आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पीक-अप:देशाच्या जनमतामध्येही 80:20 अशी विभागणी

औरंगाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अलीकडील दोन वादग्रस्त आणि चर्चेत असलेल्या प्रकरणांवर एक नजर टाका. पहिले, हिजाबवर कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि दुसरे ‘द कश्मीर फाइल्स’ या चित्रपटाचे. या दोन्ही प्रकरणांमध्ये जनमताची विभागणी ८०:२० च्या प्रमाणात असल्याचे तुम्हाला आढळले असेल. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी योगी आदित्यनाथ यांनी ८०:२० च्या आधारे निवडणुकीचा निकाल लागेल, असे सांगितले होते, तेव्हा ते जातीयवादी बोलत नव्हते. योगी भाजपच्या विरोधात एकजुटीने मतदान करणाऱ्या उत्तर प्रदेशातील २० टक्के मुस्लिमांबद्दल बोलत आहेत, असे अनेकांना वाटले. पण, योगी प्रत्यक्षात हे सांगण्याचा प्रयत्न करत होते की, काही विशेष प्रकरणांत भारतीयांमध्ये ८०:२० विभाजक रेषा दिसते. यूपीमध्ये भाजपचा मताधिक्य ४५ टक्क्यांपेक्षा जास्त वाढणार नाही हे योगींना चांगलेच ठाऊक होते. तसेच झाले. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत या वेळी उत्तर प्रदेशात भाजपची मते केवळ २ टक्क्यांनी वाढली आहेत. निवडणुकीत हिंदूंची मते विभागली जातात हे योगींना माहीत आहे. भारतातील सर्व हिंदूंनी - म्हणजे ८० टक्के लोकसंख्येने - भाजपला एकजुटीने मतदान केले तर भाजप प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने जिंकेल. परंतु, मुस्लिम एकजुटीने मतदान करतात, तर हिंदूंची मते जात, प्रदेश, भाषा आणि विचारसरणीच्या आधारावर विभागली जातात. मग ८०:२० गुणोत्तराचा अर्थ काय? याचा अर्थ असा की, एकीकडे भारताच्या लोकसंख्येच्या मोठ्या वर्गाचे जनमत आहे, तर दुसरीकडे अल्पसंख्याक स्वयंघोषित हिंदू उदारमतवादी आहेत, ते भारताच्या राष्ट्रहिताच्या विरोधात असलेल्या प्रकरणांचे समर्थन करतात.

हिजाबप्रकरणी अंतिम निर्णय सुप्रीम कोर्टाने द्यायचा आहे, पण समाजाने त्यावर आधीच निर्णय दिला आहे. या निकालातही तीच ८०:२० ची विभागणी दिसते. भारताच्या लोकसंख्येच्या १५ टक्के असलेल्या जवळजवळ सर्व मुस्लिमांनी मुस्लिम मुलींच्या शैक्षणिक संस्थेत हिजाब घालण्याच्या अधिकाराचे समर्थन केले आहे. त्या शैक्षणिक संस्थेमध्ये विद्यार्थ्यांसाठी कोणत्याही धर्माचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पोशाखांना परवानगी न देणारा एक विहित ड्रेस कोड असताना ही परिस्थिती आहे. पगडीला सूट देण्यात आली आहे, कारण ती शीख धर्माचा अविभाज्य भाग असून त्यामुळे चेहरा झाकला जात नाही. परंतु, शिखांनाही वर्गात कृपाण नेण्याची परवानगी मिळेल का? नाही. की योगी आदित्यनाथ परिधान करतात तसे भगवे कपडे घालून हिंदू विद्यार्थी वर्गात येऊ शकतात? याचे उत्तरही तेच असेल - नाही. असे असूनही शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब परिधान करणाऱ्या मुस्लिम मुलींचे समर्थन करणारे कोणते हिंदू आहेत? तेच स्वतःला उदारमतवादी म्हणवणारे जेमतेम ५ टक्के लोक. खरे तर ते तसे नाहीत. खरा उदारमतवाद पुरोगामी आणि सहिष्णू असतो, पण त्या २० टक्के (१५ + ५) लोकांचा उदारमतवाद पुरोगामी किंवा सहिष्णू नाही. त्यांना मुस्लिम मुलीची ओळख लपवणारी आणि तिला पुरुषांपेक्षा दुय्यम स्थानावर आणणारी एक मागासलेली परंपरा जोपासायची आहे. ही असहिष्णुता आहे, कारण हे केवळ संस्थात्मक नियमांचे उल्लंघनच नाही, तर कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमानही आहे. असे करताना, हा निकाल देणाऱ्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठात एक मुस्लिम न्यायाधीश होते आणि तरीही एकमताने निर्णय घेण्यात आला, याकडेही दुर्लक्ष केले जाते. किंबहुना हे पाच टक्के उदारमतवादी सर्व प्रयत्न करूनही आज निष्प्रभ ठरले आहेत.

