Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Young mechanic dead in sand truck accident

तरुण मेकॅनिकचा वाळूच्या हायवाखाली येऊन मृत्यू; सातच दिवसांत दुसरा बळी

प्रतिनिधी | Update - Sep 01, 2018, 09:31 AM IST

शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता देवळाई चौकाजवळ हा अपघात झाला.

 • Young mechanic dead in sand truck accident
  बीड बायपासवर शुक्रवारी याच हायवा ट्रकच्या मागच्या चाकाखाली येऊन अजीमचा मृत्यू झाला. इन्सेटमध्ये अजीमचे छायाचित्र.

  औरंगाबाद- बदनापूरकडे कंटेनरच्या दुरुस्तीचे काम करण्यासाठी निघालेल्या २९ वर्षीय अब्दुल अजीम अब्दुल रज्जाक (रा. बाबर काॅलनी, कटकट गेट) याचा हायवाच्या मागील चाकाखाली येऊन मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी सव्वाअकरा वाजता देवळाई चौकाजवळ हा अपघात झाला. २३ ऑगस्ट रोजी बीड बायपासवर हायवाच्याच धडकेत ४५ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. दरम्यान, हायवाचालकाला अटक केली असून गुन्हा दाखल केला.


  अजीम फिटर मेकॅनिकचे काम करायचा. मागील अनेक वर्षांपासून बीड बायपासवरील जड वाहनांच्या दुरुस्तीसाठी त्याला मोठी मागणी होती. गोदावरी टी पॉइंट चौकात मैदानावर त्याचे छोटेसे दुकान होते. शुक्रवारी सकाळी अकरा वाजता तो कामावर गेला. ट्रक थांबत असलेल्या पेट्रोल पंपावर जाऊन तेथील मित्रांना भेटला. बदनापूरच्या दिशेने एका गाडीच्या दुरुस्तीचे काम आल्याचे सांगून तो दुचाकीवर (एमएच २० सीई १३१३) निघाला. त्या वेळी बदनापूरच्या दिशेने जात असताना छत्रपतीनगरच्या प्रवेशद्वारासमोर हायवा ट्रकने (एमएच ४४ - ६०९) त्याला मागून धडक दिली. तोल जाऊन अजीम हायवाच्या मागच्या चाकाखाली येऊन चिरडला गेला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने अजीमचा जागीच मृत्यू झाला. अपघात होताच देवळाई चौकातील वाहतूक पोलिसांनी धाव घेत चालकाला पकडले. वाहतूक पोलिस निरीक्षक भरत काकडे हे घटनास्थळी पोहोचले. अजीम याचा मृतदेह घाटी रुग्णालयात पाठवून वाहतूक सुरळीत करण्यात आली. पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद, उपायुक्त डॉ. दीपाली धाटे-घाडगे, सहायक आयुक्त हनुमंत भापकर यांनी रस्त्याची पाहणी करून सातारा पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रेमसागर चंद्रमोरे व निरीक्षक भारत काकडे यांना आवश्यक त्या सूचना केल्या.


  आयुक्त, आमदार, मनपा अधिकाऱ्यांकडे रोष
  पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे सातारा-देवळाई संघर्ष समितीने दोनदा भेटून बीड बायपाससंदर्भात पाठपुरावा केला होता. उद्या साडेबारा वाजता बीड बायपासची पाहणी करण्यासाठी येतो, असे आश्वासन त्यांनी गुरुवारी दिले होते. सकाळी अकरा वाजता पुन्हा एक मृत्यू झाल्याचे समजताच प्रसाद साडेबाराच्या आधीच अधिकाऱ्यांसोबत पोहोचले. आमदार संजय शिरसाट हेही पोहोचले. या वेळी प्रसाद यांनी नागरिकांकडून बीड बायपासविषयी जाणून घेतले. शिरसाट यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. या वेळी संघर्ष समितीचे बद्रीनाथ थोरात, सोमीनाथ शिराणे, पद्मसिंग राजपूत, आबासाहेब देशमुख, हरिभाऊ हिवाळे, दिनेश राजेभोसले, रमेश बाहुले यांची उपस्थिती होती.

