आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामी ५१ वर्षीय भावेश भाटिया माझ्या उज्ज्वल जगाची ओळख करून देतो. मी अंध आहे, पण माझे जग प्रकाशाने भरलेले आहे. प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन आहे, मी रोज नवे प्रयोग करतो, नवीन लोकांना भेटतो, उत्साहाने जगतो. मेणबत्ती व्यवसायातून ९५०० हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. अपेक्षांनी भरलेल्या जगात सर्व मिळून पुढे जाणे हाच माझ्या जीवनाचा उद्देश आहे. चला, माझी गोष्ट ऐकवतो...
माझी दृष्टी लहानपणापासूनच थोडी कमकुवत होती. रेटिना मस्क्युलर डिटोरेशन हे त्याचे कारण. वयाच्या २३ व्या वर्षी दृष्टी पूर्णपणे गेली. त्या वेळी मी एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होतो. दरम्यान, आईला कॅन्सर झाला. दृष्टी गेल्यावर नोकरीही गेली. आर्थिक विवंचनेमुळे आईवर उपचार होऊ शकले नाहीत आणि तिचे निधन झाले. समोर संकटांचा डोंगर उभा होता, पण आईची शिकवण होती की “तू जग पाहू शकत नसलास तरी जगाने तुला पाहावे.” कलेमध्ये रस होता, म्हणून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंडमध्ये वर्षभर राहून बेसिक कँडस मेकिंगसह इतर अनेक प्रकारचे कोर्सेस केले. पुढे १९९४ मध्ये महाबळेश्वरला येऊन सनराइज कँडलची स्थापना केली. मला माझ्या व्यावसायिक यशाबद्दल बढाई मारायची नाही. मला एवढेच सांगायचे आहे की, प्रयत्न करत राहिल्यास नवीन मार्ग खुले होतील. सुरुवातीला मी एकटाच मेणबत्त्या विकायचो. मग वेगवेगळ्या शहरांत मेणबत्तीचे स्टॉल लावायला सुरुवात केली. २००७ मध्ये पुण्यातील एका प्रदर्शनात १२ हजार मेणबत्त्या लावण्यात आल्या होत्या. त्या पाहण्यासाठी लाखो लोक आले होते. माझ्या व्यवसायासाठी तो टर्निंग पॉइंट ठरला. मला एवढेच सांगायचे आहे की, प्रयत्न करत राहा, तुम्हालाही तुमचा टर्निंग पॉइंट सापडेल.
आज १३,६०० लोकांनी आमच्या माध्यमातून मेणबत्त्या बनवण्याचे कौशल्य आत्मसात केले आहे. एक हजाराहून अधिक बहुराष्ट्रीय कंपन्या सनराइज कँडल्सच्या ग्राहक आहेत. आमची उत्पादने ५७ देशांमध्ये जात आहेत. देशात २.५ लाख कोटींचा कॉर्पोरेट गिफ्ट्स उद्योग आहे. हजारो कोटींचा फक्त मेणबत्त्यांचा उद्योग आहे. आयात शुल्कामुळे चीनमधून मेणबत्त्या येणे बंद झाले, अशा परिस्थितीत आमच्यासाठी संधी खुली झाली आहे. आज सरकारी योजनांमुळे शिक्षण सोपे झाले आहे. प्रत्येक दिव्यांग म्हणतो की, त्याला व्हाइट कॉलर जॉब हवा आहे. मी त्यांना सांगतो की, सगळेच सरकारी अधिकारी होतील, हे शक्य नाही. आपण आसपासच संधी शोधल्या पाहिजेत. - फोनवर झालेल्या चर्चेवर आधारित
-डॉ. भावेश भाटिया, चेंजमेकर, महाराष्ट्र (महाबळेश्वर)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.