आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण: युवक काँग्रेसचे सभासद घटले; घराणेशाहीचा परिणाम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- सामान्य युवा कार्यकर्त्याला नेता बनवण्याची काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची योजना प्रत्यक्षात मात्र कागदावरच राहिली आहे. कारण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा युवक काँग्रेसच्या सभासद नोंदणीत तब्बल दहा लाखांची म्हणजे निम्म्याहून अधिक घट झाली आहे. त्यामुळेच खुद्द राहुल यांनी लोकशाहीचा अट्टहास धरूनही युवक काँग्रेसवर ‘घराणेशाही’चाच प्रभाव राहिल्यामुळे सर्वसामान्य कार्यकर्ता दुरावत चालल्याचे स्पष्ट होत आहे.
युवक काँग्रेसच्या माध्यमातून गेल्या वर्षी तब्बल 19 लाख नव्या सदस्यांची नोंदणी करण्यात आली होती. पण सभासद नोंदणीबाबतचा गेल्या वर्षीचा उत्साह या वर्षी मात्र मावळल्याचे दिसून आले आहे. कारण यंदा युवक काँग्रेसने फक्त 9 लाख नवे सदस्य नोंदवले आहेत. काँग्रेसच्या राज्यातील हेवीवेट पुढार्‍यांच्या मुलांचेच वर्चस्व असल्याने महत्त्वाची पदे सामान्य कार्यकर्त्यांच्या आवाक्याबाहेरच राहिली. त्यामुळेच सामान्य कार्यकर्त्यांनी युवक काँग्रेसकडे पाठ फिरवल्याचे बोलले जात आहे.
तरुणांमधील नवीन नेतृत्व शोधण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त जे. एम. लिंगडोह यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या सल्ल्यानुसार राहुल यांच्या पुढाकाराने ‘नेता बनो, नेता चुनो’ ही योजना राबवली होती. तरुणांना राजकारणाच्या प्रवाहात आणून त्यांच्यातील नेतृत्वगुण फुलवत नेता बनवण्याला प्राधान्य देणे हा या योजनेचा उद्देश होता. त्यासाठी युवक काँग्रेसच्या केंद्रीय आणि राज्यस्तरीय कार्यकारिणीतील पदाधिकारी लोकशाही पद्धतीने निवडले जावेत, जेणेकरून त्या माध्यमातून सर्वसामान्य कार्यकर्त्याला एक व्यासपीठ मिळेल, अशी योजना होती. निवडणुकीच्या माध्यमातूनच पदाधिकार्‍यांची निवड करण्यात आली. मात्र, युवक काँग्रेस राज्य कार्यकारिणीच्या महत्त्वाच्या पदावर नेत्यांची मुले आणि नातेवाइकांचीच वर्णी लागली. सामान्य कार्यकर्ता या प्रक्रियेत कुठेच नव्हता. तो रस्त्यावरच राहिला आणि पदाधिकारी मात्र हायप्रोफाइल राहिले. त्याचाच प्रभाव नोंदणीत दिसून आल्याची चर्चा आहे.