  प्रत्यक्षदर्शी म्हणतात...
  हायवाने धडक दिल्याने मागच्या चाकाखाली आला, चालक म्हणतो, इंडिका कारने दुचाकीस्वाराला ओव्हरटेक केले अन् तो हायवाखाली आला


  चालक म्हणतो इंडिका कारने ओव्हरटेक केले
  सातारा पोलिसांनी हायवा ट्रकचालकाचा जबाब घेतला. त्याने दिलेल्या जबाबानुसार, एका इंडिका कारच्या चालकाने अजीमच्या दुचाकीला अचानक येऊन ओव्हरटेक केले. त्यामुळे त्याची दुचाकी ट्रकच्या दिशेने सरकली. हायवाची उंची जास्त असल्याने मला ते दिसले नाही आणि त्याला धक्का लागून तो मागच्या चाकाखाली आला. या प्रकरणात शुक्रवारी रात्रीपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नव्हता. अजीमच्या अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.


  पोलिस करणार आजपासून कारवाईला सुरुवात, नियम मोडल्यास फौजदारी गुन्हे दाखल होणार
  - परवानगी न घेता अनेक हॉटेलचालकांनी तोडलेले दुभाजक लगेच बंद करणार.
  - रस्त्याच्या बाजूला असलेले अतिक्रमणे काढणार.
  - अमरप्रीत चौकातील सिग्नल पद्धतीप्रमाणे देवळाई व गोदावरी टी पॉइंट चौकातील सिग्नलचे सिंक्रोनायझेशन बदलणार, जेणेकरून ट्रकचालकांना जाण्यास अधिक वेळ मिळेल.
  - ट्रकचालक डाव्या बाजूनेच चालतील याची खबरदारी घेतली जाईल. त्यामुळे दुचाकीस्वारांना उजव्या बाजूने जाता येईल.
  - बीड बायपास वरील हॉटेल, रुग्णालये, मंगल कार्यालये, दुकाने यांच्यासमोर वाहतुकीस अडथळा येणार नाही अशी वाहने उभ्या करण्याच्या सूचना करण्यात येणार आहेत. नियम मोडल्यास प्रतिबंधात्मक कारवाई, प्रसंगी फौजदारी गुन्हेही दाखल होतील.
  - शिवाय शालेय वाहतूक करणारा चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचे आढळले. त्यामुळे सातारा पोलिस या भागात शालेय वाहतूक करणाऱ्या चालकांची कार्यशाळा घेणार असल्याची माहिती निरीक्षक चंद्रमोरे यांनी दिली.

  चार दिवसांपूर्वी मुलगा झाला
  अजीमच्या वडिलांचे ६ महिन्यांपूर्वीच निधन झाले. त्याच्या पश्चात आई, पत्नी, एक मुलगा व तीन मुली असा परिवार आहे. ४ दिवसांपूर्वी त्याला मुलगा झाला होता, असे मित्रांनी सांगितले.


  रोज बारानंतर यायचा, शुक्रवारीच लवकर आला अन्...
  अजीम रात्री उशिरापर्यंत काम करून तो रोजच दुपारी बारानंतर कामावर जायचा. शुक्रवारीच तो सकाळी कामावर आला आणि अपघात झाला. मनमिळाऊ अजीम सगळ्यांच्याच जवळचा होता. अपघातापूर्वी अजीम बायपासवरील पेट्रोल पंपावर गेला होता. लोकांशी बोलला. सलीम नामक मित्रासोबत दहा मिनिटे गंमत करून सगळ्यांना हसवले. दिशेने काम आहे, असे म्हणून तो निघाला आणि काही क्षणात मृत्यू झाल्याची बातमी आली. हे सांगताना पंपावरील त्याच्या मित्राचा कंठ दाटून आला होता.


  सीसीटीव्ही बंद
  देवळाई चौकातील वाहतुकीचे नियंत्रण करण्यासाठी काही दिवसांपूर्वीच लाऊडस्पीकर बसवण्यात आले आहे. मात्र चौकात वाहतूक बेट नसल्यामुळे नियमनास अडथळा निर्माण होतो. या चौकातील सीसीटीव्ही बंद असल्याची माहिती नागरिकांनी दिली.

  कारवाईचे नाटक, ९ अतिक्रमणे काढली
  आयुक्त प्रसाद, आमदार शिरसाट यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. अधिकाऱ्यांनी दुपारी कारवाई हाती घेतली. नागरिकांनी समाधान व्यक्त केले. परंतु काही तासांत मनपाने अस्थायी ९ अतिक्रमणे काढली. ज्यात पत्र्याचे शेड, हॉटेल काढले. शुक्रवारीच ही कारवाई करण्यात आली. शनिवारी मात्र अशी कुठलीही कारवाई करणार नसल्याची माहिती समोर आली.

Trending