आता आणखी एक चर्चेचा विषय पाहू : विवेक अग्निहोत्रींचा ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपट. या चित्रपटाच्या खळबळजनक यशाने बॉलीवूडमधील आघाडीचे दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्मात्यांची मान शरमेने खाली गेली आहे. अनेक दशकांपासून बॉलीवूड फक्त सुंदर दऱ्या दाखवण्यासाठी काश्मीरमध्ये शूटिंग करत होते. काश्मीरच्या प्रश्नांवर काही चित्रपट बनले असले तरी त्यात काश्मिरी पंडितांचा नरसंहार दडवला गेला. विशाल भारद्वाजच्या ‘हैदर’ चित्रपटाचे लेखक बशारत पीर होते, ते काश्मीर खोऱ्यात भारतविरोधी वक्तव्यांसाठी ओळखले जातात. पण, ‘कश्मीर फाइल्स’च्या यशाने भारतीय समाजाची ८०:२० विभागणी पुन्हा एकदा समोर आली आहे. देशातील बहुसंख्यकांची सहानुभूती पाकिस्तान समर्थित दहशतवाद्यांनी हाकलून दिलेल्या विनम्र, शांतताप्रिय आणि सुशिक्षित काश्मिरी पंडितांच्या बाजूने आहे, तर चित्रपटात तथ्य नसल्याचे उर्वरित २० टक्के लोकांचे मत आहे. १५ टक्के अल्पसंख्याक काश्मिरी पंडितांबद्दल सहानुभूती दाखवू शकत नसतील तर समजण्यासारखे आहे, पण ५ टक्के उदारमतवादी हिंदूंना काय अडचण आहे? ते बरोबर आणि अयोग्य यात फरक करायलाही विसरले आहेत का? ते नेहमी इतिहासाच्या चुकीच्या बाजूने उभे राहण्याचे कारण काय? प्लासीच्या लढाईतही मीर जाफरला हिंदू सेठांच्या पैशाने लाच देण्यात आली होती आणि त्याने नवाब सिराज उद्दौलाशी गद्दारी केली होती. यासह १९० वर्षांच्या ब्रिटिश राजवटीला सुरुवात झाली, त्याने एक समृद्ध देश गरीब केला. त्याहूनही वाईट म्हणजे त्या घटनेमुळे देशात तेव्हापासून आतापर्यंत भारताच्या राष्ट्रीय हिताच्या विरोधात काम करणाऱ्या वसाहतवादी वंशाचा जन्म झाला.

आधी का निर्माण होऊ शकला नाही हा चित्रपट?
‘द कश्मीर फाइल्स’च्या खळबळजनक यशाने बॉलीवूडच्या अग्रणी दिग्दर्शक, अभिनेते आणि निर्मात्यांना लाजिरवाणे केले. ते मौन बाळगून आहेत. अनेक दशकांपासून बॉलीवूड फक्त सुंदर दऱ्या दाखवण्यासाठी काश्मीरमध्ये शूटिंग करत होते. काश्मीरच्या प्रश्नांवर काही चित्रपट बनले असले तरी त्यात काश्मिरी पंडितांचा नरसंहार दडवला गेला.

(ही लेखकाची वैयक्तिक मते आहेत.)

मिन्हाज मर्चंट लेखक, प्रकाशक आणि संपादक mmleditorial@gmail.com

बातम्या आणखी आहेत...