आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- 'पाणी अडवा, पाणी जिरवा' ही मोहीम व्यापकपणे राबवण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. येत्या २ ते १० ऑक्टोबर या आठ दिवसांच्या कालावधीत लोकसहभागातून जिल्ह्यातील ओढ्यांवर ५ हजार ७०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने ठेवल्याचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले.
नुकत्याच झालेल्या जलव्यवस्थापन समितीच्या बैठकीत त्याबाबतचा निर्णय झाला. उपाध्यक्ष शिवानंद पाटील, समाज कल्याण समितीच्या सभापती शीला शिवशरण, कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर, जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने, मंगल कल्याणशेट्टी आदी उपस्थित होते. या बैठकीतच लोकसहभागातून जिल्ह्यात वनराई बंधारे बांधण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे संजय शिंदे यांनी सांगितले.
टंचाईमुक्त महाराष्ट्रासाठी सध्या महाराष्ट्रात 'जलयुक्त शिवार अभियान' राबवण्यात येत आहे. त्याच एक भाग म्हणून लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्यात येणार आहेत. २ ते १० ऑक्टोबर या आठ दिवसांच्या कालावधीत प्रत्येक गावात पाच याप्रमाणे जिल्ह्यातील ११४० गावांमध्ये ५ हजार ७०० वनराई बंधारे बांधण्यात येतील.
नव्याने निर्माण होणाऱ्या वनराई बंधाऱ्यात ११ हजार ४०० टीसीएम (४०२ दलघमी) पाणीसाठा होईल. शिवाय ३ हजार २१६ हेक्टर शेतजमीन त्यातून सिंचनाखाली येऊन ८ कोटी ४० लाख रुपयांचे शेतकऱ्यांना उत्पादन घेता येईल, असा प्राथमिक अंदाज आहे. लोकसहभागातून होणाऱ्या या कामांमुळे शासनाचे १ कोटी १४ लाख रुपये वाचणार आहेत. लघु पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता प्रत्येक जिल्हा परिषद गटात २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत प्रत्येक गटात मॉडेल बंधारा तांत्रिकदृष्ट्या बांधून दाखवणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यात वनराई बंधाऱ्याची कामे होणार आहेत.
जिल्हा परिषदेतील लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता तुकाराम देवकर यांनी लोकसहभागातून वनराई बंधारे उभारण्यासाठीचे मायक्रो प्लॅनिंग केले आहे. ग्रामस्थ, विद्यार्थी, अधिकारी, पदाधिकारी, आरोग्य सेवक, सेविका, अंगणवाडी सेविका यांना या अभियानात सामावून घेतले जाणार आहे.
गावकऱ्यांनी घ्यावा पुढाकार
लोकसहभागातून वनराई बंधारे बांधण्याची कल्पकता चांगली आहे. पाणी अडवून ठेवण्यासाठी ते फायदेशीर ठरणार आहे. शिवाय त्यासाठी पैसेही लागणार नाहीत. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ग्रामस्थांनी त्यासाठी पुढाकार घेऊन एका गावात पाच नव्हे तर दहाहून अधिक बंधारे बांधण्यासाठी पुढाकार घ्यावा. दहापेक्षा अधिक बंधारे बांधणाऱ्या ग्रामस्थांचा जिल्हा परिषदेच्या वतीने पुरस्कार देऊन सत्कार करण्यात येणार असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.