेव जंगले (वय ३७, रा. सप्तशृंगी काॅलनी, मूळ रा. साळवा-नांदेड, ता.धरणगाव) असे मृत चालकाचे नाव आहे. याेगेश हा एका खासगी कंपनीत चालक हाेता. रात्री ९.५० वाजेच्या सुमारास याेगेशचे जेवण संपले हाेते. या वेळी नेहमीप्रमाणे याेगेशच्या घरापासून काही अंतरावर असलेल्या घरात गणेश सखाराम भंडारे हा त्याची पत्नी भारतीला मारहाण करीत होता. तो नेहमी पत्नीला मारहाण करायचा. या भांडणाचा आवाज योगेशला आल्यानंतर ते भांडण सोडवण्यसाठी भंडारे याच्या घरी गेला. भांडण सोडवण्यसाठी आलेल्या योगेशला पाहून गणेशला खूप राग आला. त्यामुळे त्याने त्याला शिवीगाळ करीत तीक्ष्ण हत्याराने त्याच्या छातीच्या मध्यभागी वार केला. त्यानंतर योगेश धावत घराकडे पळत असताना तो घराजवळील संत ज्ञानेश्वर पूर्व माध्यमिक शाळेच्या समोर कोसळल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भंडारे याच्या घरापासून ते संत ज्ञानेश्वर विद्यालयापर्यंत रक्त सांडले होते. रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर शेजाऱ्यांनी त्याला रिक्षात टाकून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आणले. दरम्यान संत ज्ञानेश्वर विद्यालयासमोर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्याचे फुटेज पोलिस तपासणार आहेत. याप्रकरणी रात्री उशिरा योगेश आणि पत्नी दीपाली यांच्या फिर्यादीवरून भंडारे याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. 


गणेश भंडारे जळगाव जामाेदचा रहिवासी 
याेगेश जंगले याचा खून झाल्यानंतर गणेश पत्नी आणि मुलांसह फरार झाला आहे. ताे मूळचा बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामाेद येथील रहिवासी आहे. ताे जळगाव येथे सेंट्रिंगचे काम करताेे. सप्तशृंगी काॅलनीत त्याचे पार्टिशनचे घर आहे. तेथे ताे पत्नी व तीन मुलांसह राहताे. याच घरात याेगेशवर हत्याराने वार करण्यात आले. 

 

भांंडणाचा आवाज आला आणि आम्ही बाहेर आलाे 
घटनेबाबत माहिती मिळताच अप्पर पाेलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, सहायक पाेलिस अधीक्षक डाॅ.निलाभ राेहन व एमआयडीसी पाेलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेबाबत शेजाऱ्यांना विचारणा केली; परंतु या घटनेबाबत कुणीच माहिती द्यायला तयार नव्हते. भांंडणाचा आवाज आला आणि आम्ही बाहेर आलाे, असे शेजाऱ्यांनी पाेलिसांना सांगितले.