आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नागझरी गावात जुन्या वादातून तरुणाचा धारदार शस्त्राने खून

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई - जुन्या वादातून पारधी समाजातील एका २० वर्षीय तरुणावर काही जणांनी धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये तरुण जागीच ठार झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले आहेत. गेवराई तालुक्यातील नागझरी येथे शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, पाच महिन्यापूर्वी येथे याच पारधी समाजातील दोन गटांत तलवारबाजी होऊन यामध्ये एकाचा मृत्यू झाला हाेता. आता या घटनेने तालुक्यात पुन्हा मोठी खळबळ उडाली आहे. संजय काकासाहेब चव्हाण (२०) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. खूनच्या बदल्यात खून झाल्याचा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे. नागझरी हे धुळे-सोलापूर महामार्गावरील गाव असून येथे पारधी समाजाची वस्ती आहे. शनिवारी दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास संजय चव्हाण हा आपल्या घरासमोरील रस्त्यावर थांबला हाेता. परिसरातीलच काही जणांनी जुन्या भांडणातून धारदार शस्त्राने हल्ला चढवला. संजयच्या छातीत धारदार शस्त्राचे खोलवर वार झाल्याने तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनेची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी घटनास्थळी येऊन रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या संजयला येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.  डॉक्टरांनी संजयवर प्राथमिक उपचार करून जिल्हा रुग्णालयात रेफर केले. मात्र जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी संजयला तपासून मृत घोषित केले. 

नातेवाइकांच्या आक्रोशाने रुग्णालय सुन्न 
संजय चव्हाण याला मृत घोषित केल्यानंतर जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. या घटनेने विश्वास बसत नसल्याने त्यांनी संजयचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला. रुग्णालयाच्या दारात मृतदेहासमोर आक्रोश करणाऱ्या महिला-पुरुषांना पाहून उपस्थितांचेही डोळे पाणावले.

५ महिन्यांतील दुसरी घटना
पाच महिन्यांपूर्वी ४ एप्रिल २०१९ रोजी येथे याच वस्तीवरील पारधी समाजातील दोन गट जुन्या वादातून आमनेसामने भिडले होते. या वेळी झालेल्या तलवारबाजीत उत्तरेश्वर भारत पवार (२०) हा तरुण जागीच ठार झाला होता तर त्याचा मोठा भाऊ नारायण भारत पवार (२६) हा गंभीर जखमी झाला होता.