आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाममार्गाला लागलेल्या शेकडो मुलामुलींची सुटका; वेतन, पॉकेटमनीच्या पैशातून युवामंडळी करतात देखभाल

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- आजची पिढी सोशल मीडिया, त्यांचे छंद आणि आरामदायी आयुष्याला अधिक महत्त्व देते, अशी नेहमी चर्चा असते. मात्र, सामाजिक दायित्वापोटी पुढाकार घेणारी युवामंडळीही सध्या काम करत आहेत. याचा प्रत्यय नागपुरात ‘ट्विंकल’ फाउंडेशनच्या माध्यमातून दिसून येतो. विविध ठिकाणी नोकरी करत असलेल्या युवा मंडळींनी सुमारे शेकडो मुलामुलींची भीक मागण्याच्या आणि देहविक्रयाच्या कामातून केवळ सुटका करत त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठीही पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे ३० सदस्य या मुलांना शिकवतात, त्यांचे समुपदेशन करतात आणि त्यांना नवी दिशा देतात. विशेष म्हणजे १७ ते २३ वयोगटातील फाउंडेशनचे स्वयंसेवक त्यांच्या वेतनातून किंवा पॉकेटमनीच्या रकमेतून या सर्वांचा खर्च भागवत आहेत.  


या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या बरखा पटनायक यांनी सांगितले की, आजकाल तरुणाईला सोशल मीडियाच्या पलीकडे जग नाही अशी तक्रार सर्रास होत असते. आम्हाला नेमका हाच आरोप खोडून काढायचा होता. एकाच ध्येयाने आणि सामाजिक प्रेरणेने झपाटलेली आमची युवा मंडळी एकत्र आली आणि ११ डिसेंबर २०१६ रोजी आम्ही ही संस्था सुरू केली. या संस्थेत काम करणारी युवा मंडळी केवळ १७ ते २३ या वयोगटातील आहेत. बरेचदा परिस्थितीमुळे अनेक मुलेमुली संकटात सापडतात आणि मग ते वाममार्गालाही लागतात. भीक मागणे, गुंडगिरी किंवा देहविक्रयसारख्या कृत्यांमध्ये ते सहभागी होतात. त्यांना मुख्य प्रवाहात आणणे हा आमचा उद्देश आहे. ट्विंकल फाउंडेशनच्या माध्यमातून एकत्र आलेल्या तरुण मुलामुलींनी संकटात आणि शोषण चक्रात अडकलेल्या सुमारे ११२ मुलामुलींची सुटका केली आहे. यात बहुतांश मुली आहेत. औरंगाबाद आणि दिल्लीत फाउंडेशनच्या शाखा सुरू झाल्या असून लवकरच संपूर्ण देशभरात २५ शाखा सुरू करण्यात येणार आहे.  

 

युवक करतात विधायक कार्य
वाममार्गास लागलेल्या मुलामुलींचे समुपदेशन करणे, त्यांना शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा मिळवून देणे, त्यांच्या आवडीनिवडीनुरूप कौशल्याचे प्रशिक्षण देणे, शिक्षणासाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देणे, अशी अनेक कामे ही युवा मंडळी स्वखर्चातून करतात.


स्वयंसेवक कोण आहेत?  
नागपूर शहरातील ३० युवक-युवती संस्थेचे स्वयंसेवक आहेत. ते शिक्षण, नोकरी किंवा उद्योग सांभाळून सध्या या कामात सक्रिय आहेत. नागपूर पोलिसांचे या कार्याला पाठबळ आहे. कुणी वाममार्गाला लागलेला आढळून आल्यास ही मंडळी त्याची त्या कामातून सुटका करते व सुधारगृहात पाठवते. 

बातम्या आणखी आहेत...