आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सीझेडए'च्या तंबीकडे केले दुर्लक्ष, प्राणी संंग्रहालय मान्यता रद्दची आफत...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या पथकाने (सीझेडए) सोलापुरातील महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात नियमांच्या निकषानुसार नसलेल्या गोष्टी व असुविधा पाहून संतापलेल्या 'सीझेडए' समितीने त्वरित नियम, निकषानुसार सुधारणा करा अन्यथा मान्यता रद्द करण्याची तंबी यापूर्वी तीनवेळा दिली होती. पण, दुर्लक्षाची सवय लागलेल्या महापालिका प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने पाहिलेच नाही. सीझेडएच्या १०० गुणांच्या परीक्षेत किमान ३५ पेक्षा कमी गुण मिळाल्याने प्राणी संग्रहालयाची मान्यता रद्द झाली. मान्यता कायम राहण्यासाठी महापालिका प्रशासनातर्फे अपील करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 


विविध अडचणी अन् समस्यांमुळे 'स्मार्ट सिटी'मधील प्राणी संग्रहालय नेहमीच चर्चेत आहे. महापालिका पदाधिकारी अन्् अधिकाऱ्यांच्या सोईस्कर दुर्लक्षामुळे अडचणींमध्ये सातत्याने भरच पडत आहे. ना चिंता ना काळजी असेच चित्र प्राणी संग्रहालयाबाबत आहे. 


एप्रिल-मे २०१६ मध्ये झालेल्या तपासणी दरम्यान तपासणीत समिती सदस्यांनी प्रशासनाची कानउघाडणी केली होती. निकषानुसार सुधारणा झाल्याशिवाय वाघ, सिंह आणण्याचा विचारदेखील करू नका, अशी समज त्यांनी दिली होती. त्यानंतरही फारशी सुधारणा झालीच नाही. 


मागील वर्षी १७ ऑक्टोबर २०१७ रोजी सीझेडएने पुन्हा तपासणी केली. सोलापूरपासून २५० किलोमीटर अवतीभोवती एकही प्राणी संग्रहालय नाही. शहर परिसरातील विद्यार्थी, नागरिकांसाठी पर्यटन अभ्यासाचे एकमेव प्राणी संग्रहालय आहे. सीझेडएची समिती प्राणी संग्रहालय तपासणीसाठी येणार असल्याबाबत चार महिन्यांपूर्वीच पत्र येत. गेल्यावर्षीचा अपवाद वगळता त्यापूर्वी तपासणी दरम्यान स्थानिक प्रशासनाच्या नियोजन अभावामुळे केंद्रीय समितीच्या समोर नियोजनाचा फज्जा उडत असे. तीनवेळा दिलेल्या तंबी अन् संधीकडे गांभीर्याने पाहिलेच नाही, आता आयुक्त म्हणतात प्राधिकरणाकडे अपील करणार 


वाघ अन बिबट्यांच्या पिंजरा पाहताच होते संतापले 
वाघ अन्् बिबट्यांच्या पिंजऱ्याची पाहणी करताना (सन २०१६)मध्ये पिंजऱ्याच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीमध्ये लग्नसोहळा असल्याने तेथे लावलेल्या डॉल्बीचा प्रचंड आवाज येत होता. त्यामुळे पथक संतापले. अशा ठिकाणी पिंजरा उभारला का? त्या आवाजामुळे प्राण्यांना त्रास होईल. पिंजऱ्याच्या भोवती संरक्षक भिंत नसल्याने प्राण्यांच्या जीविताला धोका आहे, त्याबाबत गांभीर्याने का पाहिले नाही? अशा शब्दात सीझेडएचे डॉ. गुप्तांनी कानउघाडणी केेली. 
महापालिकेकडून म्हणणे मांडले होते 


प्राणीसंग्रहालयाच्या बाबतीत सुनावणीच्या वेळी मी स्वत:हून हजर राहून, मत मांडले होते. तरीही प्राणीसंग्रहालयाची मान्यता प्राधिकरणाने रद्द केली. तो त्यांचा अधिकार आहे. आम्हाला अपील करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार आम्ही अपिल करणार आहोत. तेथे मी आल्यापासून दोन कोटी रुपये खर्च केले आहे. - डाॅ. अविनाश ढाकणे, मनपा आयुक्त 


राज्यातील ४६ प्राणी संंग्रहालयांची मान्यता रद्द 
सेंट्रल झू अॅथॉरिटी (केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरण) यांनी देशभरातील सुमारे ३६९ प्राणी संग्रहालयांची मान्यता रद्द केली. त्यात महाराष्ट्रातील ४६ प्राणी संग्रहालयांचा समावेश आहे. अॅम्बी व्हॅली रेस्क्यू सेंटर पुणे, आैरंगाबाद महापालिका झू, क्रोकोडाईड सेंटर ताडोबा, डीअर पार्क नाशिक, महाराज बाग झू नागपूर, डीअर सॅच्युरी पाटोदा (बीड). 


ही प्रमुख कारणे... 
प्राणी संग्रहालयात झाडं अन्् हिरवळीचे प्रमाण फारच कमी आहे. एकूण क्षेत्राच्या किमान ३३ टक्के क्षेत्रावर झाडोरा उपलब्ध राखू न शकणे. 


वाघ अन्् बिबट्याचे पिंजरा उभारण्याचे ठिकाण एका कोपऱ्यात ठेवले असून त्या ठिकाणी सुरक्षिततेचा अभाव 


हिंस्त्र प्राण्यांच्या खंदकाची खोली जास्त असून त्यामध्ये पाणी साचून डास अन्् इतर कीटकांचा उपद्रव पाण्यांना होऊ शकतो. पिंजऱ्यामध्ये लोखंडी सळई, सिमेंटचे कट्टे अद्याप आहेत. 
संग्रहालय परिसरात प्लास्टिक मोठ्या प्रमाणावर. संपूर्ण परिसर प्लास्टिकमुक्त नसणे. 
सुशोभीकरण नाही, लहान मुलांची खेळणी नाहीत. 


संरक्षक भिंतच नसल्याने भटक्या कुत्र्यांचा वावर. प्राण्यांच्या सुरक्षिततेला धोका. 
कायमस्वरूपी कर्मचारी अभाव. कंत्राटी व अपुरे कर्मचारी असल्याने सुविधांवर परिणाम होतोय. 
पर्यटकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी, बसण्यासाठी पुरेशी जागा नाही. 
 

बातम्या आणखी आहेत...