आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाणगाव-सिन्नर मार्गावरील देवीच्या खिंडीत ट्रॅक्टर उलटला, ट्रॅक्टरखाली दबून विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू, 4 जखमी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणगाव - ठाणगाव-सिन्नर मार्गावर ठाणगाव घाटातील देवीच्या खिंडीतील वळणावर ट्रॅक्टर उलटून त्याखाली दाबला गेल्याने एका विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी (दि. १८) दुपारी १ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातात किरण नामदेव बिन्नर (१९, रा. हिवरे) हा जागीच ठार झाला. तर अन्य ४ जण किरकोळ जखमी झाले. 


सिन्नर तालुक्यातील हिवरे येथील किरण बिन्नर, दीपक मेंगाळ, पीयूष बिन्नर, तेजस सहाणे, विकास सहाणे हे विशीतले ५ मित्र गुरुवारी ट्रॅक्टरला ट्रॉली जोडून बोरखिंड येथे वनविभागाच्या रोपवाटीकेत रोपे आणण्यासाठी निघाले होते. ट्रॅक्टर ठाणगाव-सिन्नर रस्त्याने ठाणगाव घाटातील देवीची खिंड ओलांडून खालचे वळण घेत असताना चालक तेजस याचे नियंत्रण सुटले. त्याने करकचून ब्रेक दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र ऐनवेळी ब्रेकही लागले नाही. ट्रॅक्टरला नियंत्रित करण्याच्या प्रयत्नात तो रस्त्याच्या एका बाजूला उलटला. याच दरम्यान किरण बिन्नर ट्रॅक्टरखाली अडकला गेला. तर अन्य चार जण दूर फेकले गेले. दरम्यान उलट्या ट्रॅक्टरखाली किरण दाबल्याने त्यास बाहेर काढणेही या तरुणांना शक्य झाले नाही. त्यातच त्याचा ट्रॅक्टरखाली दबल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान रस्त्याने जाणाऱ्या वाहन चालकांनी हा अपघात पाहिल्यानंतर त्यांनी मदत कार्य केले. बऱ्याच वेळाने ट्रॅक्टर दूर करुन किरणचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. अन्य ४ जखमींवर सिन्नर येथे खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. तर किरणचा मृतदेहाची सिन्नर नगरपालिकेच्या रुग्णालयात उत्तरीय तपासरणी करण्यात आली. 

 

कष्टाळू मित्र गमावला 
मृत किरण बिन्नर याचा आयटीआयला नंबर लागला होता. तर दीपक मेंगाळ, पीयूष बिन्नर, विकास सहाणे हे तिघे सिन्नरच्या फुले विद्यालयात बारावीत शिक्षण घेतात. तेजस सहाणे हाही नवजीवन डे स्कूलमध्ये बारावीत आहे. हे सर्व मित्र २०० रुपये रोजंदारीवर वनविभागाकडे काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ-नऊ दिवसांपासून बोरखिंड रोपवाटिकेतून दररोज एक ट्रॅक्टरची खेप ते मारत. आजही नेहमीप्रमाणे हिवरे येथून ट्रॅक्टर घेऊन निघाल्यानंतर अवघ्या १० मिनिटांतच हा अपघात झाला. त्यात त्यांनी किरणसारखा कष्टाळू मित्र गमावला.