आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेंट्रल नाक्यावर तरुणाचा खून; ठेकेदार म्हणतो- चोरांनी मारहाण केली, मात्र भावाने केला चौघांवर खुनाचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - कचऱ्याच्या ट्रकवर चालक म्हणून काम करणाऱ्या नितीन ऊर्फ बाळू भीमराव घुगे (२३, ह. मु. जाधववाडी, मूळ रा. पो. देवपूर, पिशोर, ता. कन्नड) याचा गुरुवारी रात्री सेंट्रल नाका परिसरात खून करण्यात आला. रात्री एक वाजेच्या सुमारास तो बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. चोरीच्या उद्देशाने चोरट्यांनी त्याला मारहाण केल्याचे त्याला घाटीत कारमध्ये सोडणाऱ्या त्याच्या ठेकेदाराने सांगितले. परंतु हा प्रकार चोरीचा नसून वैयक्तिक वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दरम्यान, सिडको पोलिस ठाण्यात रात्री उशिरा त्याचा भाऊ सचिनच्या तक्रारीवरून चार जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केल्याचे निरीक्षक निर्मला परदेशी यांनी सांगितले. 


मनपाच्या कचरा उचलण्याचे काम ठेकेदार मनोज डवरे यांच्याकडे आहे. त्याच्या ट्रकवर नितीन चालक होता. गुरुवारी रात्री ठेकेदार डवरे याने नितीनला कॉल करून कचरा घेऊन जायचा आहे, लवकर ये, असे सांगितले. त्यामुळे नितीन लगेच दुचाकी घेऊन निघाला. रात्री दोन वाजेपर्यंत नितीन घरी पोहोचला नव्हता. त्याला कॉल केला असता त्याचा मोबाइल बंद लागत होता, असे त्याचा भाऊ सचिनने सांगितले. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता ठेकेदार डवरेने सचिनला कॉल करून नितीनला रात्री काही चोरट्यांनी मारहाण केली असून यात त्याचा पहाटे पाच वाजता मृत्यू झाल्याचे सांगितले. त्याचे पाकीटसुद्धा आढळून आले नाही. सचिनने तत्काळ घाटी रुग्णालयात धाव घेतली. दरम्यान, निरीक्षक निर्मला परदेशी, सहायक निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांनी घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला. रात्री उशिरा मनोज डवरे अन्य तीन संशियांतविरुद्ध सचिनच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. 


ठेकेदाराच्या फ्लॅटची झाडाझडती
सिडको पोलिसांसह गुन्हे शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी घाटी रुग्णालयात धाव घेतली. मृतदेहाची पाहणी करून त्यांनी दिवसभर नितीनशी संबंधित अनेकांची चौकशी केली. यात त्यांना काल्डा कॉर्नर येथे ठेकेदाराने भाड्याने फ्लॅट घेतल्याचे कळले. गुन्हे शाखेने काल्डा कॉर्नर येथील या फ्लॅटची झाडाझडती घेतली. तेथून काही महत्त्वाचे धागेदोरे हाती लागल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, हा खूनच असून वैयक्तिक वादातून झाल्याचा दाट संशय आहे. संशयितांची चौकशी सुरू असून लवकरच प्रकरणाचा उलगडा होईल, असे सावंत यांनी सांगितले. 


मारहाणीमुळेच मृत्यू : ठेकेदार 
पोलिसांनी डवरेची कसून चौकशी केली. चौकशीत त्याने, नितीनला सेंट्रल नाका येथे चार ते पाच जणांनी अडवून पैशांची मागणी केली. नितीनने विरोध केल्याने बेदम मारहाण केली. आरडाओरड केल्याने चोर पळून गेले. नंतर नितीनने ठेकेदार व मित्रांना हा प्रकार सांगितला. घाबरलेल्या नितीनला मित्रांनी शहानूरमियाँ दर्गा येथून एक पेनकिलरची गोळी दिली व नंतर त्याला घाटीत माझ्या कारमध्ये नेऊन दाखल केले. उपचारादरम्यान पहाटे पाचच्या सुमारास मृत्यू झाला, असे डवरेचे म्हणणे आहे. 


मग चोरट्यांनी मोबाइल का चोरला नाही? : मृताचा भाऊ 
प्रथमदर्शनी चौकशीत समोर आलेल्या माहितीनुसार, नितीनला चोरीसाठी मारहाण झाली. ठेकेदारासह नितीनला त्याच्या मित्रांनी घाटीत दाखल केले. परंतु जर चोरीसाठी मारहाण झाली, चोरट्यांनी पाकीट नेले, मग मोबाइल का नेला नाही, असा प्रश्न त्याच्या भावाने केला. घाटीत दाखल केल्याबरोबर मला कळवले नाही, पाकीट गायब आहे परंतु मोबाइल आहे, यावरून संशय निर्माण होत असल्याचे त्याच्या भावाने सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...