Home | Maharashtra | Marathwada | Aurangabad | Youth Died in Ajanta For Electric Shock

मुलीच्या पहिल्याच वाढदिवशी आला होता घरी.. विद्युत वाहिनी अंगावर पडून तरुणाचा जागेवर मृत्यू

प्रतिन‍िधी | Update - Feb 15, 2019, 07:45 PM IST

मुलगी खुशी हिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद हा घरी आला होता

 • Youth Died in Ajanta For Electric Shock

  सात तास मृतदेह रुग्णालयात, नातेवाईकांचा संताप
  वायरमनवर गुन्हा दाखल करा, मृतदेह ताब्यात घेण्यास नकार

  अजिंठा- मुलीचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी गावाकडे आलेल्या एका तरुणाचा विद्युत वाहिनी अंगावर पडून मृत्यू झाला. मादणी (ता.सिल्लोड) येथे शुक्रवारी (ता.15) सकाळी 11 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. मिलिंद मुकुंदा सुरडकर (वय-32) असे मृत तरूणाचे नाव आहे. मिलिंद हा औरंगाबाद येथील हॉटेल भोजमध्ये कार्यरत होता.

  मुलगी खुशी हिचा पहिला वाढदिवस साजरा करण्यासाठी मिलिंद हा घरी आला होता. त्याने मोठा उत्सवात मुलीचा वाढदिवस साजरा केला. मात्र, शुक्रवारी त्याच्या घरावर माकडांनी अक्षरश: हैदोस घातला. उड्या मारत होती. विद्युत पोलवरून घराच्या मीटरपर्यंत पोहोचणारी सर्व्हिस वायर तुटून मिलिंदच्या अंगावर पडली. विजेचा धक्का बसल्याने मिलिंदचा जागीच मृत्यू झाला. गावकर्‍यांनी काठीने वायर बाजुला केली. अजिंठा ग्रामीण रुग्णालयात त्याला तातडीने हलवण्यात आले. मात्र, तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. मिलिंद सुरडकरच्या पश्चात पत्नी, एक मुलगा एक मुलगी आहेत.

  या प्रकरणी अजिंठा पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली रवीकिरण भारती करीत आहेत.

  घटनेची माहिती मिळताच अजिंठा ग्रामीण रुग्णालयात सामाजिक कार्यकर्ते विकास हिवाळे, बीआरएसपीचे जिल्हाउपाद्यक्ष नाना जाधव, समाधान जाधव, राजेंद्र निकम, प्रमोद सुरडकर, हॉटेल भोजचे मालक अंकित अग्रवाल, रुषीकेश अग्रवाल, काकासाहेब वेताळ, बाराळ देवासी आदींनी भेट दिली.

  सात तास मृतदेह रुग्णालयात, नातेवाईकांचा संताप
  नातेवाईकांनी मिलिंदचे पार्थिव ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. वायरमनवर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मिलिंदचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा मिलिंदच्या नातेवाईकांनी घेतला आहे. तसेच त्याच्या पार्थिवाचे शवविच्छेदन करू नये, अशी मागणी केली आहे.

  विद्युत पोलमध्ये उतरला होता करंट, तक्रार देऊनही वायरमनचे दुर्लक्ष..
  मिलिंदच्या घराजवळील विद्युत खांबात कायम करंट असायचा, याबाबत गावातील वायरमनकडे वारंवार तक्रार देण्यात आली होती. मात्र, त्याने याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच मिलिंदचा मृत्यु झाल्याचा आरोप मिलिंदचा भाऊ आणि गावकर्‍यांनी केली आहे.

  वायरमनविरोधात गुन्हा दाखल करत नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्र गावकरी तसेच मिलिंदच्या नातेवाईकांनी घेतला होता. अखेर सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण आहेर यांच्या मध्यस्थीने नातेवाईकांनी माघार घेतली आहे.


  पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा.. संबंधित फोटो..

Trending