आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार शिरसाटांची माहिती:15 दिवसांत राज्यात नवे 22 मंत्री, 20 ते 22 जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार

औरंगाबाद/ मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सहा महिन्यांपूर्वी सत्तारूढ झालेल्या शिंदे सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा दुसरा विस्तार ‘तांत्रिक’ अडचणींमुळे लांबला आहे. मात्र १५ जानेवारीपर्यंत या अडचणी दूर होतील व २० ते २२ जानेवारीपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकेल, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निकटवर्तीय औरंगाबादचे आमदार संजय शिरसाट यांनी शनिवारी दिली. शिंदेसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर यांनीही विस्ताराच्या चर्चेला पुष्टी दिली.

राज्यात एकूण ४२ मंत्र्यांची नेमणूक करता येते. पण सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह २० मंत्री आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, २२ रिक्त जागा एकदाच भरल्या जातील. पण भाजप, शिंदेसेना व समर्थक अपक्षांमध्ये मोठी स्पर्धा आहे. त्यांची नाराजी टाळण्यासाठी दोन-चार जागा रिक्त ठेवून त्या आधारे नाराजांना पुढच्या विस्ताराचे गाजर दाखवलेही जाऊ शकते.

एकदाचा सोक्षमोक्ष लावा : कडू
मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले आमदार बच्चू कडू म्हणाले, ‘अधिवेशनाआधी विस्तार होईल असे फडणवीस म्हणाले होते. आता तरी तो होणार की नाही याचा सोक्षमोक्ष मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी लावावा. तांत्रिक अडचणींमुळे होणार नसेल तर तसेही सांगावे, कुणीही नाराज होणार नाही पण जनतेतील संभ्रम आधी दूर करावा.’

हवेत तारखा देऊ नका : दरेकर
आमदार शिरसाट यांनी परस्पर मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख जाहीर करणे भाजपच्या नेत्यांना पटलेले दिसत नाही. पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार प्रवीण दरेकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघे ठरवून विस्ताराच्या तारखा जाहीर करतील. आमदारांच्या पातळीवर हा निर्णय होत नसतो. त्यामुळे कुणीही अशा हवेत तारखा देऊ नयेत.’

तांत्रिक अडचणी कोणत्या
सरकार कोणत्या तांत्रिक अडचणींमुळे विस्तार लांबवतेय ते जाणून घेऊया...
शिंदेसेनेला अधिकृत ‘शिवसेना’ म्हणून अजून मान्यता मिळाली नाही. निवडणूक आयोगासमोर त्याची १० जानेवारीपासून सुनावणी सुरू आहे. ‘धनुष्यबाणा’वरही शिंदेंचा दावा आहे. दोन्ही निर्णय २० जानेवारीपर्यंत होतील, अशी शिंदेसेनेला आशा.उद्धवसेनेचे अजून काही आमदार शिंदे गळाला लावत आहेत. त्यांना किती मंत्रिपद द्यायची, शिंदेसेना व भाजपला किती हे अजून ठरत नाही. काही वादग्रस्त मंत्र्यांना डच्चू देण्याचे ‘वरून’ आदेश आहेत, पण नेमके कुणाला काढायचे यावर एकमत होत नाही.

हे सरकार फेब्रुवारी महिनाही पाहणार नाही : खा. संजय राऊत
मुख्यमंत्र्यांसह सहा मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे अधिवेशनात उघड झाली. शिंदेसेनेच्या १६ आमदारांविरोधात अपात्रतेचा खटलाही सुरू आहे. न्यायव्यवस्थेवर दबाव आला नाही तर निकाल आमच्या बाजूनेच लागेल. त्यामुळे हे सरकार फेब्रुवारी महिनाही पाहणार नाही. नारायण राणे यांचे केंद्रातील मंत्रिपदही जाईल, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला.सविस्तर. पान १२

केंद्राच्या खांदेेपालटात शिंदेसेनेच्या कीर्तिकर, प्रताप जाधवांची नावे चर्चेत
या वर्षी देशातील ९ राज्यांत विधानसभा निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर जानेवारीअखेरीस केंद्रीय मंत्रिमंडळात खांदेपालटाचे संकेत मोदी सरकारकडून दिले जात आहेत. उद्धव ठाकरेंचे सरकार उलथवण्यात भाजपला मोलाची साथ देणाऱ्या शिंदेसेनेच्या एका खासदाराला यात संधी मिळू मिळेल. त्यासाठी मुंबईचे गजानन कीर्तिकर, बुलडाण्याचे प्रताप जाधव यांची नावे चर्चेत आहेत. पक्षाने संधी दिल्यास आनंदच होईल, असे दोघांनीही शनिवारी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...