आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा परिषदेत पुन्हा महिलाराज, अध्यक्ष पद सर्वसाधारणसाठी राखीव

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- जिल्ह्याचे मिनी मंत्रालय असलेल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद पुढील सव्वा दोन वर्षासाठी सर्वसाधारण
महिलेसाठी राखीव राहिले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेचा कारभार पुन्हा एकदा महिलेच्या हातात जाणार असून, तब्बल 10 वर्षांनंतर सर्वसाधारण गटातील महिलेला अध्यक्ष पदाचा मान मिळणार आहे. औरंगाबाद जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या पुढील कार्यकाळासाठी आज मुंबईत सोडत काढण्यात आली. आजच्या सोडतीनुसार  सर्वसाधारण महिलेला अध्यक्ष पदाचा मान मिळणार आहे.
21 मार्च 2017 रोजी शिवसेनेच्या अ‍ॅड. देवयानी डोणगावकर या इतर मागासवर्ग महिला आरक्षणानुसार अध्यक्षा झाल्या. त्यांचा कार्यकाळ 21 सप्टेंबर 2019 ला संपत असताना निवडणुकांमुळे मुदतवाढ मिळाली. आता पुढील कार्यकाळासाठी आज सोडत काढण्यात आली असता अध्यक्ष पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव राहिले आहे.  याआधी 2009 मध्ये सर्वसाधारण महिलांसाठी अध्यक्ष पद राखीव असताना शिवसेनेने अनुसूचित जाती प्रवर्गातून निवडून आलेल्या लता पगारे यांना दिले होते. यावेळी तब्बल 10 वर्षांनंतर अध्यक्ष पद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव राहिले असून, यासाठी शिवसेनेकडून सर्वसाधारण गटातून आलेल्या स्वाती निरफळ, शिल्पा कापसे, शुभांगी काजे, मनीषा सिदलंबे, वैशाली पाटील, शुभांगी काजे, पार्वताबाई जाधव, शीतल बनसोड या सदस्या निवडून आलेल्या आहेत. इतर प्रवर्गातून निवडून आलेल्या महिला सदस्याही यासाठी पात्र आहेत.

 पुरुष सदस्यांचा हिरमोड गेल्या अडीच वर्षामध्ये जिल्हा परिषदेत अध्यक्ष, शिक्षण व महिला बालकल्याण सभापती ही पदे महिलांकडेच राहिलेली आहेत. यावेळी तरी अध्यक्ष पद सर्वसाधारण पुरुष सदस्यासाठी खुले राहील अशी आशा धरून बसलेल्या जिल्हा परिषद सदस्यांचा मात्र सोडतीनंतर  पुरता हिरमोड झाला आहे.