आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकडा टाकून वीज घेणे जिवावर बेतले; तरुणाला वाचवताना महिलेचाही मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव  - वीज तारांवर आकडा टाकून वीज घेणे युवक व महिलेच्या जिवावर बेतले. पावसामुळे आकडा टाकण्याचा बांबू ओला झाल्याने त्यात वीजप्रवाह उतरून युवकाला विजेचा धक्का बसला, तर त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या महिलेलाही विजेचा धक्का बसून मृत्यू झाला. माजलगाव तालुक्यातील मोगरा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 


माजलगाव तालुक्यातील मोगरा गावाजवळ असलेल्या ताडाेबा तांड्यावर मीरा शंकर जाधव (३२) या राहतात. शेजारीच त्यांचा भाचा दत्ता रेखा राठोड (२३) हा राहताे. शनिवारी रात्री माजलगाव तालुक्यात पाऊस झाला होता. तालुक्यात  अनेक जण थेट वीज तारांवर आकडा टाकून वीज वापरतात. ताडोबा तांड्यावरही हा प्रकार होतो. मीरा जाधव यांनी रविवारी सकाळी भाचा दत्ता राठोड याला आपल्या घरचा वीज पुरवठा बंद असल्याने  वीज तारेवर आकडा टाकण्यास सांगितले. दत्ता यानेही बांबू घेऊन वीज तारेवर आकडा टाकला. मात्र, बांबू पावसात आेला झाल्याने वीज तारेला त्याचा स्पर्श हाेताच वीजप्रवाह उतरुन दत्ताला विजेचा जोरदार धक्का बसला. दत्ता याला विजेचा धक्का बसल्याचे पाहताच मीरा यांनीही त्याच्याकडे धाव घेत त्याच्या हातातून बांबू काढण्याचा प्रयत्न केला. यामध्ये मीरा यांनाही विजेचा धक्का बसला. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला. दत्ता हा अविवाहित आहे तर मीरा यांना दोन मुले आहेत. माजलगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले तर दिंद्रूड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नाेंद करण्यात आली आहे. 
 

 

सुन्न तांडा, नातेवाइकांचा आक्रोश
मोजकीच घरे असलेल्या या तांड्यावर एकाच वेळी नातेवाइक असलेल्या दोघांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत असून या घटनेने तांडा सुन्न झाला होता. दोघांवर तांडा परिसरातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी नातेवाइकांनी एकच आक्रोश केला होता.

 

तांड्यावर कुणाकडेच मीटर नाही
या तांड्यावर केवळ १० ते १२ घरे असून ज्यांच्याकडे वीज हाेती त्यांचे विद्युत मीटर बिलांच्या थकबाकीमुळे मागील ६ ते ७ वर्षा पूर्वीच महावितरणने काढून नेले आहेत. सध्या काेणाकडेच विद्युत मीटर अथवा वीज नाही. येथील नागरिक हे शेतीसाठी देण्यात येणाऱ्या वीज वाहिनीवरूनच आकडे टाकून वीज वापरात असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शिवाय माजलगाव तालुक्यात वीज गळतीचे प्रमाणही ५०% आहे. हे गळतीचे प्रमाण वीज चाेरीमुळेच वाढलेले आहे. त्यामुळे अशा प्रकारे अपघात हाेत आहेत.