आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मद्यधुंद युवकाने काढली मुलीची छेड, संतापलेल्या पित्याने केला तरूणाचा खून

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला, मूर्तिजापूर- मद्यधुंद अवस्थेत असलेल्या युवकाने बुधवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास घरात घुसून मुलीसोबत अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार लक्षात येताच मुलीच्या वडिलांनी संतापाच्या भरात युवकावर सपासप चाकूने वार केले. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना माना पोलिस ठाण्याच्या अंतर्गत मंडुरा येथे घडली. शुभम देवानंद तेलमोरे वय २२ असे मृतक युवकाचे नाव आहे. 


बुधवारी रात्री शुभम तेलमोरे हा गावातच अवैधपणे दारूची विक्री करणाऱ्या रामा वासुदेव चौके याच्या घरी दारू पिण्यासाठी त्याच्या दोन मित्रांसह गेला होता. दारू पिल्यानंतर त्याचे दोघे मित्र निघून गेले. मात्र शुभमने तेथे थांबून तिचे वडिल रामा चौके यांची नजर चुकवून त्याच्या मुलीसोबत अश्लील वर्तन करू लागला. शुभमने मुलीचा हात धरल्याचे पाहिल्यानंतर तिच्या वडिलांनी मागचा पुढचा विचार न करता घरातील चाकू घेऊन शुभमच्या पोटात, छातीत सपासप वार केले. शुभम मद्यधुंद असल्याने प्रतिकार करण्यापूर्वीच तो कोसळला. त्यातच त्याचा मृत्यू झाला. ही घटना सकाळी वाऱ्यासारखी गावात पसरल्यानंतर पोलिस पाटील यांनी माना पोलिस ठाण्याचे ठाणेदार भाऊराव घुगे यांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचल्यानंतर पंचनामा केला आणि आरोपीला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी रामा वासुदेव चौके याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. 


महिन्याभरात सहा जणांची हत्या 
महिन्याभरात कधी नव्हे ते खुनाच्या पाच घटना घडल्या आहेत. त्यामध्ये सहा जणांचे जीव गेले. सहापैकी चार जणांचे खून हे अनैतिक संबंधातून झाले आहेत. त्यात आसिफ खान मुस्तफा खान, कल्याणी बारोले, बार्शीटाकळी येथील आरोग्य सेवक व शुभम यांचा समावेश आहे. या घटनांनी जिल्हा हादरून गेला. विशेष म्हणजे पाचही हत्याकांडातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. 


पोलिस पोहोचले होते घटनास्थळावर मंडुरा येथे गुरुवारी सकाळीच डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आले. डॉगनेही आरोपीचे संकेत दिलेे. तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी अश्विन सिरसाट व दिनकर बुंदे यांनीही घटनास्थळाची पाहणी केली. 


मुलीकडून दिशाभूल करण्याचा प्रयत्न...
सुरुवातीला मुलीने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. युवकाचा खून वडिलांनी नाही, तर कुण्यातरी युवकाने केला व तो पळून गेला, अशी माहिती तिने दिली. मात्र प्रत्यक्षदर्शी पुराव्यावरून मुलीची, तिच्या वडिलांची विचारपूस केली असता खून वडिलांनी केल्याचे समोर आले. 

 

बातम्या आणखी आहेत...