आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात सहा घटना : पोळ्याला बैल धुताना पाण्यात बुडून सात जणांचा मृत्यू

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- मराठवाड्यात पोळा सण हर्षोल्हासात साजरा केला जात असतानाच औरंगाबाद जिल्ह्यात ऐन पोळ्याच्या दिवशी सहा जणांचा तर हिंगोली जिल्ह्यात एकाचा बैलांना अंघोळ घालताना बुडून मृत्यू झाला. यात दोघा सख्ख्या भावांचाही समवेश आहे. 


वैजापूर तालुक्यातील वीरगाव शिवारात रविवारी दुपारी ऋषिकेश रमेश रायते (१८) व अमोल रमेश रायते (१६ वर्षे, रा.वीरगाव) हे सख्खे भाऊ बैलांना अंघोळ घालण्यासाठी वीरगाव परिसरातील कापूसवाडगाव रोडवरील गायरान परिसरातील गाव तलावावर घेऊन गेले होते. दुपारी ३ वाजेच्या सुमारास दोघे बैलांना अंघोळ घालत असताना अमोल पाण्यात पडून बुडू लागला. ऋषिकेश त्याच्या मदतीला धावला. पण दोघांनाही पोहता येत नसल्याने दोघेही गाळात फसले. दोघे भाऊ पाण्यात बुडाल्याचे बाजूलाच बैल धूत असलेल्या तुषार रायतेच्या लक्षात येताच त्याने गावात फोन करून ही माहिती कळवली. काही ग्रामस्थांनी पाण्यात उड्या मारून त्या दोघांचा शोध घेतला. मात्र ते सापडले नाही. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक हरीश बोराडे, एम.पी.जरारे, सोमनाथ तांगडे, काकासाहेब पंडोरे, सरोदे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. हवालदार पंडोरे यांनी तीन डुबक्या मारल्यावर त्या दोघांना बाहेर काढण्यात यश आले. त्यांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून दोघेही मृत झाल्याचे सांगितले. 

 

बैलाने धक्का मारल्याने पाण्यात पडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू 
लासूर स्टेशन : देर्हळ येथील १८ वर्षीय तरुणाचा बैल धुताना पाण्यात बुडून मृत्यू झाला. संकेत नंदकिशोर निमोणे ( रा. देर्हळ ता.गंगापूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो देवगाव रंगारी येथील श्री गणेश विद्यालयातील दहावीच्या वर्गात शिकत होते. 

 
अंबाडी धरणात तरुण बुडाला 
कन्नड : तालुक्यातील अंधानेर येथील रहिवासी कैलास भाऊराव बाविस्कर (२४) हा अंबाडी धरणात बैल धुण्यासाठी गेला असता पाण्यात बुडून मृत्यू झाला. रविवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास बैल धुण्यासाठी कैलास बाविस्कर आपल्या चुलत भावाबरोबर गेला होता. खोल पाण्याचा अंदाज न आल्याने ताे बुडाला. त्याच्यासोबत असलेल्या गणेश बाविस्कर याने त्याला वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. परंतु यश आले नाही. त्याने आरडाओरड केली. या घटनेची माहिती कळताच अंधानेर व तेलवाडी येथील ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पाण्यात शोध घेऊन कैलासचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. 

 

वडिलांसोबत गेलेला मुलगा तलावात बुडाला 
देवगाव रंगारी : चांभारवाडी (ता.कन्नड) येथील ज्ञानेश्वर गवळी हे जनावरे धुण्यासाठी तलाव परिसरात रविवारी सकाळी गेले होते. त्यांच्यासोबत नवनाथ (१४) हा मुलगाही होता. काही जनावरे धुणे झाले तेव्हा ज्ञानेश्वर हे बाजूलाच बैल बांधण्यासाठी गेले. त्याच वेळेस नवनाथच्या हातात असलेल्या बैलाने त्याला झटका दिल्याने नवनाथ पाण्यात पडला. पाणी जास्त असल्याने तो त्यातच बुडाला. नवनाथ हा ज्ञानेश्वर गवळी यांचा एकुलता एक मुलगा होता. 


१७ वर्षीय युवक बुडाला 
हिंगोली : पोळा सणानिमित्त नदीवर बैल धुण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय मुलाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास वसमत तालुक्यातील माळवटा येथे घडली. विशाल ठोंबरे (१७) असे मृत तरुणाचे नाव अाहे. 


पाय घसरून मुलाचा अंत 
बाजारसावंगी : तलावावर बैल धूत असताना १४ वर्षीय रोहन म्हस्के याचा पाय घसरून तो तलावाच्या पाण्यात पडला. यातच त्याचा मृत्यू झाला. तलावामध्ये गाळ व झुडपे असल्याने कोणालाही जास्त वेळ पाण्यात राहणे शक्य नव्हते. पाहुणे आलेले प्रकाश गायकवाड यांनी त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढला. 

बातम्या आणखी आहेत...