Home | Maharashtra | Mumbai | Youth Congress President Satyajeet Tambe Blame on Solapur Police For PM Modi Visit

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण करणार्‍या पोलिसांना निलंबित करा- सत्यजीत तांबे

प्रतिनिधी | Update - Jan 14, 2019, 06:57 PM IST

युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, ती मानवाधिकाराची पायमल्ली आहे.

  • Youth Congress President Satyajeet Tambe Blame on Solapur Police For PM Modi Visit

    मुंबई- भारतीय राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मत व्यक्त करण्याची, भूमिका मांडण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. असे असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सोलापूर दौऱ्यावेळी विरोधी घोषणा देणाऱ्या युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली, ती मानवाधिकाराची पायमल्ली आहे, शिवाय महाराष्ट्राच्या परंपरेला काळिमा फासणारी ही घटना आहे, या प्रकरणातील पोलिसांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, तसेच यामागे असलेल्या प्रमुख सुत्रधारांचा शोध घेतला जावा, अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली.

    सोलापूर येथे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर ज्या पद्धतीने पोलिसांनी मारहाण करून चुकीचे गुन्हे दाखल केले, त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने राज्यभर जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी यासंदर्भात राज्य मानवाधिकार आयोगाच्या कार्यालयात निवेदन दिले.

    तांबे म्हणाले, स्वातंत्र्य हा लोकशाहीचा आत्मा आहे. सुदृढ लोकशाहीसाठी विरोधाचाही सन्मान करता आला पाहिजे. निषेध, आंदोलन आणि मोर्चा हा माणसाचा मूलभूत अधिकार आहे, त्याचे हनन करण्याचा प्रयत्न सोलापूर मधील प्रकरणात झाला आहे. पोलीस ज्या निर्दयीपणे युवक काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत वागले, ते बघितल्यावर आम्ही व्यथित झालो, ज्या पोलिसांनी हे केले, त्यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी, मात्र यातून भविष्यात मानवी हक्कांचे हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना जरब बसावी आशा प्रकारे ही कारवाई व्हावी आणि त्या सोबतच युवक काँग्रेस कार्यकर्त्यांवर दाखल केलेले चुकीचे गुन्हे मागे घेतले जावे, असेही तांबे यांनी निवेदनात म्हटले आहे.

    तांबे पुढे म्हणाले नरेंद्र मोदी आणि भाजपला हुकूमशाही माध्यमातून सत्ता उपभोगायची आहे, आपल्याला विरोध करणाऱ्यांना साम दाम दंड भेदाच्या साहाय्याने संपविणे हे त्यांचे धोरण आहे. कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली घटनात्मक अधिकार नाकारले जात आहे, सोलापूर येथे घडलेल्या प्रकारातून हेच सिद्ध होते. मानवाधिकार आयोगाने आणि महाराष्ट्र पोलिसांनीही या प्रकरणात कोणत्याही दबावाला बळी न पडता न्याय करावा, आणि घटनात्मक अधिकारांचे रक्षण कारवर, असेही तांबे म्हणाले.

Trending