आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक : घरफाेडीच्या गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या युवकाची आत्महत्या 

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जळगाव- घरफोडीच्या गुन्ह्यात दाेन दिवसांपूर्वी जामिनावर सुटलेल्या युवकाने सामाजिक बदनामीनंतर आलेल्या मानसिक तणावातून रेल्वेखाली झाेकून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी १२.४० वाजेपूर्वी आसोदा रेल्वे गेटजवळ डाऊन लाइनवर घडली. राजेश संजय ठाकरे (वय २२, रा. वाल्मीकनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याचे वडील संजय माधव ठाकरे हे विवेकानंद शाळेच्या वाहनावर चालक आहेत. 


तणावात असलेला राजेश ठाकरे हा शुक्रवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घराबाहेर पडला. त्यानंतर तो पायी चालत आसोदा रेल्वेगेटजवळ गेला. सकाळी ११ वाजता त्याने रेल्वेखाली झोकून आत्महत्या केली. माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील, चुलते व मित्रांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात आणण्यात आला. या वेळी राजेशचे वडील व चुलते यांनी आक्रोश केला. आसोदा रेल्वे लाईनवर खांबा क्रमांक ४२२ / ९ जवळ मृतदेह आढळून आल्याचे उपस्टेशन प्रबंधक आर. के. पालरेचा यांनी तालुका पोलिस ठाण्याला कळविले. त्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

 

दाेन दिवसांपूर्वी सुटला हाेता जामिनावर 
या गुन्ह्यात दाेन दिवसांपूर्वी त्याला न्यायालयातून जामीन मिळाला हाेता. या गुन्ह्यात इतर कुणाचा सहभाग आहे काय? याबाबत त्याला विचारण्यात आले हाेते. शेवटपर्यंत त्याने मीच गुन्हा केल्याचे सांगितले. या गुन्ह्यानंतर त्याला समजावले होते. परंतु, त्याने ऐकले नाही. शेवटी त्याने टोकाचे पाऊल उचलत रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे राजेश याचे चुलते विलास ठाकरे यांनी या वेळी सांगितले. 

 

बदनामीच्या भीतीने उचलले टाेकाचे पाऊल 
वाल्मिकनगरातील हेमंत रायसिंगे व राजेश ठाकरे हे दोघे मित्र होते. २३ डिसेंबर रोजी हेमंतच्या घरी घरफोडी झाली होती. या घरफोडीत १ लाख रूपये रोख व ७० हजार रूपयांचे दागिने चोरीला गेले होते. रायसिंगे याच्या फिर्यादीवरून राजेशविरूध्द शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर एक दिवसाची पोलिस कोठडी मिळाली होती. ९ जानेवारी रोजी त्याला जामीन मिळाला होता. तो अट्टल गुन्हेगार नव्हता. या प्रकरणात झालेल्या सामाजिक बदनामीपोटी त्याने आत्महत्या केली असावी,असा संशय पोलिसांना आहे. 
 

बातम्या आणखी आहेत...